स्वच्छतेच्या बाबतीत ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही
महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांची सर्व सहाय्यक आयुक्तांना सूचना
ठाणे:
शहरातील स्वच्छता ही मूलभूत गरज आहे. पाऊस कमी झाल्याने शहरातील रस्त्यावर धूळ जमा झाली आहे. या धुळीचा सामान्य नागरिकांना सामना करावा लागत आहे. कोरोना काळात शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून सर्व सहाय्यक आयुक्तांनी प्रभागसमिती स्तरावर यंत्रणा निर्माण करून प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिले आहेत. शहरातील स्वच्छता आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा विषय असून स्वच्छतेच्या बाबतीत ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही. स्वच्छेतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्य्क आयुक्तांना दिला आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात नियोजनपूर्वक साफसफाई पूर्ण करण्याचे आदेश डॉ.शर्मा सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.
शहरातील दुकानदार रस्त्यावर कचरा टाकत आहेत. सामान्य नागरिकांना याचा त्रास होत असून जे दुकानदार रस्त्यावर कचरा टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, प्रभाग समितीमधील सर्व स्वच्छता कामाची दररोज पाहणी करण्यात येणार असून ज्या प्रभाग समितीमध्ये कचरा दिसले त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिला आहे. काही ठिकाणी साफसफाई समाधानकारक होत असून काही ठिकाणी साफसफाई कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त यांनी आपला प्रभाग स्वच्छ राहिल याची विशेष दक्षता घेऊन दोन दिवसात आपापल्या प्रभागसमिती स्तरावर यंत्रणा निर्माण करून साफसफाईचे नियोजन करावे. रस्त्यावर साचलेला कचरा, रस्ते, गटर, सर्व्हिस रोड, पदपथ, सार्वजनिक शौचालयांची आदींची साफसफाई तात्काळ करून शहर स्वच्छ ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व सहाय्य्क आयुक्तांना दिले आहेत.
0 टिप्पण्या