डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतदेशात एक बलवान विरोधी पक्ष जो भविष्यात सत्तेत येऊ शकतो अशा 'रिपब्लिकन पक्षाची नुसती संकल्पनाच मांडली नाही तर त्या पक्षाचे धोरण कसे असावे, त्याची रचना कशी असावी, त्याची घटना कशी असावी व त्याची उद्दिष्ट्ये काय असावीत याबाबत तपशिलवार लिखाण करुन ठेवले. त्यांनी दलितांना नव्हे तर समग्र भारतीय जनतेला 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' (भारतीय लोकसत्ताक पक्ष) काय असेल याबद्दल एक
# खुले पत्र लिहून ठेवले होते. ते खुलेपत्र त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 'प्रबुद्ध भारत' मध्ये १ ऑक्टोबर १९५७ च्या अंकात छापले होते. बाबासाहेबांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाची अधिकृतरित्या स्थापना बाबासाहेबांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ साली' शेडयुल्ड कास्ट फेडरेशन'चे विसर्जन करुन केली. पक्षाच्या स्थापनेचा आज ५५ वा वर्धपान दिन आहे. बाबासाहेबांच्या राजकीय सामाजिक विचारांना राजकारणात अनुवादीत करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने या देशातील सर्व जाती धर्मिय, सर्व भाषिक जनतेचे आकांक्षाचे प्रतिक म्हणून व गोरगरीब जनतेचे प्रभावी राजकीय हत्यार म्हणून भारतीय राजकारणात प्रभावी भूमिका बजावयास पाहिजे होती. परंतु आज रिपब्लिकन पक्षाचे चित्र पाहिले तर हा पक्ष भारतीय राजकारणात असून नसल्यासारखा अस्तित्वहीन झाला आहे.
पक्ष म्हणजे काय ? या शिर्षकाने बाबासाहेबांनी पक्षाची व्याख्या, त्याच्या आवश्यकता, त्याचे नेतृत्व, त्याचे संघटन, त्याचे ध्येय आणि धोरण, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचे कार्यक्रम, त्याचे डावपेच याबाबत बाबासाहेबांनी अत्यंत सुक्ष्म आणि मूलभूत लिखाण करून ठेवले. परंतु अतिशय दुखाने नमूट करावे लागले की बाबासाहेबांच्या संकल्पनेतील व त्यांच्या खुल्या पत्रावर आधारित पक्ष संघटन उभेच राहिले नाही. 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' असे म्हणवून घेणाऱ्या फक्त टोळ्याच शिल्लक आहेत. ज्यांनी बाबासाहेबांच्या खुल्या पत्राचे वाचनही केलेले नाही आणि केले असेल तर ते ज्यांना अजिबात कळलेले नाही अशा नालायक आणि स्वार्थी, नि भंपक गटबाज नेत्यांचे खाजगी गट आर.पी.आय.म्हणून मिरवताहेत. असे म्हणतात की महापुरूषाचा मृत्यू दोनदा होतो. एकदा तो निसर्ग नियमाने होतो आणि दुसऱ्यांदा महापुरुषाचे अनुयायीच त्याचा मृत्यू घडवून आणतात. बाबासाहेबांच्या बाबतीच हेच घडले.
रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गटबाज नेत्यांच्या किळसवाण्या लाचार थोबाडांचे घृणास्पद प्रदर्शन चौका चौकात मांडले जाईल. बाबासाहेबांच्या विचारांशी बेइमानी करणाऱ्या पावली छटाक गटसम्राटांचा निर्लज्ज उत्सव या निमित्ताने प्रत्येक टोळ्यांचे फर्निचर (ज्यांना कार्यकर्ते म्हणतात) साजरे करतील. अत्यंत उबग आणणारे हे हिडिस चित्र वारंवार बघावे लागते. या देशात सामाजिक न्यायाच्या तत्त्वाची इतिश्री झालीय. ८४ टक्के जनता अत्यंत हलाखीचे जीवन जगते आहे. गरीबी आणि श्रीमंतीमध्ये देशाच्या आकारा एव्हढी दरी पडली आहे. बेरोजगारी, महागाईने जनता होरपळून निघाली आहे. दलित आदिवासींवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. जागतिकीकरणाच्या डि.जे.च्या आवाजात दुःखी जनतेचा आक्रोश ऐकू येईनासा झाला आहे. विकासाच्या नावाखाली दारिद्ररेषेखालची जनता विस्थापित होत चालली आहे. जात्यंध आणि धर्मांध मूलतत्त्ववादी फॅसिस्ट टोळ्या बेलगाम झाल्या आहेत. अशा वेळी रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांची निष्क्रियता ठळकपणे उठून दिसतेय. ज्यांना या देशातील धर्मनिरपेक्ष वीण विस्कटून टाकून हिंदुत्वाधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करून बाबासाहेबांच्या संविधानाला कायमचे निकालात काढावयाचे आहे, अशा रक्तपिपासू शक्तींच्या वेठबिगारांची भूमिका सद्य स्वयंघोषित आर.पी.आय. नेतृत्व पार पाडीत आहे.
