शहापूर -ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील हरीचंद्रगड आभयारण्यातील जंगलात पालीची दुर्मिळ प्रजात आढळून आली आहे. ही पाल 'निमास्पिस' कुळातील असून या पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे संबोधले जात असल्याचे वन्यजीव संशोधकांचे म्हणने आहे. ही पाल पश्चिम घाटातील या भागातील प्रदेशनिष्ठ आहे. या शोधामुळे भारतातील पालींच्या संख्येत भर पडली आहे. 'निमास्पिस' या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. भारतामध्ये ‘निमास्पिस’या कुळातील आजवर ५० प्रजातींची नोंद झालेली आहे. त्या पश्चिम घाट, मैसूरचे पठार, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान आणि निकोबार बेटांवरती बेसाल्ट खडकावर आढळतात. त्यांचे मुख्य खाद्य हे कीटक असून त्या नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत.
हरीचंद्रगड अभयारण्यातील 'निमास्पिस उत्तरघाटी' या पालीचा शोध लावण्यात आला आहे. आकारशास्त्राच्या आधारे या नव्या पालीचा अभ्यास करुन ती विज्ञानासाठी नवीन असल्याचे उलगडण्यात आले आहे. पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील टोकाकडे 'निमास्पिस' कुळातील आजवर आढळलेली ही पहिलीच पाल आहे. त्यामुळे तिचे नामकरण 'उत्तरघाटी' असे करण्यात आले असून तिचे सुचवलेले इंग्रजीतील नामकरण हरीचंद्रगडाच्या नावावरून पालीला सुचविण्यात आले आहे. सामान्य नाव हरिश्चंद्रगड डेवॉर्क गेको तसेच नॉर्दन डेवॉर्क गेको अशीही दोन नावे सुचविण्यात आली आहेत. यापैकी एक नाव निश्चित करण्यात येणार आहे, असे संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले.
‘निमास्पिस पालीच्या’ कुळामध्ये आता नव्या प्रजातींची भर पडली आहे. संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अग्रवाल यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामधून पालीच्या नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन' आणि 'नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्स्टिट्यूट'च्या मदतीने हे संशोधन समोर आले आहे.
"पश्चिम घाट जैवविविधतेने खच्चून भरलेला आहे. नुकतेच संशोधन झालेली पाल प्रादेशिक अतिप्राचीन अधिवासाचे प्रतिक आहे. ---( डाॅ. व्ही. बी. गिरी, जैवसंशोधक)
0 टिप्पण्या