ठाणे : ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना सन २०२० -२०२१ या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये १५ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण १६ कोटी इतका खर्च होणार आहे. सदर सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचा-यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.
या संदर्भात राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील कायम अधिकारी कर्मचारी ६,८८५ एकत्रित मानधनावरील कर्मचारी ३१४, शिक्षण विभागाकडील एकूण कर्मचारी ९७३ आणि परिवहन सेवेमधील १८९७ कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे.
या बैठकीस स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती अध्यक्षा साधना जोशी, जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, मिलिंद पाटणकर, अँड. विक्रांत चव्हाण, नारायण पवार, हणमंत जगदाळे, रमाकांत मढवी, नरेश मणेरा विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर, कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे तसेच इतर महापालिका वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या