आजचा 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा जयंतीचा दिवस. खऱया अर्थाने भारतातील सर्व स्त्रियांच्या मुक्तीचा पवित्र दिवस. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतभर अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आनंदाने साजरा करावयास हवा, असे मला वाटते. पुण्यापासून साधारणपणे 35 मैलांच्या अंतरावर पुणे-बंगलोर या मार्गावर शिराळ्याच्या पश्चिमेला एक लहानसे खेडेगाव आहे. या गावात खंडोजी नेवसे पाटील राहत असत. ते नायगावचे वतनदार पाटील म्हणून सर्वदूर ओळखले जात असत. नायगावचा बहुसंख्य माळी समाज नेवसे पाटील याच नावाने ओळखला जातो. खंडोजी पाटील यांना 3 जानेवारी 1831 रोजी `सावित्री' या स्त्री रत्नाचा लाभ झाला.
150 वर्षांपूर्वी मुलीचे लग्न लहानपणीच करीत असत. इ.स. 1840 मध्ये जोतिबा आणि सावित्रीबाई यांचा मंगल परिणय अतिशय चांगल्या वातावरणात संपन्न झाला. जोतिराव आणि सावित्रीबाई या दांपत्याने विवेकवादी जीवनमूल्यांचा उत्तम संस्कार स्वत:वर करून घेतला होता. त्यामुळे त्या उभयतांमध्ये नेहमीच समजुतदारपणा आढळून येत असे. सावित्रीबाई आणि जोतिबा हे दांपत्य शेतात खूप कष्ट करीत असत. थकल्यानंतर दुपारी आंब्याच्या सावलीत बसून दोघेही आनंदाने जेवण करीत असत. जेवणाचा तृप्त ढेकर दिल्यानंतर शेतातील काळ्या मातीची पाटी करून आणि आंब्याच्या वाळक्या काडीची लेखणी करून जोतिबा सावित्रीबाईंना बाराखडी शिकवत असत. सोबत जोतिरावांची मावसबहिण सगुणाबाई ही सुद्धा सावित्रीबाईंसोबतच शिक्षण घेत असे. सावित्रीबाईंना मुळातच शिक्षणाची फार आवड होती. आपला नवराच आपल्याला प्रसन्न मनाने शिकवितो हे बघून त्यांना मनापासून खूप आनंद होत असे. त्यामुळे फारच थोड्या कालावधीत सावित्रीबाईंना लिहिता आणि वाचता येऊ लागले. त्यामुळे जोतिबा हे सावित्रीबाई आणि सर्व स्त्रीवर्गाचे शिक्षणातील प्रथम गुरु ठरतात. म्हणून शिक्षकदिन हा महामानव जोतिबा गोविंदराव फुले यांच्या नावाने सुरू करणे न्यायाला, विवेकाला धरून होईल, असे मला वाटते. सर्व भारतीय नागरिकांनी यावर विचार करावा.
सावित्रीबाई आणि जोतिबा या दोघांनाही सर्व शोषित-पीडितांच्या बाबतीत फार कळवळा असे. असेच एकदा माता सावित्रीबाई जेवणाची पाटी डोक्यावर घेऊन शेतात जावयास निघाल्या. ते दिवस उन्हाळ्याचे होते. दुपारच्या बारा वाजता सूर्य प्रखर तेजाने तळपत होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक अतिशय कृश व वृद्ध स्त्री बसलेली होती. ती भुकेने व्याकूळ झाली होती. येथील बामणी धर्म व्यवस्थेने तिची अवस्था फार फार वाईट केली होती. तिला सर्वजण अस्पृश्य समजत असत. सावित्रीबाई शेतात जात असताना ती कळवळून सावित्रीबाईंना म्हणाली, ``मुली, मला फार भूक लागली आहे. थोडी भाकरी देशील तर तुझे कल्याण होईल.' सावित्रीबाईंना गरिबांचा फार कळवळा येत असे. त्यांच्यातील `करुणा' जागृत झाली. त्यांनी डोक्यावरील पाटी खाली उतरवून त्या म्हाताऱया आजीला भाकरी व भाजी दिली. म्हातारीने सावित्रीबाईंना अंत:करणपूर्वक आशीर्वाद दिला. नंतर सावित्रीबाईंनी डोक्यावर पाटी घेतली आणि त्या घाईघाईने शेतात गेल्या. त्यांचा चेहरा थोडा कावरा-बावरा झाला होता. नवऱयाला ही गोष्ट आवडेल की नाही या विवंचनेने त्या मनातून घाबरल्या होत्या. त्यांनी घडलेली सर्व हकिकत जोतिबांना सांगितली. जोतिबांनी सावित्रीबाईंचे तोंड भरून कौतुक केले. सावित्रीबाईंना खूप खूप आनंद झाला.