बाबासाहेबांनी 'गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड करुन उठेल' असे क्रांतीसूत्र सांगितले. पण ज्यांना गुलामगिरीचा तिरस्कार आहे तेच बंड करुन उठतात. आता तर ज्यांना सत्तेच्या खरकटाची चव लागली आहे असे गुलाम कशाला बंड करतील ? गुलामगिरीतच ज्यांना आनंद प्राप्ती होते ते स्वेच्छेनेच गुलाम होतात. असल्या गुलाम प्रवृत्तीच्या सौदेबाज नेतृत्वाकडून रिपब्लिकन पक्ष उभारण्याची अपेक्षा करणे ही वंचना आहे. आंबेडकर अनुयायी मरण पत्करील पंण ज्याने बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्याच्या समोर झुकणार नाहीत.
येथे बाबासाहेबांचे नांव घेत घेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारशत्रूचे 'पदतीर्थ प्राशन करण्याची' दास'पंथी चढाओढ लागली आहे. ज्यांना फारतर कुठल्या सर्कशीत 'जोकर' म्हणून स्थान मिळू शकले असते किंवा तमाशात नाचा किंवा सोंगाड्याच्या भूमिकेचा चान्स मिळू शकला असता अशा कुवतीच्या टुकारांना काँग्रेस, राष्ट्रवादीने व प्रसिद्धिमाध्यमांनी 'हिरो' करवून आंबेडकरी चळवळ त्यांच्याच करवी संपविण्याची कारस्थानी खेळी बरीचशी यशस्वी केली आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या खुल्या पत्रात 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'ची ध्येय व उद्दिष्टे थोडक्यात पण टोकदारपणे सांगितली आहेत. आताचे गटबाज त्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या जवळपास तरी येऊ शकतात काय ?
बाबासाहेबांच्या वेळी समाज फारसा शिकलेला नव्हता. तरी त्याने निष्ठेने बाबासाहेबांची महान ऐतिहासिक चळवळ उभी केली. बाबासाहेबांच्या विवेकी आणि प्रज्ञावत आवाहनांना जीवाची बाजी लावून 'महाडचे पाणी' पेटविले ते याच अनुयायांनी! काळाराम मंदिरचा प्रदीर्घ संघर्ष झुंजले ते हेच अल्पशिक्षीत. धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले ते याच कफल्लक आंबेडकर अनुयायांनी! आता तर शिक्षण क्षेत्रात बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे गोडाऊनच्या गोडाऊन भरतील एव्हढे शिक्षित, महाविचारवंत ढिगांनी आहेत. तरी आंबेडकरी चळवळीची ही अवस्था! अनवाणी पाय पोळवून गरीबांच्या वस्त्या नि वस्त्या संघटनेत बांधणारी त्यागी कार्यकर्त्यांची फौज इतिहास जमा झाली. आता तर लक्झरी गाड्यांच्या ताफ्यातच आर.पी.आय. पुढारी डामा डिमात येतो. पांढरे शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट, गळ्यात बैलांच्या साखळ्या एव्हढ्या सोन्याच्या चैनी, हातात अंगठ्या पायातही अंगठ्या आणि डोळ्यावर काळा गॉगल असं ध्यान म्हणजे आताचा आर.पी.आय.पुढारी! हे हरामखोर लोक क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जिंदाबादच्या घोषणा देणार आणि गणपती समोरही नतमस्तक होणार... महात्मा फुलेंचा जयजयकार करणार आणि बिनडोकपणे साईबाबालाही लोटांगणे घालणार. तत्त्वशून्य युत्यांच्या बदफैली राजकारणातून ही अक्करमाशी औलाद जन्माला आली आहे. याच घाणीचा बंदोबस्त केल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा पुकारा करणारा खराखुरा
# रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निर्माण होणारच नाही.
श्यामदादा गायकवाड _दै. रिपब्लिकन भारत : संपादकीय लेख_ *३ ऑक्टोबर २०१२*
विचारसंघर्षाचा दस्तऐवज : श्याम गायकवाड यांच्या संकलित लेखांचा संग्रह
1 टिप्पण्या
रास्त भुमिका
उत्तर द्याहटवा