`रिपब्लिकन ऐक्य'हा विषय आता घासून गुळगुळीत झाल्यानंतर त्यावर आता फारशी चर्चा कोणी करतांना दिसत नाही. कारण इथल्या व्यवस्थेने आपल्याला बरेच विषय दिलेत. सध्या आपले कार्यकर्ते तो तो विषय हाताळत आहेत. त्यातच कोरोनाने प्रत्येक सर्वसामान्य माणसाची स्थिती गंभीर केली आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. म्हणूनच कदाचित सध्या बौद्ध समाज तरी एकसंघ आहे का हा सूर आवळला जात आहे. याकरिता ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष वेधत प्रयत्न करत आहेत. कल्याणमध्ये तर याबाबत सुरुवातच करण्यात आली. अनेक उपसमित्यांची निर्मिती करून एकच एक बहुउद्देशीय संस्था निर्माण करण्यात आली आहे.
मग खरच बौद्ध समाज एकसंघ होईल काय? असा प्रश्न आज प्रत्येक जण केवळ विचारत आहे. पण या प्रयत्नात सहभागी होण्याचे धारिष्ट्य कोणीही दाखवत नाही असे खेदाने म्हणावे लागेल. केवळ चर्चेच्या पलिकडे हा समाज कधीच गेलेला नाही. चर्चा मग ती रिपब्लिकन ऐक्याची असो अथवा, बौद्धांच्या स्वतंत्र कायद्याचा असो किंवा गेली कित्येक वर्षे राजकारणांच्या गर्तेत असलेला चैत्यभूमीच्या नुतनीकरणाचा असो, बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था जसे पिपल्स एज्युकेशन ट्रस्ट, त्यांच्यावर होत असलेले हिन्दुत्ववाद्यांचे आक्रमण. पाडलेले वडाळ्याचे सिद्धार्थ विहार (हॉस्टेल ), दादरचे डॉ.आंबेडकर भवन, कोकणवासीयांची बौद्धजन पंचायत समिती, आणि राहिलेच तर इंदू मिलच्या जागेवर होणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक. असे एक ना अनेक विषयावर मागील अनेक वर्षापासून चर्चेचे गुऱहाळ सुरु आहे.
त्यातच आता 2021 च्या जनगणनेत बौद्ध कि महार, अल्पसंख्यांक की शेड्यूल्ड कास्ट या चर्चेने पुरता सोशल मिडीया व्यापला आहे. या सर्वांमध्ये महाराष्ट्रात असलेल्या लेण्या यांच्याकडे तर आजमितीला बौद्ध समाजाचे संपूर्ण दुर्लक्षच झाले आहे. प्रत्येक लेण्यांच्या पायथ्याशी प्रचंड मंदिर उभे राहिले आहे. या मंदिरात होणाऱया जत्रा उत्सवाच्या निमित्ताने जातियवादी संस्था संघटना लेण्यांना नष्ट करण्याचे काम सुप्तपणे करीत आहेत. नवी मुंबईतील लेण्यांजवळ असलेल्या काही वर्षापूर्वीच्या मंदिराचे पुनर्वसन होते मात्र पुरातन असलेल्या लेण्यांवर बुलडोझर फिरवले जाते. मग आम्ही चर्चा करतो. मग त्याविषयी आंदोलन करण्याचे ठरते. मग कोणत्या संघटनेने करायचे याबाबत चर्चा, मग त्या संघटनेतही नेतृत्व कोणी करायचे याबाबत चर्चा. या चर्चेमध्ये बोधगयेच्या महाविहाराचा प्रश्न तर आमच्या लेखी नाहीच. एका शतकाहून अधिक काळ हिन्दुंच्या अधिपत्याखाली असलेले आणि आतून हिन्दुत्वाचे रूप देण्याचे पुर्णत्वास येत असलेल्या या महाविहाराला आता मुक्त करणे दूरच त्याचे हिन्दुत्वीकरणही रोखू शकत नाही. हे सर्व बौद्ध समाजाचे अस्तित्व आणि अस्मितेचे असलेले प्रश्न आजही ` जैसे थे ’ अवस्थेतच आहेत.
