Top Post Ad

सामान्य माणसाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे - मंत्री एकनाथ शिंदे

ठाणे 
एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डीसीपीआर) सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून तयार केली असून सामान्य माणसाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, हा ध्यास त्यामागे आहे. परंतु, नियम चांगले असले तरी त्याची अमलबजावणीही तितक्याच काटेकोरपणे व प्रभावीपणे झाली पाहिजे. ती जबाबदारी तुमची असल्यामुळे ही नियमावली योग्य रितीने समजून घ्या व अमलबजावणी करा, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. राज्य सरकारने अलिकडेच मंजूर केलेल्या युनिफाईड डीसीपीआर संदर्भात नगरविकास विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जीतेंद्र आव्हाड आणि नगरविकास विभाग १ चे प्रधान सचिव भूषण गगराणी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी शिंदे म्हणाले की, एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य व्यक्तीचे हित डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. यामुळे हाऊसिंग स्टॉक वाढून घराच्या किमती आवाक्यात येतील. १५० चौ. मी. पर्यंतच्या भूखंडावर स्ववापरासाठी घर बांधणाऱ्या व्यक्तीला बांधकाम परवान्याची आवश्यकता रद्द करण्याची महत्त्वाची तरतूद यात केली आहे. त्याचबरोबर पर्यटन आणि कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या तरतुदीही यात केल्या आहेत, असे श्री. शिंदे म्हणाले. क्लस्टर डेव्हलपमेंट, तसेच एसआरए योजना राज्यभरात लागू करण्यात आल्यामुळे धोकादायक, तसेच बेकायदा इमारती व झोपडपट्टयांमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीच्या पहिल्या सरकारच्या वेळी ४० लाख झोपडीवासीयांना हक्काची घरे देण्याची घोषणा केली होती. बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एसआरएशी निगडित किचकट नियमांचे सुलभीकरण केले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. हाऊसिंग स्टॉक वाढत असतानाच नगर नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. हा डीसीपीआर म्हणजे केवळ बांधकामांसाठीची नियमावली नसून आपल्या शहरांच्या शिस्तबद्ध विकासाचे, नियोजनाचे ते महत्त्वपूर्ण साधन आहे, असेही ते म्हणाले.

प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र नियमावली असण्याऐवजी एकाच पुस्तकात तुम्ही अवघा महाराष्ट्र सामावला, त्याबद्दल तुमचे खास अभिनंदन अशा शब्दांत आव्हाड यांनी या युनिफाइड डीसीपीआरचे स्वागत केले. ही नियमावली म्हणजे साध्य नसून केवळ साधन आहे, त्याचा प्रभावी वापर करा, असे नगरविकास विभाग १ चे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक, नगर नियोजन  नागमोडे, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, एमसीएचआय क्रेडाईचे मुंबई अध्यक्ष दीपक गरोडिया, ठाणे अध्यक्ष अजय आशर यांचीही समयोचित भाषणे झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com