नवी दिल्ली -
कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱयांनी प्रजासत्ताक दिनी ट्रक्टर रॅली काढली होती, आणि या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला.यामागे घुसखोर असल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. दरम्यान आज (26 जानेवारी) दिल्लीतील अनेक भागांमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलें. यानंतर संयुक्त किसान मोर्चाने आपली भूमिका जाहीर केली आहे. किसान मोर्चाने या प्रकरणात सांगितलं की, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांना आम्ही विरोध करीत आहोत. या घटनेमागे जे लोक जबाबदार आहेत, त्यांचा किसान मोर्चाशी काहीही संबंध नाही. याशिवाय या आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकऱयांच्या संघटनांनी या हिंसेचा निषेध केला आहे. ही आंदोलनात झालेली घुसखोरी आहे. आम्ही नेहमीच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन न करता आंदोलनाला नुकसान पोहोचू द्यायचा नाही, हाच आमचा हेतू असल्याचा किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं.
केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शेतक्रयांकडून काढण्यात आलेल्या ट्रक्टर रॅली दरम्यान अनेक दुर्दैवी घटना घडल्या. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. यात अनेक जण जखमीही झाले. तर दिल्लीतील आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, काही आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर आणि घुमटावर चढून झेंडा फडकावला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश येऊ शकलं नाही. न्यूज एजन्सी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, कायदे व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी दिल्लीच्या अनेक भागांत मोबाईल सेवा बंद करण्यात आल्या.
शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केलेल्या दाव्यानुसार, शेतकऱयांकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर अद्यापही शेतकरी नेत्यांचं नियंत्रण आहे. 'जे लोक अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते राजकीय पक्षांचे लोक आहेत. हे लोक आंदोलनाची छबी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत', असा मत राकेश टिकैत यांनी व्यक्त केले.
स्वराज अभियान प्रमुख आणि शेतकऱयांचे प्रतिनिधी योगेंद्र यादव यांनी, आंदोलनाची छबी बिघडेल असं कोणतंही कृत्य न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या शेतकरी आंदोलनाचा मान तुमच्या हातात आहे. शेतकरी आंदोलनाला नुकसान होऊ शकेल, असं कोणतंही कृत्य करू नये, असं आवाहन एका व्हीडीओद्वारे योगेंद्र यादव यांनी केले.'मी शाहजहाँपूरमध्ये आहे आणि इथे अगदी व्यवस्थितपणे रॅली सुरू आहे. तीन-चार ठिकाणी बॅरिकेडस तोडण्यात आले, असं पोलिसांकडून समजतंय. शेतकरी दुसऱया भागांतही दाखल झालेले आहेत. संयुक्त किसान मोर्चाकडून जो मार्ग निश्चित करण्यात आला आहे त्याच मार्गावर राहा. त्यापासून वेगळं होण्याचा काहीही लाभ होणार नाही. शांततेत आंदोलन केलं तरच शेतकरी जिंकू शकतील. गेल्या दोन महिन्यांपासून देशानं आणि सगळ्या जगानंच शेतकऱयांची ताकद आणि धैर्य पाहिलंय. शांती भंग झाली तर आपली ताकद भंग होईल' असंही योगेंद्र यादव यांनी म्हटलंय.
शेतकऱयांना दिल्लीतून पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. यानंतर शेतकऱयांनी उपद्रव आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. वाढता तणाव पाहून अफवा पसरू नये यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा तात्पूर्ती बंद करण्यात आली. वृत्त हाती येईपर्यंत शेकडो आंदोलनकर्ते अद्यापही लाल किल्ला परिसरात उपस्थित होते. दुसरीकडे हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहता सरकारने सिंघू, टिकरी, गाझीपूर सीमा तसेच मुकरबा चौक आणि नांगलोई भागातही इंटरनेट बंद केली. या भागातच शेतकरी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे दिल्ली मेट्रोने घ्ऊध्, दिलशान गार्डन, झिलमिल, मानसरोवर पार्क आणि जामा मशीद स्टेशन बंद केले.
याआधी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर दाखल झाले आणि खालसा पंथ आणि किसान संघटनांचा झेंडा फडकवला. जेथे तिरंगा कायम तिरंगा असतो तेथेही निदर्शकांनी त्यांचे झेंडे लावले. दरम्यान त्यांनी तिरंग्याला हटवले नाही. पोलिसांनी शेतकऱयांवर लाठीचार्ज केला असता शेतकऱयांनी पोलिसांवर दगडफेक केली. या झडपमध्ये अनेक शेतकरी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकऱयांनी ट्रक्टर वेगाने चालवले असता पोलिसांना मागे हटावे लागले. पोलिसांनी तेथून पळ काढत जवळच्या इमारतींमध्ये गेले आणि तेथून शेतकऱयांवर अश्रुधुराचा मारा केला.
याआधी गाझीपूर सीमेवरून निघालेल्या शेतकऱयांना पोलिसांनी नोएडा रोडवर अडवले आणि अश्रुधुराचा मारा केला. शेतकऱयांनी देखील पोलिसांवर दडफेक केली आणि काही गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान शेतकऱयांनी पांडवनगर पोलिस पिकेटवर ट्रक्टर चढवल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच निहंग्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या