ठामपाचे निलंबित सहा.आयुक्त मोरे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
ठाणे
ठाणे महानगर पालिकेतील निलंबित सहाय्यक आयुक्त डॉ.सुनिल मोरे यांच्यावर दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या आणि कोविड साहित्य खरेदीच्या फाईल्स चोरी केल्याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी त्यांच्यावर पालिका आयुक्तांनी निलंबनाचीही कारवाई केली. मात्र, अटकेची कारवाई टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळला.यामुळे आता मोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती डायघर पोलिसांनी दिली आहे.
बदलीची आर्डर निघताच दिव्यातील अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मोरे यांना कधीही अटक केली जाऊ शकते, अशी माहिती डायघर पोलिसांनी शुक्रवारी दिली. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व प्रभाग समित्यांमधील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश १७ आगस्ट रोजी काढले होते. त्यानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली.
दिवा प्रभाग समितीचे सुनील मोरे यांची निवडणूक विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयातून संगणक आणि फाईल्स चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले. पालिका आणि पोलीस तपासात मोरे यांनी बेकायदा बांधकाम तसेच कोविड साहित्य खरेदीच्या सुमारे सात फाईल्स चोरल्याचे सुकृत दर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर पालिका आयुक्तांनी त्यांना निलंबित करून रोज महापालिकेत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, १० आक्टोबरपासून ते 'नॉट रिचेबल' अर्थात गायब झाले आहेत. त्यामुळे बेपत्ता कथित आरोपी मोरेचा डायघर पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
0 टिप्पण्या