ठाणे - कल्याण येथील बी.के. बिर्ला महाविद्यालयात आज एकदिवसीय ११वी कोकण इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. कोकणातील इतिहासावर यावेळी संशोधकांनी साधकबाधक चर्चा केली. कोकणातील इतिहासाच्या अभ्यासासाठी निधी उपलब्द्ध झाल्यास मोठे संशोधन होईल, असे प्रतिपादन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी केले. कोकण इतिहास परिषद व बी.के.बिर्ला महाविद्यालय, इतिहास विभाग यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या आधिवेशनाच्या उद्घाटन समारोहास प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे उपस्थित होते. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. वर्षा गिरगावकर, बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, बी.के. बिर्ला महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. स्वप्ना समेळ आदी यावेळी उपस्थित होते.
नार्वेकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बिर्ला महाविद्यालयाचा व कोकणाचा जवळचा संबंध आहे असे सांगितले. आपल्या विद्यार्थीदशेत विज्ञान विषय मी घेतला. मग त्यात मला काही कळत नव्हते त्याचे आत्मपरिक्षण करतांना दिसून आले की या विषयात मी रमलोच नाही म्हणून पुणे विद्यापीठात एम.ए.पदवी इतिहास हा विषय घेऊन मिळवली. नेट परिक्षा पास झालो. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करुन जिल्हाधिकारी झालो, अशा शब्दांत त्यांनी इतिहास विषयाशी विशेष आत्मीयता प्रकट केली. सरकारने रायगड जिल्ह्यासाठी 600 कोटीचा निधी दिला त्यातील काही निधी इतिहासाचा अभ्यास होण्यासाठी अनुदान म्हणून दिल्यास मोठे संशोधन होऊ शकेल अशा भावना नार्वेकर यांनी व्यक्त केल्या.
डॉ. नरेशचंद्र, डॉ. अविनाश पाटील, डॉ. स्वप्ना समेळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने अनेक कार्यक्रम, उपक्रम महाविद्यालयात सुरू असल्याची माहिती डॉ.नरेशचंद्र यांनी दिली.
या अधिवेशनास जवळजवळ 60 पेक्षा अधिक शोधनिबंध अभ्यासकांनी पाठवले. या शोधनिबंधाचे परीक्षण प्राचीन विभाग डॉ.अनुराधा रानडे, (माजी प्राचार्य पेंढारकर महाविद्यालय), मध्ययुगीन विभाग डॉ. मोहसिना मुकादम (सहयोगी प्राध्यापिका रुईया महाविद्यालय), आधुनिक विभाग डॉ.मेहेरज्योती सांगळे (सहयोगी प्राध्यापिका एसएनडीटी महिला विद्यालय), डॉ.अनघा राणे (उपप्राचार्य अग्रवाल महाविद्यालय) यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा जाधव, तांत्रिक कार्य प्रा. शितल चित्रे-ठाकूर यांनी केले व परिषदेचे समन्वयक म्हणून प्रा. जितेंद्र भामरे यांनी काम पाहिले.
0 टिप्पण्या