Top Post Ad

अण्णा भाऊ ! दलित-शोषित, कष्टकऱ्यांचा कलावंत, साहित्यरत्न

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे .... प्रस्थापित साहित्य, संस्कृतीतील ठेकेदारांच्या विरोधात दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या साहित्याने जी स्वत:ची स्वतंत्र, वेगळी वाट चोखाळली त्याचे बीज हे अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय भाषणात होती.  "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे! अण्णाभाऊंच्या याच दलित शब्दाचा व्यापक संदर्भ घेऊन १९६०- ७० या दोन दशकांत महाराष्ट्रात दलित साहित्य चळवळ फोफावली. 

-------------------

  "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे!' पारंपरिक धार्मिक मुल्यांना, पुराणकथांना छेद देणारे हे ऐतिहासिक विधान लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी २ मार्च १९५८ साली मुंबईत आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय भाषणात केले होते. कॉ.अण्णाभाऊ साठे यांची लिखित भाषणे विशेष उपलब्ध नाहीत., परंतु जी आहेत त्यामधील हे भाषण मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरावा इतके महत्त्वपूर्ण आहे. याच भाषणामध्ये नंतरच्या काळात दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या साहित्याने जी स्वत:ची स्वतंत्र, वेगळी वाट चोखाळली त्याची बीजंही आहेत.मराठीतील विद्रोही साहित्याच्या उगमाची प्रेरणाही याच भाषणात आहे.

"दलित साहित्यिकांचे वेगळे संमेलन भरवून हा वेगळा सवतासुभा का उभा करता? या प्रश्नाला अण्णाभाऊ आपल्या भाषणात सुरुवातीलाच स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात, दलित माणसांचा मोठा वर्ग या महाराष्ट्रात असून त्याचे जग वेगळे आहे. हा वर्ग या देशात अग्रेसर असून त्याच्या न्यायी संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक पाया आहे.परंतु पिळला जाणारा नि कष्ट करणारा दलित म्हणून तो निराळा आहे, नि उपेक्षित आहे आणि अशा या दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. अण्णाभाऊ साठे यांची ही भूमिका म्हणजे महात्मा फुले यांनी मराठी साहित्य संमेलन भरवणाऱ्या तत्कालीन ग्रंथकार सभेला ११ जून १८८५ ला जे पत्र पाठविले होते त्या मतांशी जुळणारे आहे. त्यात फुले म्हणतात,"त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आपल्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही ". सारांश, त्यांच्यात मिसळल्याने आम्हा शुद्रादि अतिशुद्रांचा काही एक फायदा होणे नाही, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे." त्यावेळी  म. फुल्यांनी जे उच्चवर्णीयांच्यां ग्रंथकार सभेस(साहित्य संमेलनास) सुनावले होते तेच अण्णाभाऊ साठे आमचा वेगळ्या साहित्य संमेलनाचा सवतासुभा का हे सांगताना म्हणतात,"दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही.' 

कॉ.अण्णाभाऊंच्या या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लेखकांना सांगतात की,"हा दलित आजच्या समाजाचे ह्रदय आहे.... हा माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही, तोपर्यंत तो दलिताचे साहित्य निर्माण करू शकत नाही. तो त्या वर्गाशी एकनिष्ठ असावा लागतो. तो लेखक धेयवादी असला पाहिजे नि त्याची कल्पकता सुद्धा अशीच हवी. तु गुलाम नाहीस,हे जग तुझ्या हातांवर आहे,यांची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव जनतेबरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्याच्या बरोबर जनता असते.  

   लेखक- साहित्यिकांना कष्टकऱ्यांचे खडतर आयुष्य समजून घेण्यासाठी अण्णाभाऊ सांगतात,"उंच विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून तो विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरूंगांना पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि... कधी कधी त्याची मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मरण्याची आगळी रीत लेखकाने समजून घ्यावी‌. 

या भाषणाचा शेवट अण्णाभाऊ रशियन क्रांतीतील महान कम्युनिस्ट साहित्यिक, ज्यांना अण्णाभाऊंनी त्यांचा साहित्यातील गुरू मानले होते,त्या मॅक्झिम गॉर्कीच्या महत्त्वाच्या उद्गारातून केला आहे, गॉर्की म्हणतो,"मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे,त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगातल्या बंधनातून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस,तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस,असा साक्षात्कार माणसाला करून देणे, हे वाङमयाचे खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङमय सदैव क्रांतिकारी असते' म्हणून परिपूर्ण साहित्य निर्माण करूया आणि लेखण्या दलितांच्या चरणी अर्पण करूया. 

