Top Post Ad

राजकारणात अशी माणसं दुरापास्त आहेत -कांतीलाल कडू


अनंत तरे यांच्या निधनाच्या वृत्ताने ठाण्यात अनेकांना धर्मवीरांच्या देहत्यागाच्या दिवसांची आठवण झाली असेल. ठाण्यात त्या दिवशी चुल पेटली नव्हती; तरे यांच्या अखेरच्या निरोपाची बातमीही काळीज चिरणारी ठरली. एक जिंदादिल माणूस अनंतात विलिन होण्यासाठी राजहंसाच्या डौलाने निघत असताना ज्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या नसतील असा माणूस मुंबई-ठाण्यात अभावानेच बघायला मिळेल, असे अनंत तरे यांनी माणसाचे जाळे विणले आहे. ठाण्यात आमदार कांती कोळी हे कोळी समाजाचे मोठे नेते. त्यानंतर अनंत तरे यांचा राजकीय उदय झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या परिस स्पर्शाने त्यांना महापौर, खासदारकीची रायगडातून दोन वेळा उमेदवारी, सेनेचे उपनेते पद आणि विधान परिषद अशी पदे दिली. आई एकवीरा संस्थांनचे अनेक वर्षे विश्वस्त ही त्यांच्यासाठी जमेची राजकीय बाजू राहिली.

आम्हाला आठवते, अनंत तरे हे शिवसेना स्टाईलने कधीच जगले नाहीत, वावरले नाहीत. आजच्या नेत्यांसारखे लाचारीने कमरेतून कधी कुणासमोरही वाकलेही नाहीत. तसा एक प्रसंग त्यांचा गाजला होता. महाराष्ट्रभर त्यांची चर्चा होती. ती तेवढी एक शिवसेना स्टाईल म्हणा किंवा सेनाप्रमुखांची प्रेरणा म्हणा... अन्याय होत असेल अशी जेव्हा खात्री पटते तेव्हा पेटून उठा... माझ्या आदेशाची वाट पाहत बसू नका. ही ती बाळासाहेबांची शिकवण तरे यांनी रायगडात एकदाच अंगीकारली आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या श्रीमुखात अशी भडकावली की, अनंत तरे यांची तेवढीच ती एक आक्रमकता पाहण्याचा अनेकांच्या नशिबी दुर्मिळ योग आला असेल. अन्यथा कुणालाही दंश न करणारा हा देवभोळा माणूस.

आम्ही 1996 मध्ये पहिल्यांदा एकवीरा दर्शनाला गेलो होतो. पूर्वाश्रमीचे मित्र गणेश कोळी यांच्या सोबत. नुकतीच स्कुटर शिकलो होतो चालवायला... गणेशचा आग्रह भारी. तो म्हणाला जाऊ या एकवीरा दर्शनाला, जत्रा आहे. मग त्याने सुचविल्याप्रमाणे राजेश गरुड या मित्राला फोन केला. त्याची एलएमएल वेस्पा मागून घेतली. सगळं गणेशच्या मर्जीप्रमाणे. गाडी आल्यावर ती आम्हीच चालवायची ही सुद्धा त्याचीच इच्छा. अखेर अंगातील बळ एकवटून नागमोडी वळणे पार करत धाडसाने घाट चढलो. अंगाला दरदरून घाम फुटलेला. आता गडावर आलो. माणसांची तोबा गर्दी. वाट काढत गडावरील अनंत तरे यांच्या कार्यालयात दोघेही गेलो. माझ्यापेक्षा गणेशची जास्त ओळख होती. आम्हाला दोघांना पाहून त्यांनी त्यांचा शस्त्रधारी अंगरक्षक दिला सोबतीला. त्याने मार्ग काढत आईच्या दरबारात नेले. नतमस्तक झालो. आईला मनोमन प्रार्थना केली. स्कुटर चालवता येत नसताना तुच इथंपर्यंत घेवून आलीस. आता घाट उतरून जाणे माझे काम नाही. ही गाडी इथं सोडून जातो. नाही तर तू स्वतः सोबत कर!

