दोन हजार मान्यवरानी केले मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत
मुंबई
मंदिरे उघडण्यासाठी राज्यातील भाजपने आंदोलन केले आणि स्वायत्त पद असलेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी यात उडी घेऊन मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरे उघडण्याबाबत पत्र पाठवले होते. त्यात “धर्मनिरपेक्ष’ मूल्याबाबत राज्यपालांनी केलेली विधाने वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. दरम्यान, कोविडचा धोका लक्षात घेऊन मंदिरे न उघडण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री ठाकरे ठाम राहिले, याचे राज्यातील मान्यवरांनी समर्थन केले आहे. यात राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दोन हजारांहून अधिक मान्यवरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना समर्थनपत्र पाठवून राज्यपालांच्या दबावाला बळी न पडल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
राज्यपाल आणि भाजपच्या दबावाला बळी न पडता लोकहितासाठी मंदिरे न उघडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तसेच “श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकारण यशस्वी झाले आणि देवळे उघडली गेली तर ते भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरेल,’ असे पत्रामध्ये नमूद करून अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर आक्षेप व्यक्त करीत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे, वैज्ञानिक डॉ. हेमचंद्र प्रधान, कादंबरीकार रंगनाथ पठारे, आयुकाचे माजी अध्यक्ष डॉ. नरेश दधिच यांच्यासह विविध क्षेत्रांतील २ हजार मान्यवरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने - भालचंद्र नेमाडे-ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक, शांता गोखले-लेखिका
रंगनाथ पठारे- कादंबरीकार, डॉ. हेमचंद्र प्रधान- वैज्ञानिक, नीरजा-कवयित्री, जयंत पवार-नाटककार, सुभाष वारे-सामाजिक कार्यकर्ते, डॉ. नरेश दधिच-माजी संचालक, आयुका, सुजित पटवर्धन-चित्रकार, मिलिंद मुरुगकर-कृषी अभ्यासक, विद्या पटवर्धन-शिक्षणतज्ज्ञ, आशुतोष शिर्के-फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी आदी मान्यवरांचा समावेश आहे.
हिंदू धर्मातील संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माचा दाखला देऊन “शासनासमोर दोन पर्याय आहेत. एक तर लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा किंवा श्रद्धांचा. हिंदू धर्मातील भागवत परंपरा ही कर्मकांड नाकारणारी, देव फक्त मंदिरात असतो हे नाकारणारी परंपरा आहे. हे पत्र लिहिणारे आम्ही सर्व ही परंपरा मानणारे लोक आहोत. मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात आनंद असतो; पण ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे, देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे’ अशी माणसाच्या श्रद्धेला व्यापक करणारी परंपरा आम्ही मानतो. ही परंपरा स्वाभाविकपणेच कर्मकांडाला नकार देणारी असल्याने लोकांच्या श्रद्धेचे होणारे सवंग राजकारण नाकारणारी आहे,’ या भूमिकेतून हे समर्थन दिल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच “सेक्युलर व्यक्ती श्रद्धा बाळगणारी, धर्माचरण करणारी असू शकते. पण या व्यक्तीची भूमिका अशी असते की, सार्वजनिक हितासाठी लोकांच्या धर्मस्वातंत्र्यावर बंधन आणण्याचा अधिकार हा सेक्युलर शासनाला असतो. त्यामुळे आपण अभिनंदनास पात्र आहात,’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या