माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत कोरोना काळात कशी काळजी घ्यावी;
चित्ररथाच्या माध्यमातून गावोगावात प्रबोधन
जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी दाखवला हिरवा झेंडा
ठाणे
कोरोनाच्या संकटामध्ये आपले कुटुंब ही आपली जबाबदारी मानून प्रत्येक नागरिकाने शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व ठाणे जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उदघाटन कल्याण तालुक्यातील नडगाव येथे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हवासीयांना आवाहन केले.
ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमे अंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त महाराष्ट्रसाठी सर्वांना आवाहन केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आशा व अंगणवाडी सेविकांच्या सहकार्यने नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे, मास्क लावणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहनही श्रीमती लोणे यांनी केले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घेऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला गति द्यावी असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी, पाळावयाचे नियम याबाबत चित्रफीत दाखवण्यात येत आहे.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेले आवाहनाची चित्रफीत दाखविण्यात येत आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामपंचायत तसेच सगळ्या गावांना भेटी देऊन प्रबोधन करणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या