जोतिबा शाळेत शिक्षण घेत होते. परंतु सनातनी बामण्यग्रस्त बामणांनी गोविंदरावांवर दडपण आणून जोतिबांचे शिक्षण बंद केले होते. पुढे गफारबेग मुंशी व इंग्रज मे. लिट्ज साहेब यांनी सगुणाबाईंच्या इच्छेप्रमाणे जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू केले. जोतिबांना पुरुषांप्रमाणेच सर्व स्त्रियांनाही शिक्षण घ्यावे, असे वाटत असे. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या धर्मपत्नीला सावित्रीबाईंना आणि बहीण सगुणाबाईंना शिक्षणाचे धडे स्वत: दिले. भारतातील सर्व स्त्रिया आणि शूद्र-अतिशूद्रांचा जर विकास करावयाचा असेल तर त्यांना सम्यक शिक्षण देणे नितांत गरजेचे आहे, अशी जोतिबांची पूर्ण धारणा होती. शिक्षण द्यावयाचे तर त्यासाठी शाळांची गरज आहे. म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. भारतातील स्त्री-शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. या शाळेत पहिल्या स्त्री-शिक्षिका होण्याचा बहुमान सावित्रीबाई फुले यांनाच मिळाला.
भारतात सर्वात प्रथम स्त्रियांसाठी शाळा जोतिबांनी काढल्यावर आणि स्त्री-शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात करताच सनातनी बामणांचे पित्त खवळले. त्यांनी फुले पती-पत्नींना शिव्या देण्यास प्रारंभ केला. आता कलियुगात धर्म बुडणार आणि फार मोठे पाप होणार असे ते बोलू लागले. परंतु जोतिबा व सावित्रीबाईंनी त्यांच्याकडे लक्ष न देता आपले शिक्षण प्रसाराचे काम सुरूच ठेवले. जोतिबांनी 15 मे 1848 रोजी महारवाड्यात अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाई आणि सगुणाबाईंनी शिकविण्याचे काम केले. त्यामुळे सनातनी बामणांचा राग अनावर झाला. त्यांनी जोतिबांचे वडील गोविंदराव यांच्यावर शाळा बंद करण्याविषयी दडपण आणणे सुरू केले. त्यामुळे पिता-पुत्रांमध्ये वादावादी होण्यास प्रारंभ झाला. शेवटी वडिलांच्या सांगण्यावरून जोतिबा व सावित्रीबाईंना घर सोडून जावे लागले. त्यावेळी त्यांना एका सज्जन मुसलमान दांपत्याने मदत केली.
सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवावयास जात असत तेव्हा रस्त्याने लोकांचे अपशब्द त्यांना सहन करावे लागत असे. काही लोक त्यांना शेण फेकून मारत असत. काही लोक त्यांना दगड फेकून मारीत असत. एकदा एक मोठा दगड त्यांच्या कानाला लागून तेथे मोठी जखम झाली आणि भळाभळा रक्त वाहू लागले. पण माता सावित्रीबाईंनी हे सर्व सहन केले. त्यांनी जखमेवर पदर घेऊन मुलामुलींना शिकविले. मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शोषित-पीडितांच्या मुलामुलींना शिक्षण देणे सुरू केल्यामुळे सनातनी समाजाने जोतिबा आणि सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. परंतु यामुळे विचलीत न होता त्या दोघांनीही शिक्षणाचा प्रचार सुरूच ठेवला. त्यामुळेच ब्रिटीश सरकारने 16 नोव्हंबर 1852 रोजी या दांपत्याचा गौरव केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सावित्रीबाई म्हणाल्या, ``बंधु-भगिनींनो, आपल्या समाजातील स्त्रिया व शूद्रातिशूद्र यांची संख्या फार मोठी आहे. या साऱया समाजाला आजवर शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले. या लोकांच्या घरात ज्ञानगंगा पोहोचवावी या उद्देशाने मी काम सुरू केले. शाळांचा व्याप सांभाळणारे इंग्रज, शाळेतील शिक्षक तसेच माई व फातमा शेख यांचा देखील हा गौरव आहे.''
थोर शिक्षिका सावित्रीबाई मनाच्या पूर्ण एकाग्रतेने मुलामुलींना शिकवित असत. एकदा त्या वर्गात मुलांना शिकविण्यात तल्लीन झाल्या होत्या. त्यावेळी अचानकपणे वर्गाच्या दारात रिव्हज साहेब शाळेची पाहणी करण्यासाइाr उभे राहिले. परंतु सावित्रबाई शिकविण्यात इतक्या तल्लीन होत्या की त्यांना दारात कोण उभे आहे, याची जाणीवही झाली नाही. तपासणी करणारे रिव्हज साहेब कौतुकाने हे सर्व पाहत होते. इतक्यात तास संपल्याची घंटा वाजली. सावित्रीबाईंचे लक्ष दारात उभे असलेल्या रिव्हज साहेबांकडे गेले. त्यांनी लगेच साहेबांचे स्वागत केले. साहेबांनी सावित्रीबाईंचे इंग्रजीमधून कौतुक केले. सावित्रीबाईंनीही इंग्रजीमधूनच आभार मानले. सावित्रीबाई इंग्रजीमधून बोलल्याचे पाहून रिव्हज साहेबांना खूप आश्चर्य वाटले. आपण सर्वांनी एक गोष्ट नीट ध्यानात घ्यावी की, सावित्रीबाईंनी केवळ शिक्षिकेची भूमिका चोख बजाविली असे नसून त्यांनी इतरही फार मोठी मानवतेची सेवा केली. त्यांच्या काळात बालविधवांची फार मोठी समस्या होती. या सर्व समस्या बामणी हिंदू धर्म व्यवस्थेनेच निर्माण केल्या होत्या. त्याकाळी मुलींची लहान वयातच लग्ने होत असत. मुलगा व मुलगी यांच्या वयात मोठे अंतर असे. त्यामुळे बालविधवांचे प्रमाण वाढत असे. परंतु मुलींना पुनर्विवाह करण्यास मात्र बामणी धर्मशास्त्रांनी प्रतिबंध केला होता. अशावेळी तारुण्यात या मुलींचे वाकडे पाऊल पडत असे. किंवा कामवासनेने उन्मत्त झालेले पुरुषच त्यांच्या तारुण्याचा उपभोग घेत असत. त्यामुळे या बालविधवांना गर्भ राहत असे. अशावेळी या मुलींना आत्महत्या करणे भाग पडत असे. या सर्व अभागी मुलींवर आत्महत्येची पाळी येऊ नये म्हणून स्वत: जोतिबा आणि सावित्रीबाईंनी आपल्या घरात बाळंतपणाची व्यवस्था केली होती. जोतिबांनी स्त्रियांसाठी व अस्पृशांसाठी शाळा काढल्यामुळे तसेच ते मानवतेची मोठी सेवा करत असल्यामुळे धर्मबाह्य कृत्य करतात असे ठरवून सनातनी बामणांनी पैसे देऊन त्यांच्यावर दोन मारेकरी पाठविले होते. एकाचे नाव धोंडीराम पुंभार तर दुसऱयाचे नाव होते रोडे रामोशी. त्यावेळी जोतिबांसोबत सावित्रीबाईंनी सुद्धा न डगमगता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड दिले. शेवटी सत्याचा जय झाला. मारणाऱयांच्या हातामधून आपोआप शस्त्र खाली गळून पडले आणि ते त्यांचे उत्तम शिष्य झाले. एक रक्षक बनला व दुसरा पंडित झाला.
