एकीकडे अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम धुडकावून मनमानी पद्धतीने लग्न समारंभ करत असल्याचं जिल्हाधिकारी शैलेश यादव यांच्या लक्षात आलं. त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरं देत होते. त्यामुळे या लग्न सोहळ्यांना पोलिसांचंही अभय असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचं बेजबाबदार वर्तन पाहून संतापलेले जिल्हाधिकारी स्वतःच मैदानात उतरले.
एका रुग्णालयातून यादव यांना आयसीयू बेडमध्ये काही तांत्रिक दोष असल्याची तक्रार आली. त्यावेळी त्यांनी स्वतः तेथे जाऊन पाहणी केली आणि त्यावर उपाययोजनांचे आदेश दिले. आयसीयूतील रुग्णांची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी शहरातील स्थिती कशी आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला. रस्त्याने जाताना त्यांना मंगल कार्यालयांमध्ये नियमांचं उल्लंघन करत लग्न सोहळे होत असताना दिसले. 10 वाजल्यानंतर कोणतेही मंगल कार्यालय सुरु ठेवण्यास परवानगी नव्हती. तरीही ही मंगल कार्यालये सुरुच होती. शिवाय कमी लोकांना परवानगी असताना लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. अनेक जणांनी मास्कही घातलेला नव्हता.
एकूणच कायद्याचं उल्लंघन आणि त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका हे सर्व पाहून संतापलेल्या यादव यांनी स्वतः मंगल कार्यालयात जाऊन कारवाईला सुरुवात केली. मास्क न घातलेल्या वऱ्हाडींना थेट दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला, तर नियम तोडूनही आम्ही काहीच चुकीचं केलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट अटक करण्यात आली. . या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केलं होतं, मात्र आमदाराचा वरदहस्त असल्याने यादव यांच्यावरच कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रकरणी शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.
0 टिप्पण्या