भिवंडी महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून क्लस्टर योजनेच्या लाल फितीत प्रलंबीतच राहिला आहे. कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहत आहे. शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी शासकीय नियमांना तिलांजली देत छोट्या छोट्या जागेत वाटेल तसा मनमानी कारभार करीत इमारती बांधल्या आहेत.भिवंडी,उल्हासनगर,कल्याण - डोंबिवली या तिन्ही महापालिका हद्दीत बहुतांश इमारतींना प्रशासनाची परवानगी नसल्याने या अनधिकृत बांधकामांच्या गुणवत्तेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.मात्र लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे या इमारतींना घरपट्टी मिळत असल्याने त्या आधारावर बांधकाम व्यावसायिक आपल्या इमारती कमी किंमतींमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरजुंना विकत आहेत.
या इमारतींच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाल्याने या इमारती पंधरा ते वीस वर्षांच्या काळात धोकादायक ठरविण्यात येत आहेत.मात्र या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पालिका प्रशासन नोटीस देऊन आपले हात झटकत असते.त्यातच या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कोणतीही खबरदारी व जबाबदारी घेत नसल्याने या शोकडो धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या राहिवासींच्या निवाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या राज्यात व देशात कोरोनाची महामारी आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु असल्याने या धोकादायक इमारतीत राहणारी कुटुंबे हवालदिल झाले आहेत.
कामगार नगरीत ४ वर्षात इमारती कोसळून ५७ जणांचा मृत्यू कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी महापालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या ५८९ असून धोकादायक इमारतींची संख्या ४०० एवढी आहे.अशा प्रकारे शहरात सुमारे ९८९ इमारती धोकादायक आहेत. या सर्व इमारतींना महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती पालिकेचे उपायुक्त दिपक झिंजाड यांनी दिली आहे. दुसरीकडे या धोकादायक इमारतींना नोटीस देऊन देखील काही नागरिक आपल्या परिवाराचे स्थलांतर करीत नाहीत.त्यामुळे पावसाळ्यात या धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर २५ जण जखमी झाले आहेत . यापूर्वी देखील शहरात धोकादायक व अनधिकृत इमारती कोसळून नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटूंब राहत आहेत. त्यात सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर गेल्या चार वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६७ जण जखमी झाले आहेत. शासनाने दखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासनाने कागदावर कारवाई झाल्याचे दाखवून इमारतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
0 टिप्पण्या