आरोग्य सेतू अॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत माहीती नाही
नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रधानंमंत्री फंडात जमा झालेल्या निधीबद्दल काहीही माहिती मिळाली नसल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अॅपबाबत माहिती अधिकाराखाली हे अॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत याबद्दल कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने माहिती दिलेली नाही. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र (National informatics centre) यांनी हे अॅप कुणी तयार केले याविषयी काहीही माहिती नसल्याचं उत्तर दिले आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर ही माहिती मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लाईव्ह लॉ’ने हे वृत्त दिलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी (CPIO), राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) व NeGD यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीयच्या अधिनियमांनुसार कलम २० अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. या सर्वांवर आरोग्य सेतु अॅप संबंधित आरटीआयला प्रतिसाद आणि उत्तर न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे अॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्त वनजा एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास https://aarogyasetu.gov.in/ ही वेबसाइट gov.in या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली,” असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय माहिती आयोगाने सौरव दास यांच्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. “या प्रकरणात एनआयसी, नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनजीडी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतु अॅप आणि त्याच्या निर्मितीशी संबंधित अन्य प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अॅप तयार करण्याबाबत एनआयसीकडे माहिती नाही असे याचिकेत सांगण्यात आले आहे,” असे वनजा एन. सरण यांनी सांगितले. “जर तुम्ही हे अॅप बनवले असेल, तर हे उत्तर आश्चर्यकारक आहे,” अशा शब्दात सरण यांनी कानउघडणी केली आहे. विशेष म्हणजे हे अॅप अनेक ठिकाणी सक्तीचे करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून या अॅपचं कौतुक केले असल्याचे बोलले जात आहे.
0 टिप्पण्या