गडावरून तरेंचा निरोप घेत द्विधा मनस्थितीत खाली आलो पायथ्याशी. गाडी सुरू केली आई माऊलीचा धावा केला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. खंडाळा घाटात आलो... तोच लँब्राडोर कंपनीची जुनी स्कूटर घेवून पांढरी दाढी, डोळ्यांवर चष्मा लावलेली एक वयस्क व्यक्ती बाजूने जात होती... तीने अनपेक्षितपणे आवाज दिला... बच्चू... आयेस्ता आना... बिलकुल डरना नही... फस्ट-सेंकड मे उतरना... ते शब्द कानावर पडताच अंगात वीज चमकल्यासारखे झाले. एक अनामिक ताकद आली. इतकी म्हातारी व्यक्ती घाट उतरते तर आपण कशाला घाबरायचे म्हणत, साक्षात एकवीरा सोबतीला आली अशी खूणगाठ बांधून सुखरूप पनवेलला पोहचलो. तरे यांच्याशी माझा झालेला तो पहिला संवाद, पहिली भेट होती.

त्यानंतर ते रायगडमधून दोन वेळा निवडणूक लढले. पहिल्या वेळी त्यांचा निसटता पराभव झाला. शेकापचे दत्ता पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आणि अंतुले निवडून आले. दुसऱ्या वेळी ते पुन्हा उभे राहिले. तेव्हा शेकापने रामशेठ ठाकूर यांना निवडणुकीत उतरवले होते. निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्णय झाला, त्यावेळी ठाकूर यांनी आम्हाला बोलावून सांगितले. त्यांच्या कार्यालयात जयंत पाटील, विवेक पाटील, अनंत देशमुख अशी मोजकी मंडळी आणि पत्रकार म्हणून फक्त आम्ही... तेव्हा असे पे-रोल वरचे पत्रकार आणि पुढारी अस्तित्वात नव्हतेच.

साप्ताहिक निर्भीड लेखचा दरारा तेव्हाही होता. आम्ही पहिली बातमी टाकली... 'अंतुलेंना झोपवा आणि ठाण्याचे पार्सल परत पाठवा.' त्या बातमीने एकच खळबळ माजली. ठाकूरांसाठी असे अनेकांना अंगावर घेतले. पण, गरज सरो आणि पत्रकार, कार्यकर्ते मरो, अशा वृत्तीचे ठाकूर वारंवार उलटले... !

दरम्यान, अनंत तरे यांनी मला बोलावण्यासाठी माणसं पाठवली होती. त्यावेळी आम्ही काही गेलो नाही. पुढे एका पत्रकार परिषदेत भेट झाली. सुनील टाकले यांनी माझी ओळख करून दिली. आम्हाला वाटले तरे सेना स्टाईल अंगावर येतील... पण असे काहीही न करता अतिशय नम्रपणे हात जोडून सांगत होते... कडू सांभाळून घ्या...! असे पार्सल परत पाठवू नका... वगैरे वगैरे...

त्या नंतरच्या त्यांच्या आणखी एका पत्रकार परिषदेत काही पत्रकारांना त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी पाचशे रूपये भरलेली पाकिटे वाटली. आम्हाला जेव्हा अशी पाकिटे दिली तेव्हा ती किल्ले रायगडचे संपादक ल. पां. वालेकर आणि आम्ही नम्रपणे नाकारली. याशिवाय जिल्हा माहिती अधिकारी श्रीपाद नांदेडकर यांच्याकडे तक्रार केली. पनवेलला पत्रकारांना पैसे वाटप करण्याची ती पहिली घटना होती. आता न बोललेलं बरे. तीही घटनाही गाजली. तरे, अंतुले यांचा पराभव झाला. ठाकूर जिंकले. निर्भीडची प्रत्येक बातमी दस्तऐवज ठरली त्या निवडणुकीत.

