Top Post Ad

# मुंबईडायरी


 हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे.सकाळचे ६ वाजून १० मिनिटे आणि ४७ सेंकद झाले आहेत..आणि मग 'उठी उठी गोपाळा' तत्सम गीताने पहाट उजडायची.दूध आणण्यासाठी वडीलवर्गाची दुध केंद्रावर जाण्याची लगबग चालू व्हायची.दुधाच्या पिशव्यांनी कालांतराने घराघरांत एन्ट्री केली तोवर दूध आणणे म्हणजेच मॉर्निंग वॉक, प्रभातफेरीला जाणं असायचं.आलं चेचून घातलेला दुधकम पानीज्यादा वाला चहा मुखी बोहनी म्हणून दाखवला जायचा.फक्त सुट्टीच्याच दिवशी चहाबरोबर खारी,टोस्ट चंगळ असायची.वर्किंग डेजला राहत्या मजल्यावरील सर्वांच्या घरी सकाळची डब्यांची लगीनघाई असायची.पोरांची शाळेची गडबड,मुंबईकर चाकारमान्यांची नोकरी, ऑफिसची गडबड.तर कोणाची मिटिंगची घाई.बस,ट्रेनच्या वेळापत्रकानुसार  घरोघरी पोळ्या तव्यावर सुरर्दीशी फिरायच्या,कुकरच्या शिट्ट्या टणाटण वाजायच्या. चुरचुरीत फोडणीच्या तडक्याचा आवाज अन कांदालसणाचा तेलातला तामसी गंध अख्ख्या मजल्यावर दरवळायचा. भाजीवालीने कोणती घरे काय काय भाज्या खातात ह्याचे अंदाज सरावाने बरोब्बर ताडून तशा भाज्या आग्रहाने दुरडीत न वजन करताच आदल्या दिवशी दिलेल्या असायच्या.भाज्यांची बोहनी झाली की घोटभर चहा पिऊन  डोक्यावर गोल वेटोळी ठेऊन भाज्यांनी गच्च भरलेली भलीमोठठी टोपडी घेऊन पटापट जीने उतरून लगबगीने दुसऱ्या चाळीत शिरायच्या.

तेवढ्यात आईच्या कोमल आवाजाने ,रिपीटेटिव्ह हाकेने हैराण होऊन झोपेतून उठलेला शेजारचा कॉन्व्हेंटचा टिंक्या "मम्मी,मला मिल्कबरोबर पाव पायजे"म्हणत भोकाड पसरत सुरात हंबरायचा. कसंबसं दूध पाव खात टाय ,चकचकीत बूट,युनिफॉर्म घालून स्वारी धाडधाड दादरे उतरून, वर दुसऱ्या मजल्यावर मम्मीला फ्लाईंग किस देत,टाटा करत बसमध्ये चढायची.पहिल्या मजल्यावरचे अप्पू आणि पिट्टू त्याला बघून एकमेकांकडे बघत फिदीफिदी हसायचे.गेलं हे ध्यान एकदाचं म्हणत.

रेडिओचे कमीजास्त सूर प्रत्येक घरातून ऐकू यायचे.अंगुर का दाना हुं, सुई ना ssss..नुकत्याच रिलीज झालेल्या सलमान फेम 'सनम बेवफा' सिनेमातलं गाणं,शेजाऱ्यांच्या घरातील रेडिओ ,कर्णकर्कश आवाजात रेकत असायचा आणि आपल्याला पण बॅकग्राउंड म्युझिकशिवाय अभ्यास डोक्यात पटापट शिरत नाही हा प्रत्यय एकदा शेजारच्यांचा रेडिओ खराब झाल्यानंतर आलेला असायचा.

सकाळची कामं,दुपारची जेवणं झाली की बायका धान्य,भाज्या निवडनिवडीची कामं, कुठं शिलाईमशिनवरची कामं तर कुठं घर आवराआवरीची कामं गप्पा मारत मारत करायच्या.गृहकृत्यदक्ष शब्दही माहीत नसावा अशा ह्या गृहकृत्यदक्ष बायका.परिस्थितीमुळे शिक्षणाशी काडीमोड केलेल्या ,पोरांची उच्च शिक्षणाची स्वप्ने रंगवणाऱ्या ह्या आया जर संधी मिळाली असती तर कुठल्याच MBA पेक्षा कमी कुवतीच्या नव्हत्या.

