ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या शिधावाटप कार्यालयाने थकीत वीजबिल न भरल्यामुळे या कार्यालयाची वीज महावितरणने खंडित केली आहे. परिणामी गेले चार दिवस हे कार्यालय अंधारात आहे. मेणबत्ती लावून किंवा मोबाइलच्या लाइटच्या प्रकाशात येथील कर्मचारी नागरिकांची कामे करत आहेत. तेथे दैनंदिन कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक दररोज येतात. मात्र चार दिवसांपासून या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने कार्यालयाचे सर्व काम हे अंधारातच सुरू आहे.
या कार्यालयाला ९६ हजार रुपयांचे वीजबिल महावितरणने पाठवले होते. यापकी ४१ ‘फ’ या कार्यालयाने ४१ हजारांचे बिल भरले आहे, अशी माहिती या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, याच कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कार्यालयाने बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे. हे बिल भरण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्यांनी वेळेत बिल न भरल्याने अखेर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला, मात्र याचा नाहक भुर्दंड बाजूच्या कार्यालयाला सहन करावा लागत असून त्यांना चार दिवसांपासून अंधारात काम करावे लागत आहे.
या संदर्भात ठाणे मंडलातील महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आम्ही सरकारच्या आदेशाचे पालन करीत असुन त्यानुसार, लॉकडाऊन काळापासुन ज्यांनी बिलेच भरली नाहीत.अशा ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबत आवाहन करीत असल्याचे सांगितले .त्यानंतरही वीज बिले अदा केली नाही तर वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचे स्पष्ट केले
लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने घुमजाव केल्यानंतर महावितरणने थकित वीजबल वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. वीज खंडीत केल्याने नागरिकांमधे संताप व्यक्त होत आहे. आधीच शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यास आणि आता तर ऐन परिक्षेचा काळ असताना वीज कापल्याने हवालदिल झालेला पालकवर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. कोरोना काळात नागरिकांना वाढीव बिले पाठविण्यात आली होती. एकिकडे उत्पन्न बंद झाले असताना महावितरणने वीज दरवाढ लादली. त्यानंतर सरकारने दिलासा देण्याचे सांगुन घुमजाव केले. तर आता महावितरणने अन्यायकारक पद्धतीने वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा पाठविल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
0 टिप्पण्या