पालकमंत्री एकनाथ शिंदे बी.ए.पास
ठाणे
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱया अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात कला शाखेतून राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे 77.25 टक्के गुणवून उत्तीर्ण झाले आहेत, ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु, संधी मिळताच शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ कायम होती. त्यामुळे सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुन:श्च श्री गणेशा केला होता. गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बीए पदवीधर झालो, याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, काही कारणास्तव शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेलेल्या माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हा मोठा आधार आहे, असेही ते म्हणाले.
ज्ञानपीठ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र असून दरवर्षी या केंद्राचा निकाल 100 टक्के लागतो. याही वर्षी विद्यालयाने आपली परंपरा कायम राखली असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आमच्या विद्यालयाची निवड केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे विद्यालयाच्या केंद्र संयोजक प्रा. प्रिती जाधव यांनी सांगितले. त्यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण (प्रत्येकी तीन पेपर) या दोन विषयांची निवड केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. विविध कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडावे लागलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गेली अनेक वर्षे कार्यरत असून या माध्यमातून अनेकांनी आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले आहे. दरवर्षी अंतिम वर्ष पदवी परीक्षा मे महिन्यात होतात; परंतु यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि ऑनलाइन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या, असेही केंद्र संयोजक प्रा. प्रिती जाधव यांनी सांगितले.
0 टिप्पण्या