मुंबई :
अखेर अनेक महिन्यांनंतर सर्व सामान्य जनतेसाठी लोकल सेवा चालू होणार आहे. मुंबईकरांची लाईफलाईन पुन्हा सर्वांसाठी रूळावर येत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र रेल्वेने लोकलने प्रवास करण्यासाठी काही वेळा ठरवून दिल्या आहे. या वेळेचे पालन बंधनकारक आहे. राज्य सरकार आणि रेल्वेने मंजूर केलेली वेळ वगळून अन्य वेळेत प्रवास केला तर त्या प्रवाश्यांना कठोर शिक्षा होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी १८८ आणि रेल्वे कायदा यानुसार त्या प्रवाश्यांवर कारवाई होईल. असं स्पष्टीकरण मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केलं.
राज्य सरकार आणि रेल्वेने लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला पण आता सरकारवर अधिक ताण पडणार आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर सुरक्षा पुरवण्यासाठी २००० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात रेल्वे पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे. शिवाय कोणतीही अडचण अल्यास प्रवासी १५१२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क प्रवासी साधू शकतात.
१ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यानुसार आता सर्व प्रवाशांना सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. लोकल ट्रेनने 1 फेब्रुवारीपासून प्रवास करता येणार की, नाही असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. विशिष्ट वेळा निर्धारित करून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. करोनामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. हळूहळू लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांची हेळसांड होत होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेळेच्या काही नियमांसह सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबईतील लोकल सेवा मर्यादित वेळेत उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. मुख्य सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कार्यालयीन वेळा बदलण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलेलं आहे. या बाबतीतली सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.
0 टिप्पण्या