याप्रसंगी उप मुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, एम.एम.आर.डी.ए. आयुक्त आर.ए.राजीव उपस्थित होते.
कल्याण शहराला जोडणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीवर बांधण्यात आलेल्या चार मार्गिकांच्या पुलापैकी पहिल्या दोन मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. पत्रिपुलाचे काम आणि गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर दुर्गाडी पुलापाशी वाहतूक वाढल्याने वाहतूककोंडी होऊ लागली होती. या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरूनच दोन्ही मार्गिका सुरू होत्या. अशात या नवीन पुलाच्या दोन मार्गिका सुरू झाल्याने शहराला वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
या नवीन पुलामुळे जुन्या पुलावरून येणे आणि नव्या पुलावरून जाणे शक्य होणार असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. तर मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिकवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजणोली उड्डाणपुलावरील दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्यामुळे भिवंडी जंक्शनपाशी होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. त्याचा फायदा या महामार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या छोट्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
0 टिप्पण्या