नेताजी सुभाषचंद्र बोस आणि तथाकथित हिंदुत्ववादी
आज काल हिंदुत्ववाद्यांना नेताजी सुभाष चंद्र बोसांची फारच आठवण येऊ लागली आहे! चला चांगली गोष्ट आहे. आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ज्या ज्या नेत्यांनी सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्याविषयी आज उशिराने का होईना ह्यांना आदर व्यक्त करावासा वाटत असेल तर आपण कशाला मध्ये यायचे? अर्थात आदर म्हणजे केवळ नेताजींची टोपी घालणे नव्हे, त्यांच्या तसबीरीला फुले वाहणे नव्हे किंवा आयटी सेल ने तयार केलेले मेसेजेस फॉरवर्ड करणे नव्हे! नेताजींच्या विचारांचा शोध घेणे आणि त्यांच्या विचारांना समजून घेणे याचा समावेश जर त्यांच्या विषयी आदर व्यक्त करताना असेल तर त्याला आपण प्रामाणिक श्रद्धांजली म्हणू शकतो.
तर मग असं पाहू की नेताजी सुभाष बाबुंचे हिंदुत्ववाद्यांबद्दल नक्की काय विचार होते?
1938 मध्ये सुभाष चंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संघटनेच्या घटनेमध्ये एक दुरुस्ती प्रस्ताव आणला. सुभाषबाबुंच्या ह्या प्रस्तावाद्वारा हिंदू-महासभा अथवा मुस्लिम लीग ह्या दोन जातीय संघटनांचे सदस्यत्व असलेल्या कुणाही व्यक्तीस काँग्रेस संघटनेच्या कोणत्याही निर्वाचित समितीचे सद्स्यत्व देण्यापासून प्रथमच रोख लावण्यात आली.
कलकत्ता कॉर्पोरेशनच्या निवडणुकींसंदर्भातल्या 1 मार्च 1940 च्या ‘फॉरवर्ड’ मधील आपल्या संपादकीय लेखात सुभाष बाबूंनी हिंदू महासभा आणि इंग्राजांच्या संगनमताबद्दल स्पष्टपणे लिहिलं आहे. ते लिहितात, "हिंदू महासभेच्या नेत्यांनी केलेल्या कट-कारस्थानाने मी व्याथित आणि दुखी झालो आहे. त्यांची ही खेळी स्वच्छ आणि शुद्ध पणाची नव्हती...... इंग्रज आणि त्यांचे भाडोत्री उमेदवार यांच्याशी साटं-लोटं करून संयुक्त अघाडी तयार करण्यामध्ये त्यांनी शक्ती पणाला लावली........ हिंदू महासभेने हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की इंग्रजांना कॉर्पोरेशनपासून दूर ठेवण्यापेक्षा त्यांना अधिक रस हा काँग्रेसला पाडण्यामध्ये आहे... "
1942 मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्धचं अखेरचं आणि निर्णायक भारत छोडो आंदोलन छेडलं. सारा देश ढवळून निघत होता. नेताजी त्यावेळी परदेशात होते आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढण्याची तयारी करीत होते.
गांधीजींशी मतभेद असूनही आणि काँग्रेसपासून दूर जाऊनही नेताजी 1942 मध्ये भारतीय जनतेला भारत छोडो आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यांनी आझाद हिंद रेडिओ द्वारा भारतीय जनतेला उद्देशून दिलेली सारी भाषणे आज इंटरनेट वर उपलब्ध आहेत.
हिंदू महासभेने मात्र ह्या आंदोलनाचा बहिष्कार करत मुस्लिम लीगची साथ दिली. हे पाहून ऑगस्ट 1942 च्या रेडीओ वरील भाषणात नेताजी म्हणाले, “... जिन्ना आणि सावरकरांना, जे आजही ब्रिटिशांबरोबर तडजोड करू पाहताहेत त्यांना मी स्पष्ट्पणे सांगू इच्छितो की, भविष्यातील उद्याच्या जगामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा लवलेशही नसेल हे लक्षात घ्या! व्यक्ती, समूह किंवा दल, जे जे म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात सहभागी होतील त्यांना उद्याच्या त्या भारतात मानाचं स्थान असेल..... पण ब्रिटिश साम्राज्याच्या पाठ राख्यांना मात्र त्या स्वतंत्र भारतात काहीही किंमत नसेल....”
आज स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेल्यावर धर्मांध शक्ती प्रबळ झालेल्या पाहून सुभाष बाबू काय म्हणाले असते? मला वाटतं, 12 मे 1940 रोजी बंगालच्या झारग्रामला त्यांनी निवडणुक सभेमध्ये लोकांना जे सांगितलं तेच नेमकं म्हणाले असते! ते म्हणाले होते, “हिंदू-महासभेने मतांची भीक मागण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन साधू आणि साध्वींना तैनात केलं आहे. त्रिशूळ आणि भगवी-वस्त्र पहाताच सामान्य हिंदूं नत-मस्तक होतात. अशा प्रकारे धर्माचा गैर-वापर करीत हिंदू-महासभेने राजकारणाच्या अखाड्यात प्रवेश केला आहे. ही कृती धर्माला अपवित्र करणारी आहे. म्हणूनच याचा विरोध करणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. ... ह्या गद्दरांना राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करा.
नेताजींना त्रिवार वंदन!!!
आशुतोष शिर्के
---------------------
गोडसेच्या गोळीने गांधी मरत नाही म्हटल्यावर गोडसेवाद्यांनी गांधींना मारण्यासाठी अनेकांचे खांदे वापरले. त्यात त्यांनी सुभाषचंद्र बोसांचाही खांदा वापरला. आणि आता तो नव्या जोमाने वापरायला पुन्हा सुरुवात केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस व गांधींमध्ये निश्चितच वैचारीक मतभेद होते. पण परस्परांवरील प्रेम मात्र तसुभरही कमी नव्हते. गांधींना प्रथमच "राष्ट्रपीता"संबोधणारे नेताजीच होते. त्यांच्या आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेडची नावेही, गांधी ब्रिगेड,नेहरु ब्रिगेड,मौलानाआझाद ब्रिगेड अशीच होती. ती हेडगेवार, गोळवळकर ब्रिगेड अशी नव्हती. संघाला तर नेताजी सुभाषचंद्रांच्या सावलीचाही विटाळ होता. न जाणो ती सावली अंगावर पडली तर आपल्यावर ब्रिटीशांची खफा मर्जी होईल ही भिती. ही त्यांची देशभक्ती. ब्रिटीशांचे पाय चाटणारेच आता "देशभक्ती"चे प्रमाणपत्र वाटताहेत. नेताजी सुभासचंद्र बोसांना त्यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन.
चंद्रकांत वानखेडे
0 टिप्पण्या