पुढे तरे ज्या ज्या वेळी भेटले, तेव्हा एकच बोलायचे, कडू तुम्ही शेवटपर्यंत गोड बोलला नाहीत.
अगदी प्रशांत ठाकूरांच्या लग्नातील किस्सा आहे. ठाकूर यांचा कौटुंबिक सदस्य म्हणून आमच्याकडे अतिमहत्वाच्या नेत्यांच्या जेवणाची व्यवस्था दिली होती. छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते. ते लग्नाला आले होते. पोलिस जेवण तपासून गेल्यानंतर भुजबळ जेवले, ठाकुरांसोबत...! तत्पूर्वी अनंत तरे यांना भोजनासाठी कुणी तरी घेवून आले. समोर आम्हाला पाहताच, कानातील अत्तराच्या बोळ्याला त्यांच्या नेहमीच्या शैलीत हात लावून नाकाने अलगद हुंगत म्हणाले कडू, शेवट पर्यंत गोड बोलला नाहीत. माझे पार्सल परत पाठविण्यात तुम्ही मोठा हातभार लावलात... आम्ही मंद हास्य करून त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले जेवण नको. फक्त ज्यूस असेल तर द्या... आम्ही खुप आग्रह केल्यानंतर त्यांनी जिताड्याचा आस्वाद घेतला.

इतक्यात रामशेठ ठाकूर आले. तरे साहेब, जेवण झाले का, असा अपुलकीचा प्रश्न केला. तेव्हा मला खरंच जेवायचं नव्हतं पण कडू यांचा आग्रह मोडता आला नाही... नाही तरी, त्यांनी माझे पार्सल परत पाठविलेलेच आहे असे म्हणत ते हसत हसत बाहेर पडले. इतका जिंदादिल नेता... आणि निर्भीडची धारदार लेखणी ते आणि बरेच नेते तसे कधी विसरले नाहीतच.

दुखणाऱ्या नसेवर पाय ठेवत आम्ही केलेल्या बातमीने तरे घायाळ झाले नाहीत. काही नेत्यांना फक्त त्यांची स्तुती आवडते. विरोधात लिहिले की, कार्यकर्त्यांकडून हल्ले किंवा अट्रोसिटीच्या खोट्या केसेस दाखल करतात. खंडणीच्या केस करतात. मग काही पत्रकार त्यातून सुटण्यासाठी दररोज पाय चाटत बसतात. काही आव्हान देतात, शूरतेने. शुरता हीच पत्रकारिता. बाकी कोठीवरचा वेश्याव्यवसाय!

दुसरी एक घटना आठवते. कर्नाळा अभयारण्यात शिवसेनेची चिंतन बैठक होती. शिरीष बुटाला, प्रशांत पाटील तेव्हाचे जिल्हाप्रमुख होते. वसंतराव बहाडकर हे पनवेल शहर अध्यक्ष होते. त्या बैठकीत तरे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. 

त्यावर बहाडकर यांना छेडले असता... तरे काही आमचे नेते नाहीत असे ते बोलून गेले. ती बातमी आम्ही कृषीवलच्या पहिल्या पानावर छापून आणली. मग काय सांगायचे... त्या बातमीचा अलिबागपासून मातोश्रीपर्यंत वणवा पेटला. 

खुद्द सेनाप्रमुखांनी दखल घेतली बातमीची. स्थानिक नेत्यांना मातोश्रीवर बोलावून घेतले. बहाडकर यांना विचारणा झाली... त्यांनी वेळ मारून नेली. बातमीचा खुलासा छापा असे आदेश झाले. बहाडकर इतकेच म्हणाले... अवघड आहे. पत्रकार जरा वेगळा आहे. माघार घेणारा, तह करणारा नाही...!

मग जाऊ द्या, पण पुन्हा असे काही छापून येणार नाही याची दक्षता घ्या असा सल्ला देण्यात आला.

मात्र तरीही कधीही अनंत तरे यांनी आमचा दु:स्वास केला नाही. रोष ठेवला नाही. खरंच राजकारणात अशी माणसं दुरापास्त आहेत. आज त्या सर्व आठवणी त्यांच्या अस्तित्वाचा, निरपेक्ष व्यक्तिमत्वाचा अनमोल ठेवा ठेवून ते परलोकीच्या प्रवासाला निघाले आहेत...

त्या जिंदादिल नेत्याला अखेरचा जय महाराष्ट्र!

-कांतीलाल कडू - 80803180338


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com