एप्रिल महिन्यामध्ये सोशल मिडीयावर सम्राट अशोक जयंतीबद्दल कोणी पोस्ट टाकली. एक तारखेला जयंती साजरी करण्याचे आवाहन केले. लगेच आमच्यातील काही विद्वानमंडळींनी एक तारखेलाच का काही ऐतिहासिक पुरावा आहे का? असे विचारले आणि चर्चेला सुरुवात झाली. सुमारे एप्रिल महिनाभर ही चर्चा सोशल मिडीयावर जोर धरून राहिली. त्यानंतर अचानक लुप्त झाली. सम्राट अशोक जयंतीचा प्रश्न मात्र तिथेच राहिला. आज शेकडो वर्षे होऊनही आणि आम्ही धर्मांतरीत होऊन 70 वर्षे होऊनही सम्राट अशोक जयंती कोणत्या दिवशी साजरी करायची याबाबत संभ्रमित आहोत. इतकेच काय तर आजही दर दसरा आणि विजयादशमीच्या आधी किंवा 14 ऑक्टोबरच्या दोन दिवस आधी दसरा कि 14 ऑक्टोबर या विषयावर चर्चा सुरु होते. धर्मांतर होऊन 70 वर्षाचा काळ लोटला तरी आजही या विषयाच्या चर्चा आम्ही करत आहोत. या पलिकडे जर कधी आमची चर्चा केली तर पुजा-विधी भिक्खूंनी करावा की बौद्धाचार्यांनी? विपश्यना बौद्धांनी करावी की करू नये. गळ्यात मंगळसूत्र पांढऱया मण्यांचेच का? अशा स्वरुपाच्या प्रश्नांची होते.
एवढ्या समाजात आपल्या समविचारांचा एकही माणूस नाही काय? की सर्वच जण विसंगत विचारांचे आहेत. जे आपल्या सम विचारांचे आहेत. त्यांच्याशी जुळवून घेऊन आम्ही येणाऱया संकटाशी मुकाबला करू शकतो. किंवा एखादे विधायक कार्य करू शकतो. मात्र तसे करण्यासही आम्ही असमर्थ ठरतो. आणि स्वतचा तंबू उभा करतो. मग तो एखाद्या नवीन पक्ष किंवा मंडळाच्या माध्यमातून असो. किंवा एखाद्या अनियतकालिकाच्या माध्यमातून असो, आमचा तंबू आमचे परिघ हे आम्ही ठरवून घेतो. मग चळवळ म्हणजे एखाद्या विषयावर जोरजोराने भाषण देणे चर्चा करणे किंवा एखादे मासिक, साप्ताहिक नावाचे अनियतकालिक काढणे आणि त्याद्वारे आपली लेखणी चालवून समाजाचे प्रश्न अगदी जोमाने मांडणे इथवरच! काही अपवादात्मक वगळता यामागे खरं तर काही `अर्थ'कारण किंवा मी पणाचा `नाव`लौकिकाचा स्वार्थ दडलेला दिसून येतो.
केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी अशा गोष्टी करायच्या की ज्यामुळे समाज विघटीत राहिल. हल्ली ही प्रवृत्ती वाढीस लागल्यामुळे समाजाचे प्रश्न आजही `जैसे थे' च आहेत. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. केवळ आपला तंबू सांभाळण्यासाठी नेतृत्व करायचे. आपल्या तंबुभोवतीच सिमीत राजकारण करायचे या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे. तंबूच्या राजकारणांनी केवळ स्वार्थ साधला जातो, वैयक्तीक फायदा होतो. मात्र समाजाचे नुकसान होते. झाले आहे. होत आहे. आजपर्यंत असेच घडत आले आहे. चर्चा ऐक्याच्या करायच्या सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या करायच्या आणि कार्य मात्र सामाजिक दुही कशी राहिल असे करायचे. प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठीच आपले स्वतचे नेतृत्व निर्माण करून त्याचा उपयोग फक्त स्वतच्या फायद्यासाठीच करत आहे. मग ती संस्थेच्या माध्यमातून राजकारणाच्या विविध गटाच्या माध्यमातून अथवा स्वतच्या प्रसिद्धीपत्राच्या माध्यमातून... 1956च्या विजयादशमीनंतर आज 65 वर्षाचा कालावधी लोटला तरी कित्येक प्रश्न अनुत्तरीतच...
म्हणूनच वामनदादा म्हणतात...
भीमानंतर जे कुणी क्रांती कराया ठाकले
तीन पैशांच्या पुढे वेडे गडी ते वाकले
0 टिप्पण्या