Top Post Ad

मैत्रीच्या नात्यांना जपणारा.... मनोहर


 मैत्रीचं नातं कसं गुंफत जातं हे न सुटणारं कोडच आहे. बघता बघता आपल्या परिचयाच्या नसलेल्या कोणतेही नाते नसलेल्या व्यक्तीशी आपुलकी निर्माण होते आणि ही आपुलकी मैत्रीच्या घट्ट जाळ्यात विणली जाते. तसंच काहीसं मनोहरच्या बाबतीत माझं झालं. पाचवीच्या इयत्तेत असताना तो किस्सा आजही त्याच्या आणि माझ्या मैत्रीची आठवण करून देतो. धारावीतील काळा किल्ला शाळेत असताना शाळेच्या लगतच मनोहरच्या वडीलांचा कारखाना होता. मधली सुट्टी झाली की बहुतेक मुलं या कारखान्यात असलेल्या माठातले पाणी पिण्यासाठी जात. मग तिथे एकच कल्लोळ होत असे. मग आरडाओरडा, 

मग कारखान्यातील माणसे ती सर्व गर्दी हाकलून लावत असत. असेच एकदा पाणी पित असताना मनोहरच्या वडीलांनी मला जोरात दम भरला जा रे शाळेची घंटी वाजली. पाणी पिण्याच्या आधीच दम भरल्याने मी तसाच निघणार इतक्यात मनोहर वडिलांना म्हणाला, माझा मित्र आहे माझ्या वर्गात आहे. आम्ही जातो. मग त्याच्या वडीलांनीही मला ठिक आहे पाणी पिऊन जा असा आदेश दिला. ती सुरुवात... मग आम्ही दोघे सोबतच वर्गात आलो तिथून मग एक एक धागा विणायला सुरुवात झाली. इतकं की हे नातं अगदी सायनच्या सेकंडरी स्कूल पासून ते  डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयापर्यंत एकत्रच राहिलं आणि टिकलं... ते आजही  

शाळेत नंतर आमची मैत्री खूप दृढ झाली होती.दोघांनाही फिरायचा भलताच शौक.एकदा तर सातवी इयत्तेत असताना आम्ही दोघेही आमच्या वर्गशिक्षीका गाजरेबाईना भेटायला थेट भाईंदरला त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांनीही कुतुहलाने आमची विचारपूस केली. आणि दुसऱया दिवशी वर्गात आमचा भाईंदरप्रवास सर्व मुलांना सांगितला. मग तर शाळेत चर्चेचा विषय झालो होतो. सायनच्या सेकंडरी स्कूलमध्ये तर ही जोडी अगदी फेमस झाली होती. पी.टी.च्या शिक्षिका होत्या दाणी मॅडम त्यांना मात्र आमची मैत्री नेहमीच खटकत असायची. त्यांच्या तासिकेला आम्हाला त्या नेहमी वेगवेगळे करायच्या. काही जणांना खेळायला खाली पाठवले तर त्यात मला किंवा मनोहरला दोघांपैकी एकालाच. याचं कारण मात्र अद्यापही कळू शकलं नाही. तिथेही आम्ही आमच्या इंग्रजीच्या शिक्षिका काकतकर मॅडमच्या डोंबिवलीच्या घरी जाऊन आलो. त्यावेळेस शिक्षकांच्या घरी जाणे म्हणजे काही वेगळंच वाटायचं. त्यांच्या घरी जाऊन आल्यावर इतर वर्गमित्रांमध्ये चर्चा व्हायच्या. मनोहरच्या घरची श्रीमंती असल्याने त्याच्या घरी सर्वात पहिला कलर टिव्ही आला. त्यावेळी ठराविक कार्यक्रमच कलरमध्ये असायचे, त्यापैकी छायागित हा एक तो आवर्जून बघण्यासाठी मनोहरच्या घरी जायचो. 

इतकेच नाही तर मनोहरला अभ्यासाकरिता स्वत:ची वेगळी खोली होती. मीही कधी कधी संध्याकाळनंतर त्याच्याकडे अभ्यासाला जात असे. पण या मित्राने कधीच तु कशाला येतोस सारखा सारखा असा श्रीमंतीचा गर्व दाखवला नाही. घरच्या मंडळींना कधी कधी आमची मैत्री खटकायची. पण मग काही दिवस ब्रेक व्हायचा पुन्हा आपली मैत्रीची गाडी रुळावर यायची. त्यातही वेळ मिळाला की आम्ही बाहेर धूम. मला आजही आठवतो तो भयानक प्रसंग... जेव्हा मनोहर आणि मी कारने घरी येत होते. आणि सायन सर्कलवर अचानक  बसने टर्न घेतला. त्या बसने आमच्या समोर येण्याआधीच मनोहरने जो टर्न घेतला तो आमच्या दोघांचाही जीव वाचवणारा ठरला. नाहीतर आज कोण सुबोध आणि कोण मनोहर 

