14 जानेवारी 1761 रोजी अर्थात संक्रांतीला पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला. अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले, हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे, पण हा दारुण पराभव का झाला? याची कारणे काय आहेत त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो. पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिव आणि विश्वास पेशवे करत होते, त्यांच्या सैन्यात मराठा ( कुणबी माळी धनगर कायस्थ रामोशी मातंग महार आग्री इत्यादी ) हे बहुसंख्येने होते, पेशवे हे कुटुंबकबिल्यासह बाजारबुणगे घेऊन लढाईसाठी गेले होते. सुमारे पाच सहा महिन्यांचा प्रवास करून पेशवे दिल्लीच्या उत्तरेला सुमारे शंभर किलोमीटर अंतरावरील कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत याठिकाणी स्थिरावले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी कुंजपुरा जिंकले, त्यानंतर लगेच चाल करणे अपेक्षित असताना देखील सुमारे दोन महिने ते रेंगाळत राहिले. कंजपुराच्या लढाईत मराठा सरदार दत्ताजी शिंदे यांनी शत्रूबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली "बचेंगे तो और भी लढेंगे" या दत्ताजी शिंदे यांच्या बलिदानाची किंमत पेशव्यांना करता आली नाही.
ज्यावेळेस अब्दाली यमुनेच्या पलीकडे युद्धाचे नियोजन करत होता, त्यावेळेस पेशवे हे कुरुक्षेत्र या ठिकाणी होमहवन यज्ञ जपतप इत्यादी कर्मकांडात मग्न होते. अब्दालीकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती, तर पेशव्याकडे यज्ञासाठी पळी पात्र आणि पंचांग होते, पेशव्यांच्या उत्तरेकडील राजकीय धोरणामुळे राजपूत, जाट, रोहिले इत्यादी दुखावले गेले होते. त्यांना आपलंसं करण्यात अब्दाली यशस्वी झाला होता. पेशवे- अब्दाली यांची लढाई हिंदू-मुस्लीम लढाई असती, तर सुरजमल जाट हा पेशव्यांच्या मदतीला आला असता तो अब्दालिच्या बाजुने लढला नसता, परंतु ती लढाई सत्ता संघर्षाची लढाई होती,हिंदू मुसलीम धार्मिक लढाई नव्हती, हे स्पष्ट होते. अब्दालीच्या सैन्यात जी सुसूत्रता, गुप्तहेर यंत्रणा, रसद पुरवठा होता, तो पेशव्यांच्या सैन्यात नव्हता, पेशवे हे जात वर्चस्वाने प्रचंड मातले होते. पेशवे हे जगदाळे, घोरपडे, शिंदे, निंबाळकर,शिरोळे, भोसले,शितोळे,जाधवराव, पवार होळकर इत्यादी मराठा सरदारांना देखील पंगतीला घेत नव्हते, एवढेच नव्हे तर सिदनाक सारख्या महार सरदाराची राहुटी सर्वात शेवटी होती हा भेदभाव, शिवताशिवत, विटाळ अब्दालीकडे नव्हता, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण इतिहास अभ्यासक त्र्यंबक शेजवलकर यांनी पानिपत 1761 या ग्रंथात केलेले आहे.
अब्दाली युद्धाची नियोजन करत होता, तर पेशवे भविष्यमुहूर्त पाहण्यात व्यस्त होते. पेशव्यांकडे युद्धाचे कोणतेही नियोजन नव्हते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात उत्तर भारतात प्रचंड थंडी असते. या थंडीची सवय पेशव्यांना नसल्यामुळे सैनिकांचे प्रचंड हाल झाले. अब्दालीचे सैन्य उत्तरेकडचेच असल्यामुळे त्यांच्याकडे थंडीपासून बचाव करणारी उबदार कपडे होती की जी पेशव्यांकडे नव्हती. महाजी शिंदे, मल्हारराव होळकरा सारख्या सरदारांची युद्धनिती, डावपेचाचे सल्ले जर पेशव्यांनी ऐकले असते तर एक लाख सैन्य वाचले असते.
