ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले, लोकांमध्ये प्रचंड संताप;
हॉस्पिटलकडून मृतदेह ताब्यात न देता पैसे भरण्याची मागणी
भिवंडीचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली ६ जणांची चौकशी समिती स्थापन
नाशिक नंतर पालघर आणि आता ठाण्यामध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ठाण्यातील वर्तकनगर भागातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार जणांना मृत्यू झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून ठाण्यात ऑक्सिजनची आणीबाणीसदृश परिस्थिती आहे, असाही आरोप आता होऊ लागला आहे. वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला. मृतदेह ताब्यात न देता पैसे भरण्याची मागणी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून केली जात असल्याचा आरोपही काही नातेवाईकांनी केला. यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी या हॉस्पिटलमधील प्रमुख डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. अरूण शेलार, करूण पष्टे, विजय पाटील, दिनेश पणकार या चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रूग्णांच्या मृत्यूला रूग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर रूग्ण अत्यवस्थ होते असं रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. वेदांत रूग्णालयाच्या बाहेर नातेवाईक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.वेदांत हॉस्पिटलमध्ये हा प्रकार चौथ्यांदा घडल्याचेही एका नातेवाईकाने यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांना सांगितले.
हॉस्पिटलमधील ३५ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात चार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ३५ आणि १२ या दोन क्रमांकांचे अतिदक्षता विभाग आहेत. त्यापैकी ३५ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात ४ मृत्यू झाले आहेत. ऑक्सिजनचा साठा कमी असेल तर मृत्यूचे प्रमाण जास्त असते. तरीही चौकशी समिती यासंदर्भात अंतिम निष्कर्ष काढेल मग निर्णय घेतला जाईल. भिवंडीचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली ६ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकारीही आहेत. ते या प्रकरणाची चौकशी करतील.
-- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
सदर घटना ही दुदैवी असली तरीही यात नक्की चूक कुणाची ते शोधून काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये आयएएस दर्जाचे अधिकारी असणारे भिवंडी मनपा आयुक्त, ठाण्याचे सिव्हिल सर्जन आणि अन्य चार डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती आजच्या आज या घटनेची चौकशी करून आपला अहवाल प्रशासनाला सादर करेल. या अहवालात जे कुणी दोषी ठरेल त्याच्यावर कठोर कारवाई करणार . - पालकमंत्री एकनाथ शिंदे
0 टिप्पण्या