येऊर गावातील जांभुळपाडा येथील गायरान असलेल्या मोकळ्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी कब्जा करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. ३ फेब्रुवारी रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येथे येऊन येथील स्थानिक आदिवासी नागरिकांसोबत धक्काबुक्की करुन तेथील सागाची झाडे उपटून फेकून दिली. इतकेच नव्हे तर स्थानिक आदिवासी नागरिकांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या लोकांनी सदर ठिकाणी सिमेंटचे खांब आणून टाकलेले आहेत. याबाबत विचारणा केली असता उलट सुलट बोलून शिवीगाळ करु लागले व धमकावू लागले. तसेच आम्ही सरकारी माणसे आहोत असे बोलू लागले. तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या ओळखपत्रांची मागणी केली असता ते ओळखपत्र दाखविण्यास तयार नव्हते. अशा पद्धतीने स्थानिक आदिवासींच्या जागेवर बेकायदेशीरपणे धमकावून कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
सागाची झाडे ही जर स्थानिक आदिवासींनी उपटून टाकली तर आपण गरीब आदिवासींवर कडक कारवाई करण्यात येते. मात्र या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सागाची झाडे बेकायदेशीररित्या उपटून टाकून तेथे बेकायदेशीररित्या खड्डे खोदलेले आहेत. तसेच तेथे सिमेंटचे खांब देखील आणून टाकलेले आहेत. याबाबत कारवाई का नाही असा सवाल स्थानिकांनी केला आहे. सदरहू लोक हे येऊर गावातील जांभुळपाडा येथील गायरान मोकळी जागा जिचा गट नं. १७ आहे बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत. सदर ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम सुरु करण्याची तयारी चालविलेली आहे. याबाबत कोण विचारणा करणार. प्रशासकीय अधिकारी याबाबत लक्ष घालणार की नाही. सदर प्रकरणाबाबत तात्काळ चौकशी करावी. तसेच शासकीय जागा बळकावून ज्यांनी गैरकायदेशीररित्या सागाची झाडे तोडून येथील स्थानिकांना धमकावले आहे. त्याचा तात्काळ शोध घेऊन सदर प्रकरणाची शहानिशा करावी व कडक कायदेशीर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल अशी मागणी करणारे पत्र आदीवासी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या