सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व विनाविलंब दोषींवर आरोपपत्र ठेवावे. सदर महिलेच्या मागे तिच्या मुली व आई असे कुटुंबिय आहेत. यांना पूर्ण सुरक्षितता मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तरी त्यांच्या सुरक्षित निवासासाठी आवश्यक कारवाई / तरतूद करण्यात यावी. सदर महिलेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेच्या तरतुदीनुसार तात्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे. या अमानुष गुन्ह्यातील आरोपीना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सदर खटला फास्ट ट्रॅक (जलदगती) न्यायालयात चालवावा अशा मागण्यां निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
एका आरोपीला अटक झाली असून बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे त्वरित दाखल केले आहेत. आता पोस्टमॉर्टेमचा अहवाल येताच 302 कलम देखील लावण्यात येईल, गुन्हेगारांना योग्य शासन होईल आणि पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. शिष्टमंडळात जमसंच्या राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर, उपाध्यक्ष सोन्या गिल, राज्य कमिटी सदस्य सुगंधी फ्रान्सिस, सरोजा स्वामी, विद्या सुरडकर यांचा समावेश होता. दिल्लीतील नुकतेच घडलेले प्रकरण आणि मुंबईतील ही घटना ह्या भयानक घटनांविरोधात जमसंच्या सर्व जिल्ह्यांनी इतर समविचारी महिला संघटनांना सोबत घेऊन ताबडतोब निषेध निदर्शने करावीत, असे आवाहन जमसंची राज्य कमिटी सर्वांना करीत आहे.
- साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झालेला आहे. एका सक्षम अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांची एक विशेष टीम या प्रकरणाचा तपास करणार आहे. पुढील एक महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, पोलिसांनी आरोपी चौहानला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा उत्तर प्रदेश येथील मूळचा राहणारा आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे पुढे आले आहे. अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
- अत्यावस्थ असल्याने पीडित महिलेचा जबाब पोलिसांना घेता आला नाही. त्यामुळे तिच्यासोबत नेमके काय घडले याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. परंतू, आमचा तपास सुरु आहे. पोलीस तपासात सर्व बाबी पुढे येतील. 9 सप्टेंबरच्या रात्री 3.20 वाजता पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) एक फोन आला. हा फोन मुबईतील साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात असलेल्या एका कंपनीच्या चौकीदाराचा होता. त्याने इथे एका महिलेला जबरी मारहाण सुरु असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली.
- नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्याला घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच लक्षात आले की महिलेची प्रकृती अत्यंत अत्यावस्थ आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकीदाराकडून एका टेम्पोची चावी घेऊन महिलेला स्वत: टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. घटनेची भीषणता लक्षात घेऊन साकीनाका पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले. त्यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले, अशीही माहिती हेमंत नगराळे यांनी या वेळी दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात 307,376, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडित महिलेच्या मृत्यूनंतर 302 अन्वये हत्येच्या आरोपाचा गुन्हाही पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केला असल्याचे नगराळे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या