शहापूर : कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सगळ्यांनाच नव्याने कळले आहे. मनुष्य व सर्व प्राण्यांना प्राणवायू पुरविणारे वृक्ष जोपासणे आता फारच महत्त्वाचे बनले आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशन तर्फे त्यासाठीच वनविभागा सोबत सुधारीत चुल प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून बुधवारी मौजे भावसे येथे तानसा अभयारण्यातील खर्डी आणि तानसा परिक्षेत्रामध्ये तीन हजार सुधारीत चुलींचे वाटप करण्यात आले आहे. शहापूर तालुक्यातील तानसा व खर्डी परिक्षेत्रातील गावांमध्ये चूल वाटपाचा शुभारंभ जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेडचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट पंकज मल्हान, वासिंद प्लांट हेड राजेश जैन, खर्डी वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी डी. व्ही. ठाकूर, तानसा वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन .चन्ने, यांच्या हस्ते पार पडला.
हा प्रकल्प खर्डी, तानसा, वैतरणा व परळी या चार परिक्षेत्रामध्ये राबविण्यात येत असून त्याद्वारे अभयारण्यातील साडेसात हजार कुटुंबांना या चुली मोफत देण्यात येत असल्याचे कंपनीचे प्रवक्ते चिन्मय पालेकर यांनी सांगितले. बाॅश या जर्मन कंपनीने बनवलेल्या या सुधारित चुली अभयारण्यातील सर्व आदिवासीबहुल गावातील महिलांसाठी फायदेशीर ठरतील असा विश्वास भावसे ग्रामस्थांनी व्यक्त केला. या चुलीच्या वाटपासाठी LAHS या संस्थेची समन्वयक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. संस्थेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोईर व जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे अमोल सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली.
साडेसात हजार कुटुंबांना लागणारा लाकूड फाटा निम्म्याने कमी झाल्याने जंगल वाचण्यास नक्कीच मदत होणार आहे. जंगल वाचण्याबरोबरच महिलांचे कष्ट कमी होण्यास व धूर कमी होत असल्याने आरोग्य चांगले राहाण्यासही मदत होणार आहे."- डी. व्ही. ठाकूर, वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी, खर्डी
"शहापूर तालुक्याच्या सर्वागीण विकासा साठी जेएसडब्ल्यू सदैव तत्पर राहील. - सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट पंकज मल्हान, जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेड
0 टिप्पण्या