मेट्रो कारशेड आता कांजूरला. "आरे"ची ८०० एकर जागा जंगल म्हणून घोषित
मुंबई
आरेचे जंगल सुरक्षित राखण्यासाठी मेट्रो कारशेड्सविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्यांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. भाजप सरकारच्या काळात मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा निश्चित करून त्यासाठी झाडेही तोडण्यात आली. या प्रकल्पाला अनेक पर्यावरणवादी आणि नागरिकांनी विरोध केला होता. त्यासाठी स्वयंस्फूर्त आंदोलनेही झाली. मात्र, महाविकास आघाडी सत्तेवर येताच आरे येथील कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली. आता या भागाला जंगल घोषित करून कारशेडची जागा कांजूरमार्ग येथे हलविण्यात आली आहे.
आरे कारशेडला माझा सुरुवातीपासूनच विरोध होता. मी तेव्हा मुख्यमंत्री नसतानाही याविषयी भूमिका मांडली होती. आरे येथील ८०० एकर जागा जंगल म्हणून घोषित करण्यात आली. यापूर्वी ६०० एकर जागेची घोषणा करण्यात आली होती. त्याची व्याप्ती २०० एकरांनी वाढविण्यात आली आहे. या जागेतील मेट्रोचे प्रस्तावित कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यात येणार आहे. मेट्रो-3 साठीच्या कारशेडसाठी कांजूर येथील सरकारी मालकीची जागा शून्य रुपये दराने जनहितासाठी देण्याचा सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी आरे कॉलनीत कारशेडसाठी उभारण्यात आलेल्या इमारती इतर कामांसाठी वापरल्या जातील. या जागी उभारण्यात आलेल्या मेट्रो मार्गांचाही वापर इतर मार्गांना जोडण्यासाठी केला जाणार आहे. या कामासाठी खर्च केलेला एक रुपयाही वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, ओल्या दुष्काळाची भरपाई दिली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्याविषयीही भाष्य केले आहे. जोरजबरदस्तीने कृषी कायदा स्वीकारणार केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा स्वीकारला जाईल. केंद्राच्या कृषी विधेयकावर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.
0 टिप्पण्या