ठाणे
ठाणे महानगर पालिका प्रशासनाकडून यापूर्वी पदांची खैरात वाटली जात होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट ठामपा आयुक्तांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या सर्जिकल स्ट्राईकवर महापौर नरेश म्हस्के यांनी महासभेत केला. चुकीच्या पध्दतीने हे पदांचे वाटप झाले होते. त्यामुळे काहींवर अन्याय देखील झाला आहे. मी त्यावेळी या संदर्भात पत्रव्यवहारही करुन त्यावर कारवाई झाली नव्हती. परंतु आता प्रशासनाकडून योग्य स्वरुपात पावले उचलण्यात आली आहेत. आकृती बंधानुसार आता पदे दिली जात आहेत. मात्र आता केवळ एकाच विभागाच्या बाबतीत हे ऑपरेशन न करता सर्वच विभागांचे या पध्दतीने ऑपरेशन करावे असे आदेश महापौर म्हस्के यांनी दिले.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, शहरविकास आणि पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता यांना वरच्या आर्थिक उलाढालीच्या जोरावर पदाची खैरात वाटण्यात आली होती. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी अचानक सर्जिकल स्ट्राइक करुन 19 अधिका-यांना मूळ पदावर आणले. या अधिका-यांना रितसर प्रक्रिया न करता बढती दिल्याचे कारण सांगून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या कारवाईमुळे अधिकारीवर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे सेक्रेटरी प्रमोद इंगळे यांनी प्रदेश काँग्रेसचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेशदादा पाटीलखेडे यांच्यासह आयुक्तांची भेट घेऊन ही बाब अनेकदा त्यांच्या नजरेस आणून दिली होती. तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांची याबाबत भेट घेऊन त्यांच्यादेखील निदर्शनास ही बाब आणून दिली होती.. अखेर आयुक्त डॉ. शर्मा यांनी याबाबत कठोर पावले उचलत या सर्व आधिकाऱ्यांना आपल्या मुळ जागेवर आणून बसवले.
मात्र महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत या प्रकरणावरून एकच गदारोळ उडाला. अनेक नगरसेवकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. यापूर्वीच्या बढत्या चुकीच्या पध्दतीने होत्या का?, त्यांना कोणत्या कायद्यानुसार बढती दिली? त्यांना आता पुन्हा मूळ पदावर कसे आणले गेले? त्यांना दिलेला कार्यभार हा बेकायदेशीर होता का? असे अनेक सवाल उपस्थित करीत महासभेमध्ये नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आणि अन्य ज्येष्ठ नगरसेवकांनी यावर उलट-सुलट प्रश्नांचा भडिमार केला. भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी शासनाकडून आलेले उपायुक्त येथेच ठाण मांडून असतात, त्यामुळे महापालिकेतील अधिका-यांवर अन्याय होत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. काही अधिकारी तर एका-एका विभागात 10 वर्षाहून जास्त काळ कार्यरत आहेत. त्यांची देखील बदली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तर आजही काही अधिका-यांवर अनेक विभागांचे कार्यभार देण्यात आलेले आहेत, ते काढून घ्यावेत अशी मागणही यावेळी नगरसेवकांनी केली. दरम्यान महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांच्या निर्णयाला सहमती दर्शवत पालिकेतील कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली जात असल्याचे स्पष्ट केले.
या संदर्भात अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की आकृती बंधानुसारच हे कार्यभार काढण्यात आलेले आहेत. तीन उपनगर अभियंत्यांची तीन पदे असतांना सहा जणांना ती पदे देण्यात आली होती. त्यामुळेच यातील तिघांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बदल्या करीत असतांना आयुक्तांच्या कर्तव्यांचा भाग आहे. परंतु महापौर किंवा इतरांनी सांगितल्यास त्यांचे विचारही यात घेतले जातात. त्यानुसार आता नियमानुसारच जे काही अतिरिक्त कार्यभार देण्यात आले होते, ते काढण्यात आल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. उपायुक्तांची १० पदे मंजुर आहेत, त्यातील ५ शासनाकडून आणि पाच महापालिकेचे असतात. १७ ते १८ पदे ही सहाय्यक आयुक्तांची पदे मंजूर असून त्यातील ८ ते ९ पदे ही शासनाकडून आणि उर्वरीत पदे महापालिकेची असतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. टप्याटप्याने आता इतर अधिका-यांना जे काही अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेले आहेत, त्यांनाही मूळ पदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठामपा आयुक्तांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये नगर अभियंता असलेले रवींद्र खडताळे यांना पुन्हा उपनगर अभियंता या पदावर आणण्यात आले आहे, परंतु त्यांच्याकडे नगर अभियंता पदाचा प्रभारी पदभार मात्र दिला आहे. अर्जुन अहिरे यांच्याकडे उपनगर अभियंता पद असताना अतिरिक्त नगर अभियंता पदाचा कार्यभार देण्यात आला होता. त्यांच्याकडे प्रभारी अतिरिक्त नगर अभियंता पद देण्यात आले आहे. भरत भिवापुरकर, विकास ढोले, नितीन पवार, धनंजय गोसावी, रामकृष्ण कोल्हे, रामदास शिंदे, नितीन येसुगडे आणि शैलेंद्र बेंडाळे या कार्यकारी अभियंत्यांकडे उपनगर अभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता, तो काढून या अधिकाऱ्यांना पुन्हा कार्यकारी अभियंता या पदावर आणण्यात आले आहे. शशिकांत साळुंखे, दत्तात्रय शिंदे आणि अतुल कुलकर्णी या उपअभियंत्यांकडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तो काढून घेण्यात आला असून त्यांना पुन्हा मूळ पदावर पाठवण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता असलेले सुनील जाधव, सुनील निकुंभ, मनीष भावसार, संदीप गायकवाड आणि प्रशांत कलगुटकर यांच्याकडे उपअभियंता या पदाचा कार्यभार देण्यात आला होता. त्यांना पुन्हा कनिष्ठ अभियंता या पदावर पाठविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या