ठाणे- खारटन रोड सिडको परिसराजवळ असलेल्या बौद्ध विहाराच्या जागेवर प्रचंड अतिक्रमण झाले आहे. या जागेवर अनेकांनी हळूहळू अनधिकृत बांधकामे करून जागा बळकवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या आठवड्यात देखील या ठिकाणी अनधिकृतरित्या घराचे बांधकाम करण्यात येत होते याची माहिती स्थानिक कार्यकर्ते प्रदिप पांडुरंग शिंदे व किशोर कांबळे यांना मिळताच त्यांनी सदरच्या जागेवर जाऊन अतिक्रमित बांधकाम थांबविण्याची विनंती केली परंतु संबंधिताने त्या बाबतची कोणतीही दखल न घेता बांधकाम सुरू ठेवले. अखेर या अनाधिकृत बांधकामाविरूध्द सहाय्यक आयुक्त नौपाडा प्रभाग समिती ठाणे महापालिका यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. अनाधिकृत रीत्या करण्यात येत असलेले बांधकाम तात्काळ तोडण्यात यावे तसेच हे बांधकाम करणाऱ्या विरोधात एम आर टी पी नुसार कारवाई करण्याची मागणी देखील स्थानिक कार्यकर्ते प्रदिप शिंदे यांनी केली.
ठाणे महानगर पालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन दि.२६ मे (बुद्ध पौर्मिमा) रोजी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन अनाधिकृत बांधकाम बंद पाडले. तसेच दि.२७ मे रोजी सहाय्यक आयुक्त चव्हाण यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट दिली. त्यावेळी स्थानिक कार्यकर्ते प्रदिप पांडुरंग शिंदे व किशोर कांबळे यांनी त्यांनां जागा समितीच्या मालकीची असुन त्या जागेवर अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे याची माहिती दिली. तसेच सदर बांधकाम आणि या जागेवर झालेली इतर बांधकामे तात्काळ तोडण्यात यावीत अशी विनंती केली. त्यानुसार सहा.आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले.
सदरच्या आदेशानुसार २८ मे रोजी अनाधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. बौध्द विहाराची जागा हडप करून अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात तक्रारी अर्ज करण्या पासुन ते अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यापर्यंत बहुमोल साथ देणारे किशोर कांबळे तसेच अनाधिकृत बांधकाम हटविण्या करिता आग्रही असणारे व त्यासाठीं सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास तयार असणारे बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मोते, हेमचंद्र सुर्वे,भालचंद्र भालेराव,बनकर या सर्वांचे स्थानिक बौद्ध उपासक उपासिकांनी आभार व्यक्त केले आहेत. यापुढेही अशा अनधिकृत बाबी बुद्धविहाराच्या बाबतीत घडणार नाही. अनेक बांधकामे अनधिकृतपणे बुद्धविहाराच्या जागेवर बांधण्यात आलेली आहेत. या सर्वांवर लवकरच कारवाईकरिता ठाणे महानगर पालिकेला पत्र देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रदीप शिंदे यांनी व्यक्त केली.
बुद्धविहाराविषयी थोडेसे......
बौध्द विहार बनविण्यासाठी बौध्द धम्म चक्र प्रवर्तन समिती मार्फत बौध्द विहार बनविण्याची कल्पना चांगो शिंदे यांना सुचली व त्यासाठी महात्मा फुले नगर, खारटन रोड, ठाणा कॉलेज समोरील सरकारी जागा समितीच्या ताब्यात घेतली. त्यानंतर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल, बौध्द विहाराचे स्तुप, वाचनालय, कार्यालय, व्यायाम शाळा असे छोट्या प्रमाणात बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन करण्यास भारतीय बौध्द महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाऊपासिका मिराताई आंबेडकर तसेच साथी जॉर्ज फर्नांडीस हे आले होते. त्यावेळेस इतर समाजातील राजकीय नेते सुध्दा होते.
1986 साली त्यातील काही भाग जिल्हा धिकारी, ठाणे यांची परवानगी न घेतल्यामुळे त्यांच्या कार्यालयाकडून तोडण्यात आला. या संदर्भात जनआंदोलन झाले, मोर्चे काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस असे उपोषण करण्यात आले. परंतु त्याला यश आले नाही. सन 2001 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यावेळेस तत्कालिन जिल्हाधिकारी चहल व उपजिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी चांगो शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून नविन प्रपोजल सादर करण्यास सांगितले. दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सरकार बदलले आणि सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. मग सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयात याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. बुद्धविहाराच्या कामाला त्यांनीही प्राधान्य देवून लक्ष घातले. मात्र पुन्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांनीही या कामी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यावेळी. मा. छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी देखील याबाबत समितीच्या माध्यमातून चर्चा सुरु होती. इतकेच नव्हे तर अजित पवार जलसंपदा मंत्री, गणेश नाईक, पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्याकडेही या प्रश्नाची बाजू मांडली. त्यांनी हा प्रश्न कॅबीनेटपुढे आणला. त्यानंतर युतीचे सरकार आले. नारायण राणे मुख्यमंत्री होते.त्यांनी देखील या कामी सहकार्य केले. तत्कालिन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी या प्रश्नास प्राधान्य देवून सहकार्य दिल्यामुळे सदर ठराव कॅबीनेटसमोर पास झाला. त्यामुळे 17 लाख रुपये जमिनीची किंमत लावण्यात आली होती ती रु 3, 36,000/- वर आणली गेली. 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने बौध्द धम्म चक्र प्रवर्तन समितीला मंजुर केलेली 10 गुंठे जागा 13 एप्रिल 2006 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महसूलमंत्री यांचेकडे बोलवून महसूल खात्याकडून मंजुरी आदेश देण्यात आला. त्यानंतर वर्षभराच्या काळामध्ये स्थानिक पातळीवर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या कायदेशीर बाबींच्या अडचणी संबंधीत अधिकाऱ्याना भेटून त्या मार्गी लावण्यात आल्या. २००८ च्या २० मार्च रोजी सदर जागेवर सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते नियोजित बुद्धविहाराचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यानंतर हे बुद्धविहार होणे अपेक्षित असतानाच समितीमध्ये अंतर्गत वाद होऊन हे काम ठप्प झाले. मधल्या काळात समितीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इतकेच नव्हे तर बुद्धविहाराचा ध्यास घेतलेले समितीचे सर्वेसर्वा चांगो शिंदे यांचेही अकाली निधन झाले. त्यामुळे काही काळाने त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी छोटीशी बुद्धप्रतिमा स्थापन केली. त्यानंतर या ठिकाणी खुल्या स्टेजवर मोठी बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र ही जागा अद्यापही मोकळी असल्याने अतिक्रमणाला सामोरे जावे लागत आहे.
(टीप: याबाबत अधिक माहिती असल्यास ती जरूर कळवावी ...... किंवा काही त्रुटी असल्यास कळवावे....... अधिकची माहिती यामध्ये समाविष्ट केली जाईल तसेच त्रुटी वगळल्या जातील. )
0 टिप्पण्या