ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज विविध ठिकाणांची १५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईतंर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाघबिळ गाव येथे स्टील्ट अधिक ५ मजली, ४८ खोल्यांच्या अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून सदर इमारतीच्या पहिल्या २ मजल्याचे स्लॅब तोडण्यात आले. त्याचबरोबर कावेसर वाघबिळ येथील स्वस्तिक रेगालिया बिल्डिंगच्या मागे असलेले ५ अनधिकृत आरसीसी गाळ्यांचे बांधकाम व १ अनधिकृत इमारतीच्या फूटिंगचे बांधकाम संपूर्णपणे निष्कासित करण्यात आले आहे. तसेच बाळकुम पाडा नं.१ येथील स्टील्ट अधिक ६ मजली अनधिकृत इमारतीवर सुद्धा निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून लोढा स्प्लेंडोरा येथील २ गाळ्यांच्या फाऊंडेशनचे बांधकाम देखील निष्कासीत करण्यात आले.
कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील खारेगाव येथील तळ अधिक सहा मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत सहाव्या मजल्याचे १० स्लॅब इलेक्ट्रिक ब्रेकर व गॅस कटरने तोडून ८ कॉलम पूर्णतः तोडण्यात आले. तसेच पाखाडी नाका येथे तळ अधिक ७ मजली अनधिकृत इमारतीमधील चौथ्या, पाचव्या व सहाव्या मजल्यावरील एकूण ६ रूमचे अंतर्गत बांधकाम देखील तोडण्यात आले.
तसेच दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील बांधकामधारक अजीम मुकरी यांच्या तळ अधिक 3 मजले व्याप्त असलेल्या इमारतीच्या ४ मजल्यावरील वाढीव बांधकाम व ३ आरसीसी स्लॅब निष्कसित करण्यात आले. तर वर्तकनगर प्रभाग समितीममधील हँगआउट हुक्का पार्लर आणि साई सम्राट लॉजचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, प्रणाली घोंगे, अलका खैरे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली. दरम्यान यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.
0 टिप्पण्या