अण्णाभाऊ त्यांच्या भाषणातील"दलित" शब्द केवळ जातीच्या मर्यादित अर्थाने वापरत नाहीत तर ते तो शब्द द्वय अर्थाने म्हणजे जाती-वर्ग या दोन्ही अर्थाने वापरतात. त्या शब्दाला ते व्यापक रुप देतात. अण्णाभाऊ,"पृथ्वी" ही दलितांच्या तळहातावर तरलेली आहे, असे म्हणतात तेव्हा,ते केवळ एका विशिष्ट देशाबद्दल बोलत नाही,तर समग्र जगाबद्दल बोलतात.  जातीच्या अर्थाने असलेला दलित हा भारत वगळता कुठेही नाही, त्यामुळे अण्णाभाऊंच्या या विधानातील "दलित"हा कष्टकरी या अर्थानेच आहे. जो जगभर आपल्या श्रमाने नवनिर्मिती करतोय व त्याच्या हातांवर,बाहुंवरच हे जग तोललेलं आहे, हे सार्वत्रिक सत्य अण्णाभाऊ सांगतात.

अण्णाभाऊ साठे यांच्या दलित साहित्य संमेलनातील या भाषणानंतर महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृतीत अस्मिता मेळावा, अस्मितादर्श मेळावा, प्रगत साहित्य सभा, आंबेडकरी साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन,आदिवासी साहित्य संमेलन, "दलित, आदिवासी,ग्रामिण साहित्य संमेलन, "भटके-विमुक्त साहित्य संमेलन,ते विद्रोही मराठी साहित्य संमेलनापर्यंतचा प्रवास सुरू आहे आणि आता तर दिवंगत कॉ.गोविंद पानसरे यांनी खुद्द अण्णा भाऊंच्याच नावाने, "कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन "सुरू केले आहे ज्याला मोठा प्रतिसाद दलित,बहुजनांतील नवशिक्षितवर्गाकडून मिळत आहे.

कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या याच दलित शब्दाचा व्यापक संदर्भ घेऊन १९६०- ७० या दोन दशकांत महाराष्ट्रात दलित साहित्य चळवळ फोफावली. बाबुराव बागुल त्याचे नेतृत्व करीत होते व त्यांच्यावर कॉ.अण्णाभाऊ साठे यांचाच साहित्यिक म्हणून प्रभाव होता.ज्या मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अण्णाभाऊ साठे यांची कम्युनिस्ट कार्यकर्ता, शाहिर, साहित्यिक म्हणून राजकीय, सामाजिक, विचारांची जडण-घडण ज्या कॉम्रेड.आर.बी.मोरे, कॉ.के.एम.साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, त्या नेत्यांचा व अण्णाभाऊ यांचा वैचारिक प्रभावही बाबुराव बागुलांवरही पडला होता. प्रारंभीच्या काळातील लघुनियतकालीक संप्रदयातील व नंतर दलित पँथरचे नेते झालेले राजा ढाले यांच्यावरही प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांचा प्रभाव पहोता. पहिल्या दलित साहित्य संमेलनाला अण्णाभाऊंना चिराग नगरच्या घरून संमेलन स्थळी घेऊन आणण्याची जबाबदाररीही इतरांसह राजा ढाले यांनी पार पाडली होती आणि अण्णाभाऊंनी,त्यांना "वाचा व विचार करा "असा संदेश त्यावेळी दिल्याचे राजा ढाले आवर्जून सांगायचे.दलित पॅंथरचे एक संस्थापक व विद्रोही कवी,कालकथित नामदेव ढसाळ, कवी-कथाकार व पॅन्थर नेते अर्जून डांगळे, कथाकार वामन होवाळ, लेखक-कवी दया पवार आदींवर कॉ.अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यिक, वैचारिक प्रभाव होता. मराठवाड्यातील मिलिंद महाविद्यालयातील डॉ.म.ना.वानखेडे, वामन निंबाळकर, डॉ.यशवंत मनोहर,सुखराम हिवराळे, डॉ. अविनाश डोळस आदी अनेकजण अण्णाभाऊ व बाबुराव बागुल यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते.

