ठाणे महापालिकेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या बालमृत्यू अन्वेषण समितीचा महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे सविस्तर आढावा घेवून बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालमृत्यू अन्वेषण समितीची आढावा बैठक महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुनीता उबाळे, बालरोगतज्ञ डॉ. शैलजा पोतदार, ठाणे अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचे डॉ. राम गुंडाळे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. संजय किनरे यांच्यासह महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्राचे तसेच खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
या बैठकीत एप्रिल २०२१ ते माहे जुलै २०२१ या काळात झालेल्या बालमृत्यूबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात माहे एप्रिल २०२१ मध्ये १, माहे मे २०२१ मध्ये २, जून २०२१ मध्ये ७ तर जुलै २०२१ मध्ये ६ बालमृत्यू झाले आहेत. या काळात झालेल्या सर्व बालमृत्यूची वैद्यकीय कारणे समिती समोर सादर करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शहरातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांचा अवलंब करून प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
0 टिप्पण्या