काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घेतली
विविध राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट.
उरण
उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको व रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केले मात्र त्याबदल्यात आजपर्यंत येथील शेतकऱ्यांना कोणतेही मावेजा, मोबदला अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. सिडको व रेल्वे प्रशासन चर्चेला सुद्धा तयार नाही. सुरवातीपासूनच रेल्वे व सिडको प्रशासनाने येथील शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने रेल्वे व सिडको प्रशासना विरोधात स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा तसेच कोट ग्रामसुधारणा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीव्र आंदोलन व काम बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
त्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी उरणचे विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी,खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, मनसेचे नेते संदेश ठाकूर तसेच विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या विषयावर सविस्तर चर्चा केली. व या समस्या सोडविण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत काळाधोंडा येथील शेतकऱ्यांना योग्य ते न्याय देण्याची भूमिका घेतली. विद्यमान आमदार महेश बालदी यांनी याबाबत आपण वरिष्ठांपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. खासदार श्रीरंग बारणे यांनी लवकरच संघटनेची सिडकोची व रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार असल्याचे सांगितले.प्रशांत पाटील तसेच मनोहर भोईर यांनीहि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या