आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते. त्यातूनच राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. अफाट कर्तृत्ववान असलेला हा राजा. ज्याच्या कार्यकर्तृत्वाला मर्यादा नव्हत्याच. त्यांची कार्यशक्ती जबरदस्त होती. ध्येय दृष्टी निश्चित होती. सुक्ष्म निरीक्षण आणि दाट अवलोकन यांचे सुयोग्य मिश्रण होते, म्हणूनच ते लोकनेता होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महान व्यक्तींमुळे आपणास सामाजिक न्यायाचा पाठ अनुभवयास मिळतो. सामाजिक समतेची एक मोठी शिकवण यांनी आपणास दिली. यातील प्रत्येकाचे कार्य हे आभाळापेक्षाही मोठे आहे. असे म्हटले तर ते अतिशयोक्ती नसेल. आपल्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नतीसाठी जे-जे काही करता येईल त्या-त्या बाबींकडे अत्यंत जागरुकतेने लक्ष देऊन त्यांची पूर्तता करण्याचे काम राजर्षीनी केले. शिक्षण, सामाजिक समता, जाती निरपेक्षता यांच्याकडे पाहण्याची ज्यांची दृष्टी ही खूप वेगळी व तेजस्वी होती. शिक्षण, समाज, धर्म, हक्क, अर्थ अशा विविध घटकांचा विचार करून राजर्षी शाहू महाराज लोकसेवा करीत असत.
स्वयंप्रेरणेचा मंत्र
स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जेव्हा आपण ब्रिटीशांच्या गुलामगिरीत होतो. त्यावेळी ती नष्ट करण्यासाठी असलेल्या डोळस नेतृत्वाच्या गरजेबद्दल राजर्षी शाहू महाराजांचे सडेतोड आणि स्पष्ट विचार सर्व काही सांगून जातात. हिंदुस्थानातील जीवघेणी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको आहेत. कृतीने जातीभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील "असे पुढारी पाहिजेत. अस्पृश्यांसाठी काय ? किंवा इतर कोणासाठी काय? कुठलीही विधायक गोष्ट घडवायची असेल तर कृतीशील मानवतावादी पुढारीच हवा आहे, असे ते म्हणत. कुणावरही न विसंबता स्वत:च स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा 'स्वंयप्रेरणेचा मंत्र' हा शाहू महाराजांच्या कार्याचा मूलमंत्र आहे.
लोकनेता राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक वेळा आपले विचार लोकांच्या समोर अत्यंत प्रखरतेने व प्रगटपणे मांडले. त्यांच्या प्रत्येक भाषणातून लोकांच्याप्रती, समाजाच्याप्रती असलेला त्यांचा आप्तपणाचा भाव स्पष्टपणे दिसून येतो. अशाच एका भाषणाच्या प्रसंगी ते म्हणतात, आपण मला आज आपला असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शेवटपर्यंत प्रेम दृढ ठेवा, मी देखील कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला, तरी त्याला न जुमानता उन्नतीच्या महात्कार्यास शक्य तेवढा हातभार लावण्यास कधीही माघार घेणार नाही, असे आश्वासन देऊन मी आपले भाषण संपवितो.
(संदर्भ- क्रांतिसुक्ते राजर्षि छत्रपती शाहू. संपादक : डॉ. एस. एस. भोसले)
डॉ. राजू पाटोदकर, मुंबई
----------------------------
0 टिप्पण्या