 महाराष्ट्रात १९७२ ला "दलित पँथर" या लढाऊ तरुणांच्या संघटनेची स्थापना झाली.दलित पँथरच्या जाहिरनाम्यातही दलित शब्दांची व्याख्या ही जातीच्या पलिकडे जाऊन शोषित, कष्टकरी,सर्वहारा अशी व्यापक भूमिकेसह मांडण्यात आली होती आणि या भूमिकेची प्रेरणाही अण्णाभाऊ साठे यांच्या दलित साहित्य संमेलनाच्या भाषणातून मिळाली असण्याची अधिक शक्यता आहे.त्यामुळेच दलित पँथरचा हा ऐतिहासिक जाहिरनामा बाबुराव बागुलांच्या "आम्ही" या अनियतकालीकात प्रथम प्रकाशित झाला होता. सत्तरचे दशक हे महाराष्ट्रात दलित साहित्य व दलित पँथरच्या चळवळीच्या झंझावाताचे महत्त्वपूर्ण दशक होते.त्याच कालखंडात देश स्तरावरही एकीकडे जयप्रकाश नारायण यांची चळवळ, दुसरीकडे कम्युनिस्ट,नक्षलवाद्यांचे, लढे, संघर्ष, महाराष्ट्रात बाबा आढावांचे" एक गाव एक पाणवठा'आंदोलन, युक्रांद, मागोवा, दलित युवक आघाडीचे दलित, आदिवासी अत्याचार, शोषणा विरोधात, शिष्यवृत्तीसाठी संघर्ष आणि  बौद्ध धम्म स्विकारानंतर नव्या शिक्षित पिढीला आलेलं सामाजिक, सांस्कृतिक आत्मभान... त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रस्थापित साहित्य, संस्कृतीतील ठेकेदारांच्या व प्रस्थापित राजकीय पक्ष व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असंतोष धुमसत होता. तोच कविता,कथा, साहित्यातून स्फोटक शब्दात व्यक्त होऊ लागला.पँथर्सच्या नेत्यांची ज्वलंत अन्यायाविरुद्ध आग ओकणारी भाषणे होऊ लागली,त्याच काळात राजा ढाले यांचा "काळा स्वातंत्र्य दिनाचा'"साधना"तील लेख गाजला होता. त्यापूर्वी नामदेव ढसाळांच्या "गोलपिठा"ने साहित्य-संस्कृतीत प्रचंड खळबळ माजवली होती. या दलित साहित्य व दलित पँथरच्या हल्ला बोलनंतर महाराष्ट्रातील सांस्कृतिक विश्व ढवळून निघाले.

याच पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, शोषित समाजातील कवी, लेखक, साहित्यिक आपली साहित्याची पाळेमुळे,आपले नायक-नायिका शोधू लागले. ते त्यांना कॉ.अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागुल, वामन होवाळ, शंकरराव खरात यांच्या कथा,कादंबऱ्यात तर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ,ज.वी.पवार, दया पवार, अर्जून डांगळे, त्र्यंबक सपकाळे,वामन निंबाळकर,डॉ. यशवंत मनोहर आदींच्या कवितांमध्ये दिसू लागले.याच सांस्कृतिक बदलाच्या काळात कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला नवा उजाळा मिळू लागला. यपूर्वी अण्णा भाऊंची लोकशाहीर म्हणून अधिक ओळख होती, कारण मराठीतील प्रस्थापित भांडवली,ब्राम्हणी साहित्य संस्कृतीच्या ठेकेदारांनी, तथाकथित समीक्षकांनी मार्क्सवादी विचारवंत ग्राम्शीच्या परिभाषेतील "जैविक बुद्धिजिवी"असलेल्या  अण्णाभाऊ साठे यांना साहित्यिकाचा सन्मान कधी दिलाच नाही व त्यांच्या साहित्याकडे हेतूत: दुर्लक्षच केले व उपेक्षाच केली. त्याची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे ते दलित समाजातील होते व दुसरे म्हणजे ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. दलित साहित्याच्या अगोदरच्या काळात फक्त महाराष्ट्रातील, देशातील व जगातील मार्क्सवादी, प्रगतिशील, पुरोगामी व फुले-आंबेडकरी विचार मानणाऱ्यांनीच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची योग्य दखल घेतली. त्यांचे साहित्य देश-विदेशातील भाषेत भाषांतरित केले व त्यांच्या साहित्याची जगाला ओळख करून दिली. त्यांचे प्रारंभीचे साहित्य गाणी,लावण्या, पोवाडे,कथा कादंबरी, वृत्तपत्रातील लेखन हे कम्युनिस्ट पक्षाने वा पक्षाशी संबंधित प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले व सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणूनच अण्णाभाऊ अभिमानाने अखेर पर्यंत सांगत होते की,"मला कम्युनिस्ट पार्टीने लेखक म्हणून घडविले'.

