Top Post Ad

एक किराणा दुकान

सोहनलाल शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘बाबासाहेब डॉ. आंबेडकर के संपर्क में पच्चीस वर्ष’ या पुस्तकातील ‘हिंदू कोड बिल और बाबासाहेब’ या २७ पृष्ठांच्या प्रकरणात हिंदू कोड बिलाची आवश्यकता कशी होती, कोण बिलाच्या बाजूने होते, बिलाला कोणी कशा प्रकारचा विरोध केला याची सांगोपांग समीक्षा केली आहे. यात हिंदू धर्म आणि हिंदू समाज याबाबत सुद्धा चर्चा केली आहे. अलीकडे हिंदू आणि हिंदुत्वाच्या अडून बरेच छलकपटाचे राजकीय आणि सांस्कृतिक खेळ खेळले जात असताना या मूळ हिंदी पुस्तकातील एका परिच्छेदाचा येथे मी देत असलेला मराठी अनुवाद माझ्या फेसबुकवरील मित्रांसाठी उद्बोधक ठरेल असे वाटते.

इंग्रज शासनाने शिरगणतीच्या वेळी मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी, अँग्लो इंडियन इत्यादींना वेगवेगळी जातीवाचक नावे देऊन ठेवली होती. परंतु हिंदूंसाठी कायम ‘गैरमुस्लीम’ असा शब्द लिहिला जायचा. इंग्रज शासक असे लिहायचे ते यासाठी की कारण त्यांना हिंदूंची कोणती एक धार्मिक परिभाषा, व्याख्या दिसत नव्हती, ना कोणती एक सामाजिक परिभाषा दिसत होती. जातीसमुदायांचे वेगवेगळे रीतीरिवाज, भिन्न भिन्न धार्मिक श्रद्धा आणि त्यांना एका धाग्यात गोवणारा कोणता एखादा समान व्यक्तिगत (आचार) नियम दिसून येत नव्हता. अशा द्विधा अवस्थेत इंग्रज शासक यांना (तथाकथित हिंदूंना) नेहमी ‘गैरमुस्लीम’ या शब्दाने ओळखायचे. हिंदू नेत्यांना कधीच विचार पडला नाही की आम्ही सुद्धा आपल्यासाठी कोणती एखादी सामाजिक परिभाषा, व्याख्या बनवावी. खरे म्हटले तर भारतात हिंदू कोणी नाहीच. येथे कोणी ब्राह्मण आहे, कोणी क्षत्रिय, कोणी वैश्य तर कोणी शुद्र. या चार वर्णांपुरतीच गोष्ट मर्यादित राहिली असती तरीही ती समाधानाची बाब राहिली असती, परंतु येथे कोणी सारस्वत, कोणी सनाड्य, कोणी देशस्थ, कोणी कऱ्हाडे, कोणी नागर, कोणी पुष्करणा, कोणी सुरजूपारू, कोणी बॅनर्जी, कोणी चट्टोपाध्याय, कोणी गांगुली, कोणी चक्रवर्ती, कोणी पुराणिक, कोणी पुरोहित, कोणी चौबे, कोणी छ्ब्बे, कोणी दुबे, कोणी पथक, कोणी त्रिवेदी, कोणी मिश्र, कोणी भारद्वाज, कोणी कश्यप इत्यादी अशा बामणामध्ये अनेक उपजाती आहेत.