महाविद्यालयीन शिक्षणाकरिता सुरुवातीची दोन वर्षे चेतना कॉलेजमध्ये असल्याने  आमची मैत्री संपुष्टात आली होती. मात्र नियतीला काही औरच मंजूर होतं. आणि मी पुन्हा पुढची डिग्रीची तीन वर्षे वडाळ्याला आंबेडकर महाविद्यालयात दाखल झालो. जिथे मनोहर आधीपासूनच होता. पण शाळेतील मैत्रीचा आनंद महाविद्यालयात मात्र मिळाला नाही. कारण मनोहरला कॉलेज करून लगेच त्याच्या कारखान्यात पोहोचायचे असे. त्यामुळे फार कमी वेळ मिळायचा. मी ही छोट्या मोठ्या व्यवसायाला सुरुवात केल्यामुळे मलाही वेळ नसायचा. मात्र जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मात्र भरपूर एन्जॉय. महाविद्यालयात जमलेला ग्रुप आणि त्यांच्यासोबत केलेला गोव्यापर्यंतचा प्रवास हा कधीच विसरता येणार नाही. 

जीवनातील पुढील लक्ष्य न ठरवल्याने तसेच कुणाचे  त्या पद्धतीने मार्गदर्शनही न झाल्याने जीवनात काही ठोस करता आले नाही. दैनंदिन जीवन जगण्याव्यतिरिक्त मनोहरनेही काही केले नाही आणि मलाही कदाचित ते जमले नाही. कुटुंबाची सुरुवात झाल्यानंतर मात्र मैत्रीचे धागे विस्कळीत झाले. संसाराच्या रहाटगाड्यात अडकल्यानंतर मागील 15 ते 20 वर्षे एकमेकांना भेटलो देखील नाही. मागच्या दोन तीन वर्षापासून मनोहरने पुन्हा फोनवरून माझी विचारपूस करायला सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा मैत्रीतले ते क्षण आठवायला सुरुवात झाली.  

अनायासे एक मे रोजी मनोहरचा वाढदिवस येत आहे. मागच्या आठवणीनी माझ्या मनात काहूर माजवलं आणि मग ते शब्दात उतरवायचं ठरवलं. आठवणी तर खूप आहेत. 12-15 वर्षाच्या मैत्रीच्या....  त्या शब्दात मांडायला जागा अपुरी आहे. पण एक किस्सा नेहमीच मला आठवतो तो म्हणजे मनोहरच्या गायकीचा. मुकेशच्या दर्दभऱया आवाजाची तो हुबेहूब नक्कल करायचा, ओ मेहबुबा...ओ मेहबुबा हे त्याचं खास गाणं अगदी मुकेशच गात आहे की काय असं वाटायचं. विद्यालयात तर मित्र मंडळी रिकामी तासिका असली की मनोहरचं एक गाणं हमखास ऐकायची. एकदा तर काकतकर मॅडमनीही त्याला गायला सांगितलं मी सोबतच बसलो होतो. माझं लक्ष नव्हतं आणि अचानक पट्ट्याने `ऋणानुबंधाच्या जिथूनं पडल्या गाठी... हे गाणं सुरु केलं त्यातच माझ्या तोंडूनही अचानक अंतरानंतरचा आलाप आला. आणि सर्व वर्गात हसं झालं. दोन तीन दिवस तर या गाण्याचीच चर्चा.  

चांगल्या आवाजाची देणगी मिळाली होती मनोहरला. मात्र त्यासाठी लागणारं पाठबळ मात्र त्याला कोणी देऊ शकलं नाही. अगदी अभिनयाची हौस देखील होती. परंतु ती पुर्ण करता आली नाही ही खंत मात्र कायमची टोचत रहाते. माझी अभिनयाची हौस मी महाविद्यालयाच्या नाटकातून पूर्ण केली. मात्र मनोहरने एक `पळवा पळवी' चित्रपटात आपला चेहरा दाखवण्यापलिकडे काहीही मिळवलं नाही. नंतर संसाराच्या गाड्यात अडकला आणि आपलं स्वत्वं विसरून गेला. आजही त्याची जिवनातली धडपड तशीच चालू आहे. जशी पूर्वी होती. एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे लगेच कारखान्यात जाऊन काम करायचे. पण त्याने कधी नैराश्य जाणवू दिले नाही आणि एवढ्या वर्षानंतर आजही तो तसाच त्याच सुरात त्याच शब्दात गप्पा मारतो. विशेष म्हणजे कोणत्याही मित्र-मैत्रिणीला विसरलेला नाही. आवर्जून विचारपूस करतो. मित्रा तुझं जीवनगाणं असंच स्फूरत राहो हीच तुला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com