कॉ.अण्णाभाऊ साठे यांची मराठी साहित्यात मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाऊ लागली ती १९८० नंतरच्या काळात. कारण दलित साहित्याचा प्रभाव असलेला नवशिक्षितवर्ग दलित, शोषित, बहुजनांमधून महाविद्यालये  आणि विद्यापीठात शिकू व शिकवू लागला होता.साहित्य संस्कृतीचे निकषही बदलू लागले होते. दलित-शोषित, कष्टकऱ्यांच्या साहित्याला मान्यता मिळू लागली होती.साहित्याच्या केंद्रस्थानी दलित साहित्य आले होते.त्यामुळे दलित, बहुजनांमधील तरुण अभ्यासक कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर लेख, प्रबंध लिहू लागले, विशेषांक काढू लागले. याच कालखंडाच्या मागेपुढे, दलित साहित्य व दलित पँथरने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जी लढाऊ, क्रांतिकारी भूमिका व प्रतिमा पुढे आणण्याचा जो प्रयत्न केला ती तत्कालिन कॉंग्रेस सत्ताधाऱ्यांना त्रासदायक व अडचणीची वाटू लागली. कारण दलित पँथरच्या व्यापक भूमिकेमुळे बौद्धेतर दलित जातसमुहातील मातंग,भटके-विमुक्त जातीतील शिक्षित, जागरूक तरुण पँथरमार्फत आंबेडकरी विचारांकडे वळू लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला नेता मानू लागला. तेव्हा याला शह देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी मातंग अस्मितेच्या नावांने व्यापक दलित समुहातून मातंग समाजाला वेगळे काढण्यासाठी कधी वीर लहुजी साळवे यांच्या नावाचा तर कधी अण्णाभाऊंच्या नावाचा वापर केला.अण्णाभाऊंना कधी साहित्यरत्न,तर  कधी साहित्यसम्राट अशी मर्यादित ओळख देऊन जनमानसात ठसविण्याचा प्रयत्न केला.अण्णा भाऊ साहित्यरत्न होतेच परंतू तेवढेच त्यांचे कार्य नव्हते. हे करताना कॉम्रेड अण्णाभाऊंचा सत्ताधारी पक्ष आणि श्रीमंत-धनिकवर्गाच्या विरोधात असलेला त्यांचा क्रांतिकारी विचार मात्र जाणीवपूर्वक दडवून ठेवला.त्यांची "कॉम्रेड", कम्युनिस्ट म्हणून असलेली खरी ओळख पुसण्याचाच प्रयत्न केला आणि केवळ मातंग समाजातील श्रेष्ठ साहित्यिक म्हणूनच अण्णाभाऊंना पुढे आणले. 

ऐवढेच नव्हे तर ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अण्णाभाऊंनी,"जग बदल घालूनी घाव! सांगुनी गेले मला भीमराव' हे गाजलेले गाणे लिहिले त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर राजकीय स्पर्धेसाठी अण्णा भाऊंच्या प्रतिमेचा राजकीय प्रतिक म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला. बौद्ध विरोधात मातंग अशी भांडणं लावण्याचा व दलित एकजुटीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. हातात घटना घेतलेल्या डॉ.बाबासाहेबांचे फोटो,शिल्प प्रसिद्ध आहेत,आता तशाच प्रकारे संगणकाच्या फोटोशॉपवर धोतर झब्बा घातलेला व हातात फकिराची प्रत हातात घेतलेला अण्णाभाऊंचा कृत्रिम फोटो सध्या जोरात व्हायरल केला जात आहे. तेव्हा यामागचे  तेव्हाच्या व आताच्या सत्ताधाऱ्यांचे  राजकारण नीट समजून घेण्याची गरज आहे.

व्यवस्थेने जग बदलाची, शोषण मुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या कॉ.अण्णाभाऊंना केवळ जातीच्या अस्मितेत मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या तळाच्या जात-वर्गिय समुहाने त्या जातीतील महान व्यक्ती,नेत्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक म्हणून पुढे आणणे चूक वा वावगेही नाही,ते स्वाभाविकच आहे.परंतु त्या महान व्यक्तिमत्त्वाला केवळ त्या जातीतच बंदिस्त करणे हा ही त्या महान व्यक्तीवरचा अन्यायच आहे. अण्णा भाऊ साठे तर कम्युनिस्ट असल्याने ते जात,प्रांत,धर्म, देशांच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय मानवी समुहाशी त्यांनी नाते जोडले होते. तेव्हा अशा अण्णाभाऊ यांना केवळ जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे जे काम काही नेत्यांनी व सत्ताधाऱ्यांनी स्वत:चे राजकीय हितसंबंध वापरण्यासाठी जे केले ते आता थांबले पाहिजे आणि कॉ.अण्णा भाऊ साठे यांची कम्युनिस्ट म्हणून असलेली खरी ओळख व त्यांचा राजकीय विचार पुढे आणला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांची कॉम्रेड म्हणून असलेली खरी ओळख जपूया व ते ज्या जात-वर्गिय शोषणाच्या धर्माधंतेच्या विरोधात लढून समतेचे, समाजसत्तावादाचे स्वप्न पहात होते,त्यासाठी झटुया.! हेच खरे अण्णा भाऊंच्या विचारांनां कृतिशील अभिवादन ठरेल. 

(मुंबई  विद्यापीठाच्या आँगस्ट २०२० च्या "संभाषण" या महाजालावरील नियतकालिकावरुन साभार.)

सुबोध मोरे - ९८१९९९६०२९.   subodhvidrohi@gmail.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com