शिवाजीराजांचा समतावादी, विज्ञानवादी, प्रगल्भ दृष्टीकोण पेशव्यांकडे नसल्यामुळे पेशवे फसत गेले. पेशवे हे कर्मकांडांमध्ये आकंठ बुडालेले होते. महिलांचा, शेतकऱ्यांचा, शूद्रातिशूद्रांच सन्मान करणे, ही पेशव्यांची संस्कृती नव्हती, त्यामुळे स्वकीय सैन्य प्रचंड दुखावलेले होते. आहाराचा संबंध धर्माशी जोडल्यामुळे प्रचंड कर्मठपणा आलेला होता, अब्दालीच्या सैन्यात तो कर्मठपणा नव्हता. शरीराची झीज भरून काढून ऊर्जा देणारा महत्त्वाचा स्त्रोत हा प्रथिनांचा असतो आणि उत्तम दर्जाची प्रथिने ही मांसाहारातून मिळत असतात, अब्दालीचे सैन्य हे मटन, चिकन, फिश, अंडी बिर्याणीवर ताव मारत होते, तर पेशवे हे भगर, साबुदाणा, उकडीचे मोदक, आळूचं फदफदं पसंत करत होते.शेवटी सर्व अन्न संपल्यावर पेशव्यांवर झाडांचा पाला आणि मेल्याली जनावरं खाण्याची पाळी आली.उपास,तापास,चतुर्थी इत्यादी कर्मकांडात पेशवे बुडाले.
शिवाजी राजांच्या काळात हा कर्मठपणा महाराजांनी बाळगला नव्हता. शिवाजीराजांनी कधीही अंधश्रद्धा बाळगली नाही. त्यांच्या अनेक लढाया अमावस्येच्या रात्री होत्या. मुलगा पालथा जन्मला तेव्हा शिवाजी राजे म्हणाले "हा दिल्लीची पातशाही पालथी घालेल" म्हणजे शिवरायांचा शुभाशुभ या खुळचट कल्पनावर विश्वास नव्हता. पेशवे मात्र पदोपदी शुभाशुभ पाहण्यात व्यस्त होते. शिवाजीराजांनी आपल्या सैन्यात कधी भेदभाव केला नाही. पेशव्यांनी मराठा सरदारांना नेहमी तुच्छ लेखले. शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचाही आदर सन्मान केला. पेशव्यांनी स्वकीय महिलावरच प्रचंड अन्याय अत्याचार केले.
अब्दालीकडे जी शिस्त आणि नियोजन होते ते पेशव्यांकडे नव्हते. त्याचा पुरेपुर फायदा अब्दालिने घेऊन पेशव्यांच्या सैन्यांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद अब्दालीने तोडली. पेशवे मनोमन घाबरून गेले आपल्या स्वतःचा व कुटुंबियांच्या बचावाचा विचार करू लागले त्यामुळे फक्त रणात पराभव होणे बाकी राहिले होते. 14 जानेवारी 1761 रोजी प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आणि अवघ्या पाच ते सहा तासात अब्दालीने पेशव्यांचे एक लक्ष सैन्य कापून टाकले, हा मराठ्यांचा पराभव नसून पेशव्यांचा पराभव होता, कारण नेतृत्व आणि नियोजन पेशवे करत होते.
मराठे कुणबी माळी धनगर कायस्थ रामोशी मातंग महार आग्री पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढले तर पराभूत झाले आणि हेच बहुजन जेव्हा शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढले तेव्हा विजयी होऊन इतिहास घडविला. बहुजनांनी आतातरी ठरवायला हवं नवपेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढायचं की संविधानिक लोकशाही मानणार्या बहुजनांच्या नेतृत्वाखाली लढायचे?
--- डाॅ श्रीमंत कोकाटे यांच्या लेखनातून
0 टिप्पण्या