सावित्रीबाई बालहत्या प्रतिबंधक गृहातील मुलांची आईच्या ममतेने सेवा करीत. त्यांना स्वत:ला जरी मूल नव्हते तरी त्यांनी अनेक बालकांच्या मातृत्वाची भूमिका 100 टक्के उत्तमरित्या बजाविली. सावित्रीबाईंनी जशी समाजसेवा केली तशीच त्यांनी साहित्यसेवा देखील केली. त्यांचा `काव्यफुले' नावाचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. सावित्रीबाईंनी 1876 ते 1896 या काळात दुष्काळ पडल्यावर मदतकेंद्रे सुरू केली. सत्यशोधक समाजात महिलांचे प्रतिनिधीत्व केले. जोतिबांच्या परिनिर्वाणानंतर त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी सावित्रीबाईंनी रुग्णांची स्वत: सेवा केली. प्लेग झालेल्या रोग्याला त्या स्वत: दवाखान्यात नेत असत. त्यांनी स्वत: एका अभागी विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता. ते पुढे डॉक्टर झाला. हा डॉक्टर यशवंत रुग्णांची सेवा करून त्यांना बरे करीत असे. पांडू नावाचा एक आठ वर्षांचा मुलगा होता. त्याला प्लेगचा रोग झाला होता. त्याला बरे करण्यासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना स्वत: सावित्रीबाईंनाच त्या संसर्गजन्य रोगाने पछाडले. आणि 10 मार्च 1897 रोजी भारतातील शोषित-पीडितांची सेवा करणारी पहिली भारतीय शिक्षिका, कारुण्याची मूर्ती आणि आम्हा सर्व भारतीयांची माता सावित्रीबाई फुले यांच्या भव्य आणि दिव्य जीवनाचा शेवट झाला.
बामणी हिंदू धर्मव्यवस्था सर्व भारतीय नागरिकांसमोर विद्येची देवता म्हणून सरस्वतीला उभी करतात. सरस्वती ही केवळ एक नदी होती. बामणांनी स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तिचे देवतेत रुपांतर केले. परंतु या बामणी हिंदू धर्म व्यवस्थेतील प्रतिकात्मक सरस्वतीने जर कुणालाही कधीही शिकविलेच नाही तर तिचा विद्येची देवता म्हणून स्वीकार करणे विज्ञान व तंत्रज्ञान युगातही उचित ठरेल काय? यामुळे मानहानी पचवून, दगड-शेणांचा मारा सहन करून, ज्या सावित्रीबाईंनी प्रत्यक्ष मुलामुलींना शिकविले त्यांच्यावर अन्याय होत नाही काय? बहुजन समाजाने याबाबतीत जागृत व्हावयाचे ठरविले नाही काय? आमच्या मते माता सावित्रीबाई फुले यांनी भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात पहिली भारतीय स्त्री-शिक्षिका होण्याचा खेराखरच बहुमान मिळविला असल्यामुळे त्याच खऱया अर्थाने विद्येची स्फूर्तीनायिका ठरतात. मला विश्वास वाटतो, की भारतातील सर्व सुजाण, विवेकवादी जनता यापुढे सरस्वतीचे स्थान माता सावित्रीबाई यांनाच देतील. पहिली भारतीय शिक्षका: माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र जयंती दिनी आम्हा सर्व भारतीय नागरिकांचे त्यांना कोटी कोटी प्रणाम!
एस.एन.भालेराव
भारताची सामाजिक व्यवस्था आणि बामणेत्तरांना शिक्षणबंदी
सविस्तर वाचा.... खालील लिंकवर क्लिक करा.....
https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_50.html
0 टिप्पण्या