थोडंसं पाठ टेकवू म्हणता म्हणता चहाची वेळ व्हायची..तोवर वाळलेल्या कपड्यांच्या घड्या ज्याच्या त्याच्या कप्प्यात जायच्या,धुऊन कोरडी झालेली भांडी जागच्या जागी शिस्तीत जाऊन बसायची,लोड,तक्क्या परत एकदा आपटून जागच्या जागी ठेवले जायचे.शाळेतून घराकडे पोरांची पावलं दौडत यायची. शाळेत अशी मज्जा,तशी शिक्षा एका दमात सांगून झालेलं असायचं..शिक्षा असो वा बक्षिस आईचे डोळे कौतुकच बोलायचे!वाटीतला खाऊ संपवून खेळायला पोरं धुम्म ठोकायचे.नऊ नऊ पायऱ्यांचे 3 मजले तीन त्रिक नऊच्या उड्यात उतरले ,चढले जायचे.जिन्यावरून जाताना गजा आणि शोभा गुलगलू एकमेकांशी बोलताना दिसायचे.जिना उतरण्याचा वेग कमी करताक्षणी, गजा ते अचूक हेरून,ए पळ,आई बोलावतेय बघ तुझी म्हणत  लहानग्यांना पिटाळायचा. खाली उतरेस्तोर बिल्डिंगचा संदीप पाटील उर्फ सॅन्डी पिशवीभर तुडुंब रद्दी घेऊन विकायला नेताना दिसायचा. कॉलनीत कुठंतरी नुकतंच सुरू झालेल्या क्रिकेट शिबिरामध्ये नाव घालायचं ह्या इच्छेने त्याची प्रवेशफी साठीची पैसे जमवाजमव चालू असायची.

नोकरदार मंडळी सायकल, ट्रेन,बसमधून घरी परतण्याची वेळ नजीक यायची, तोवर डोईवरचे केस विंचरत बायकांच्या गप्पांना उधाण आलेलं असायचं.

बाबा येणार असल्याची चाहूल लागताच बाळगोपाळांची दाराआड लपून बाबांना भाँक करून घाबरवण्याची आणि बाबांनी घाबरायची acting करण्याची रोजची मस्ती चालायची.जाडजूड केशसंभार सावरत , वेणीफणी करत ,छोटासा गजरा किंवा सोनचाफ्याचं, गुलाबाचं फुल केसांत माळून नवऱ्याला हलकेसे स्माईल देत बायकोने कडक चहा हातात दिला की नवऱ्याचा दिवसभराचा कामाचा शीणवटा तिथल्या तिथे पळून जायचा.

टीव्हीचे फॅड नुकतंच रुजलेलं होतं त्याकाळी .त्यावर एखादी कौटुंबिक मालिका बघत,गप्पाटप्पा, जेवण उरकत,थोरामोठ्यांची चौकशी,सानांचे कोडकौतुक ,त्यांना गोष्टी,कथा,गाणी ,पाढे,श्लोककविता ऐकवत,अभ्यास करवून घेऊन दिवस कसा संपायचा हे लक्षातही यायचे नाही.

सुट्टीच्या हक्काच्या दिवशी मात्र सर्व जरा अर्धएक तास उशीराने उठत तर घरातली बाया माणसं उलट सुट्टीच्या दिवशी जरा लवकर उठत असत.साग्रसंगीत न्याहरी,जेवण आटपलं की संध्याकाळचा कोणाचा थोडंफार खरेदीचा घाट असे त्यातही कपडेभांडी खरेदीत एक स्वतःला ठेऊन चार लुगडी गावी रहाणाऱ्या सासू जावांकडे पाठवण्याचा कल,आनंद जास्त असायचा. कधी पोरांना घेऊन बागेत खेळवणे,1 बाय 2 भेळ ,कुल्फी खाणे म्हणजे फाईव्ह स्टार जगणे असायचं.

रोजचं रुटीन,दगदगीने थकलेला जीव,आठवड्यातील एक दिवसाच्या सुट्टीने रिफ्रेश व्हायचा.छोट्यामोठ्या आजारपणात रजा घ्यायची तेव्हा फॅशन नव्हती की कोणी जास्त आजाराला कुरवळायचेही नाहीत.सात,आठ आडव्याउभ्या पावलांत घराचा कार्पेट एरिया मोजता येईल एवढ्याशा घरात पण छोट्या छोट्या गोष्टींत सुखसमाधान, त्याचा आनंद साजरा करणारे,शिस्तीत तरी मस्तीत जगणारे ,तडजोडीची वल्कले परिधान केलेले ,मदतीस सदैव तत्पर अन कोणताही आपपरभाव न बाळगणारे,आपण भलं आपलं काम भलं हे ब्रीद मिरवणारे मुंबईकर ,तितकेच उत्साही अन वेळोवेळी मुंबईकर स्पिरिट दाखवणारे सच्चे मुंबईकर.तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा,जन्मभूमी,कर्मभूमीविषयी आदर आणि भावनिक नाळ जोडलेली असते आणि नाव उच्चारताच कधीतरी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आठवणीचा बांध सांडेस्तोर दुथडी भरभरून वाहतो ज्याला परत सोनेरी चोरकप्प्यात बंदिस्त करताना नामुष्की ओढवते तरीही आठवणींना कधीतरी  आंजारत,गोंजारत ,लाड करत वाहू दिलं की मन सैल होतं , आठवणीत हरखत जातं,तरंगत जातं आणि ते क्षण अनुभवण्यासाठी ह्या पिंपळपानाच्या घट्ट विणीच्या जाळीदार आठवणी कधीतरी वाहू द्यायच्या!!!

#मुंबईडायरी

सलोनी

Prasanna Adawadkar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com