मागील मार्च महिन्यातील वीजदेयके सध्याच्या एप्रिल महिन्यात वितरीत करण्यात आली आहेत. या वीजदेयकांच्या रक्कमा तब्बल ५ ते ८ हजार रुपयांच्या घरात पोहचल्या आहेत. २ लाइट आणि २ पंखे व टिव्हीचा वापर करणाऱ्या ग्राहकांना सर्वसाधारणपणे ५०० ते ७०० रुपयांपर्यंत वीजआकाराच्या देयकाची रक्कम भरावी लागत होती. फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरासरी याच करआकारणीची देयके भरावी लागली होती. मात्र मार्च महिन्यात अचानक ४, ५ ते थेट ८ हजार रुपयांची देयके येऊन धडकल्याने ग्राहकांमध्ये वाढीव देयकांमुळे घबराट पसरली आहे. मार्च महिन्यात अचानक वीजमीटर भरधाव कसे काय धावू लागले याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
वीजदेयकांची रक्कम नियमित भरणाऱ्या वीजग्राहकांना देखील वाढीव वीजदेकांचा फटका बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वसाधारण ८०० रुपये रक्कमेचे आलेले देयक थेट ४, ५ ते थेट ८ हजार रुपयांवर कसे पोहचले असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. मागील वर्षी देखील ऐन लॉकडाऊनच्या कालावधीत अशीच वाढीव दराची देयके ग्राहकांच्या हाती सोपविण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये करण्यात आल्याचे ग्राहकांचे म्हणने आहे. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शहापूर वीजवितरण कंपनीचे उपअभियंता अविनाश कटकवार यांच्याशी संपर्क साधला असता, मी आजारी असून उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. व वीजग्राहकांवर ओढवलेल्या वाढीव वीजदराच्या संकटाकडे दुर्लक्ष केले. शहापूर वीजवितरणच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा राजकीय पक्षांच्या तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वेगळी ट्रिटमेंट दिली जात असल्यानेच पदाधिकाऱ्यांकडून डोळेझाक केली जात असून त्यामुळे वीजग्राहकांच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले आहे, असाही आरोप वाढीव वीजदेयकांचा फटका बसलेल्या शहापूर तालुक्यातील नागरिकांकडून होऊ लागला आहे.
"शहापूर तालुक्यात लॉकडाऊन नंतर अचानक मार्च महिन्यात तब्बल ५ ते ८ हजार रुपयांपर्यंतची वीजदेयके आकारण्यात आल्याने लॉकडाऊनच्या कालावधीतच वीजमीटर भरधाव कसे काय धावू लागले, असा प्रश्न उपस्थित झाल्याने यामागच्या गौडबंगालाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याकरीता ग्राहकांकडून मुख्यमंत्री व वीजमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे."
0 टिप्पण्या