ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त, दिवाळी साजरी करण्याचे ठाणेकरांना आवाहन
ठाणे
ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून नागरिकांनी दिवाळी या सणाचे पावित्र्य राखत सामाजिक भान ठेवून ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक आणि अधिक तेजोमय पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन ठाणे महानगर पालिकेचे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे. दरम्यान संपूर्ण ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून ठाणे शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांचीच असल्याचे महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फटाके न वाजविता ही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
फटाके वाजवल्याने हवा आणि वातावरण दूषित होते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवणशक्तीवर परिणाम होते. फटाकेनिर्मितीत वापरलेल्या रसायनांमुळे श्वसनाचे अनेक गंभीर आजार उदभवतात. कोरोना झालेल्या रुग्णांना तसेच बरे झालेल्या व्यक्तींना देखील दिवाळीत होणाऱ्या हवा प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणात होवू शकतो. त्यामुळे यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरण पूरक साजरी करून यंदाची दिवाळीची तेजोमय साजरी करण्याचे आवाहन महापौर आणि आयुक्त यांनी ठाणेकरांना केले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात प्लास्टिक बंदी तसेच ''स्वच्छ सर्वेक्षण २०२१'' या मोहिमा सुरु झाल्या आहेत. प्लास्टिक वापरणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना विरुद्ध महापालिकेच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता तसेच प्लस्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व प्रभाग समितीस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती स्तरावर प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनावर कडक कारवाई करण्याचे काम सुरु आहे.
0 टिप्पण्या