 त्याचप्रमाणे कोणी कटोच, कोणी इलावत, कोणी चव्हाण, कोणी सूर्यवंशी, कोणी पंवार, कोणी चुडाक्त इत्यादी शेकडो राजपूत जाती होत्या ज्या स्वतःला क्षत्रियांमध्ये गणती करायच्यात. त्याचप्रमाणे वैश्यांमध्ये अग्रवाल, खंडेलवाल, महेश्वरी, बजाज, दालमियाँ, शीतलवाद, पारीख, कानिया, वाणियाँ, कराड, अरोडे, खत्री, भाटीया, गांधी, खन्ना, सेठी, ओबेरॉय इत्यादी हजारो जातीसमुदाय आहेत जे कधी स्वतःला कधी वैश्य समजतात तर कधी कधी क्षत्रियांमध्ये मोडतात. याचप्रकारे शूद्रांमध्ये असंख्य जाती आहेत. जेव्हा केव्हा यांना विचारले जाते तेव्हा यांनी मुस्लीम किंवा ख्रिश्चनांप्रमाणे कधीच सांगितले नाही की आम्ही हिंदू आहोत; परंतु हे आपल्या जातीचे किंवा उपजातीचे नाव सांगतात. हिंदू शब्द सुद्धा यांना परकीयांनी दिला. हिंदूंनी या शब्दाचा स्वीकार तर केला परंतु ‘हिंदू’ या शब्दाची कोणतीही एक व्याख्या बनवू शकले नाहीत. टिळकांनी आपली एक कोणती व्याख्या बनवली; सावरकरांनी आपली एक वेगळीच व्याख्या बनवली. सर राधाकृष्णन यांनी देखील एक व्याख्या बनवली. या भानामतीच्या पेटाऱ्यात एक खरी आणि वैज्ञानिक व्याख्या कधीच नव्हती. 

आज हिंदू शब्दाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांच्या समुदायासाठी कोणत्याही हिंदू धर्मशास्त्रात हिंदू नाव दिले गेले नाही. होय, चातुर्वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र आणि पंचम या शब्दांचा उपयोग वेदामध्ये, स्मृतीग्रंथांमध्ये व अन्य ग्रंथांमध्ये एका आहे. याच गोष्टीचा विचार करता संस्कृतचे पसिद्ध विद्वान आणि आर्यसमाजाचे प्रवर्तक स्वामी दयानंद यांनी या भारतीय समुदायाला हिंदू शब्द न देता ‘आर्य’ या शब्दाचा उपयोग करण्याचा उपदेश दिला. कारण त्यांना हिंदू हा शब्द अवैदिक वाटत होता. त्यांचे उर्दू-फारसीचे प्रसिद्ध शिष्य पंडीत लेखराम होते. त्यांनी आपल्या ‘कुलियात आर्य मुसाफिर’ या पुस्तकात हिंदू या शब्दाचा अर्थ चोर, दास, आणि काळा असा सांगितला आहे आणि आर्यसमाजींना सावध केले आहे की हिंदू शब्द एक शिवी आहे, तो भारतीयांना मुस्लीम शासकांनी हीन आणि दास समजून दिली आहे. म्हणून कोणत्याही ‘आर्य’ने स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ नये. परंतु त्यांची शिकवण आर्य समाज सुद्धा आचरणात आणू शकला नाही. ते सुद्धा हिंदूच म्हणवून घेऊ लागले. 

आता बहुतेक सर्वच भारतात या चातुर्वर्णासाठी ‘हिंदू’ शब्द लोकप्रसिद्ध झाला आहे; म्हणून याचा स्त्रोत भले कोणताही असो प्रत्येक हिंदूने आता याचा स्वीकार केलेला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘किराणा दुकानात ज्याप्रमाणे अन्नधान्यापासून सुईपर्यंत सर्व बारीकसारीक वस्तू मिळतील, परंतु किराणा नावाची कोणतीही वस्तू तुम्हाला मिळणार नाही. त्याप्रमाणे हिंदू हे एक किराणा दुकान आहे. हिंदू नावाच्या किराणा दुकानात हजारो जाती आणि उपजाती मिळतील, त्यात हिंदू मात्र कोणीच नसेल.’ हिंदू हा शब्द किती प्राचीन आहे याबद्दल अलीकडे गमजा मारल्या जात आहेत; खोटेनाटे आणि बनावट संदर्भ निर्माण करून ते ठेवले जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा परिच्छेद दिला आहे. 

– प्रल्हाद मिस्त्री

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com