Top Post Ad

डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

   ठाणे, :  डोंबिवलीतील कोपर पुलाच्या लोकार्पणसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज झाला.  या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रविंद्र फाटक, राहुल दामले, विकास म्हात्रे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, आदी उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते.  

यावेळी डोंबिवली मधील कोपर उड्डाणपूलाचे लोकार्पण, कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय प्राणवायु निर्मिती प्रकल्प व अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ह. भ. प. सावळाराम महाराजा संकुलातील प्राणवायु निर्मिती प्रकल्प, शास्त्रीनगर रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, आय वॉर्ड व महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, टिटवाळामधील मांडा येथील स्व. गोपीनाथ मुंडे अग्निशमन केंद्र, तेजस्विनी बस व कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस आणि आंबिवली येथील जैवविविधता उद्यान या प्रकल्पांचे लोकार्पण झाले. तसेच कोवीड अवॉर्ड मिळाल्याबद्दल आयुक्त डॉ. सुर्यवंशी तसेच शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांचा पालकमंत्री  शिंदे यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला.

 यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, कोरोनामुळे गेले दीड ते दोन वर्षाचा काळ कठीण होता. जग ठप्प झाले असले तरी लोकांच्या हिताची कामे पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाला धन्यवाद देतो. चांगल्या गोष्टींचे व कामांचे कौतुक झालंच पाहिजे. कोवीड काळात केलेल्या कार्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेला कोवीड इनोव्हेशन अवॉर्ड हे त्यांनी आपल्या कामाने कमावले आहे. कोवीड निर्बंधानंतर टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करत आहोत. कोवीड काळात आपण आरोग्य सुविधा उभारण्यावर भर दिला आहे.

            ठाण्यातील सहायक आयुक्तांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या दुर्देवी घटनेनंतर  अधिक कठोरतेने कायद्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले की, आपण जनतेचे सेवक म्हणून काम करत आहोत. कल्याण डोंबिवलीतील नेत्यांनी एकत्र बसून या शहरासाठी काय हवे ते सांगावे. या शहरांसाठी येथील जनतेसाठी  रस्ते, पूल, रुग्णालय असे जे जे आवश्यक आहे, ते ते राज्य सरकारकडून दिले जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. येथील काही रस्त्यांची जबाबदारी केंद्र शासन घेणार असेल तर राज्य शासन त्याला सहकार्य करेल. केंद्र व राज्य मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, कोविड काळात महानगरपालिकेने गतीने कामे केली आहेत. ही गती आणखी वाढवायला हवी. राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडे ठाणे जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठी प्राधान्याने निधी देता येईल. भिवंडी- कल्याण मेट्रो आणि मुरबाड रेल्वेच्या कामासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.

पालकमंत्री शिंदे म्हणाले की, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. कोवीड विरुद्धच्या लढाईच्या कामांची दखल मा. पंतप्रधान व सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांनीही महाराष्ट्राचे अनुकरण केले आहे. या काळात कल्याण डोंबिवली महानगपालिकेने चांगले काम केले आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोपर पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. कोपर पुलाला समांतर आणखी एक अतिरिक्त पुल करण्यासाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी  यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com