प्रत्येक देशाने कोविड महामारीपासून बचावाकरिता अब्जावधी करोड रुपयांची पॅकेज जाहीर केले. कर्ज काढली, नोटा छापल्या मात्र भाजपच्या मोदी सरकारने गेल्या लॉकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रुपाने तुटपुंजी मदत केली होती. ज्यांचे हातावरचे पोट आहे. त्यांना थेट मदत व्हावी अशी आमची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी होती. राज्य सरकारने ती मागणी मान्य करत थेट मदतीचे पॅकेज दिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशात कुठल्याच राज्याने पॅकेज दिले नाही. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना व राज्याची तिजोरी रिकामी असताना केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 5400 कोटी रूपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा व दळभद्रेपणा लोकांसमोर आला असल्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कुंभमेळा सारख्या मोठ्या धार्मिक उत्सवाला सूट दिल्याने तिथे कोरोनाची भयानक परिस्थिती उदभवली आहे. अश्या उत्सवांना परवानगी देणे निषेधार्ह आहे. त्याला उत्तर प्रदेश व केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार असल्याचेही स्पष्ट प्रतिपादन चव्हाण यांनी केले. कर्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी मलकापूर पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व कोविड-19 या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, युवा नेते उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान याबाबत पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं. सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करत आहेत. यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले. मी विनंती केली, की दोन शाही स्नान झाले आहेत आणि इथून पुढे कोरोनाचं संकट पाहाता कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं. देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. अशात हरिद्वार येथील महाकुंभमेळ्याला लाखोच्या संख्येनं साधू-संत आणि भाविक उपस्थित राहिले. शाही स्नानासाठीदेखील एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यानंतर अनेक संतांसह भाविकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या