ठाणे- कोरोना साथीमुळे जवळजवळ दीड वर्ष शाळा आणि महाविद्यालये बंद होती. कोरोना कमी झाल्याने शासनाने आता नियमावली आखून देत शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शासननिर्णयानुसार आज सर्व शाळांमधील आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. दीड वर्षापासून घरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल वाढावे यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील आनंद विश्व गुरूकुल या महाविद्यालयास भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पावणे दोन वर्षानंतर आपण जेव्हा महाविद्यालयात आलात, आपल्यासमोर नवी स्वप्ने, आव्हाने असतील ती निश्चित पूर्ण करण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करा. महाविद्यालये सुरू झाली असली तरी आपण सर्वांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची योग्य ती काळजी घ्या असा सल्लाही महापौर नरेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना दिला. तर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी शाळेत शिक्षण घेतांना जी मजा करतो त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळा सुरु झाली असली तरी कोरोना अजुन गेलेला नाही त्यामुळे त्रिसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच ठामपाच्या किसननगर येथील शाळा क्र. 1, 15 व 23 व ढोकाळी येथील शाळा क्र. 60, 61 या शाळांमध्ये उपस्थित राहून महापौरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेविका संध्या मोरे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, गट अधिकारी संगीता बामणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आज शाळा सुरू झाल्यावर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी महापौर स्वत: शाळांमध्ये उपस्थित होते. कोरोना म्हणजे काय? तो कशामुळे होतो. करोनापासून दूर राहण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, तसेच नागरिकांची कर्तव्ये कोणती? नगरसेवक म्हणजे काय, महानगरपालिकेची रचना कशी असते? नागरिकांची कर्तव्ये व अधिकार कोणते? शहराचा महापौर कसा निवडून येतो, असे प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत महापौरांनी ठामपा शाळा क्र. 23 मधील आठवीच्या वर्गात नागरिकशास्त्राचा धडा घेतला.
0 टिप्पण्या