कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. तिसरी लाटही येणार असल्याची आणि त्यासाठी तिसरा बूस्टर डोस घेण्याची गरज असल्याची चर्चा जोरात होती. पण रुग्ण संख्या घटत चालल्याने कोरोना ओसरत चालल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे जो तो सुटकेचा नि:श्वास टाकताना दिसत आहे. पण संकट अजून टळलेले नाही आणि कोरोनाने पोबारा केलेला नाही. रिपब्लिकन चळवळीतील माझे मित्र समाधान नावकर यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनाच्या बातमीने तोच इशारा दिला आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या, गर्दीत मिसळावे लागणाऱ्या सगळ्यांच्या शिरावर त्या संकटाची, अनिश्चिततेची तलवार लटकत आहे. कसलीही शाश्वती उरलेली नाही.
समाधान नावकर हे माजी आमदार दिवंगत टी एम कांबळे यांच्या रिपाइं ( डेमॉक्रॅटिक) या पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते. कांबळे यांच्या निधनानंतर त्यांनीं स्वतःचा नवा पक्ष नोंदणीकृत करून घेतला होता म्हणून ते रिपाइं (रिफॉरमिस्ट)चे पक्षाध्यक्ष बनले होते हे खरे. पण मुळात ते तळागाळातून पुढे आलेले हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याशी माझी मैत्री ते पँथरमध्ये आणि मी दलित मुक्ती सेनेत असतानापासून होती.नंतर मीही भारतीय दलित पँथरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासारखे पँथरमधील अनेक मित्रांशी जवळीक वाढली होती.
पँथर नेते टी एम कांबळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रिपाइं ( डेमोक्रॅटिक) तर्फे एक गौरव अंक ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा सु गवई यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला होता. त्या अंकाच्या संपादनाची जबाबदारी पार पाडतांना मला साहित्याच्या संकलनासाठी महिनाभर अहोरात्र धावपळ करून नावकर यांनी मोलाची साथ दिली होती.
१९७२ च्या भयंकर दुष्काळाच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले. त्यात अर्थातच गावात फारशी शेत जमीन हाताशी नसलेल्यांचा आणि शेतमजूर दलितांचा भरणा होता. त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रोजगार मिळेल, तिथे फुटपाथवर वा सरकारी जमिनीवर झोपड्या बांधून आपला निवारा उभारला होता. त्या काळात या झोपडीवासीयांना अभय आणि नागरी सुविधा मिळवून देण्याचा प्रश्न स्वाभाविकपणे दलित पँथरच्या अजेंड्यावर अग्रस्थानी आला होता. त्यातून प्रत्येक झोपडपट्टीत पँथरच्या छावण्या उभ्या राहत गेल्या आणि त्या चळवळीला कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मिळत गेले. समाधान नावकर हे त्यांच्यातील प्रातिनिधिक कार्यकर्ते होते.
विक्रोळी पूर्व स्टेशनलगतच्या इंदिरा नगर या झोपडपट्टीत स्थापन झालेल्या पँथरच्या छावणीतून त्यांचा आंबेडकरी चळवळीत प्रवेश झाला होता. सत्तेपासून वंचित राहिलेल्या आंबेडकरी चळवळीत प्रशिक्षण करून आणि चरितार्थासाठी साधने पुरवून पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा प्रवेश वा पुरवठा होत नाही. चळवळीत उडी घेतल्यानंतर मागे पुढे न पाहता, नोकरी- रोजगाराची पर्वा न करता, भविष्यासाठी- कुटुंबासाठी तजवीज न करता जगण्याची लढाई लढत जे कार्यरत राहतात, तेच पूर्ण वेळ कार्यकर्ते! अशी 'वाऱ्यावरची वरात' चळवळीत झोकून दिलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पेलवतेच असे नाही. पण तरीही असे बेभरवशाचे जगणे स्वीकारून समाजासाठी आणि चळवळीसाठी आपल्या वकुबाप्रमाणे राबणारे शेकडो नव्हे, तर हजारो कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीत सापडतील.
त्यांच्यापैकी एक असलेल्या समाधान नावकर या कार्यकर्त्यांचा कोरोनाने आज घास घेतला. स्वतःचा गट- संघटना चालवल्याने नावकर हे सर्वांना किमान परिचित तरी राहिले. अन त्यांच्या अकाली निधनाची बातमी आणि हळहळ सोशल मीडियामुळे सगळ्यांना कळू शकली. पण पँथर-रिपब्लिकन चळवळीत अग्रभागी राहून नोकरी, रोजी रोटी, उदरनिर्वाहाचे साधने गमावून बसलेल्या, पण फारशी ख्याती नसलेल्या असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढे कोणत्या दिव्यांना सामोरे जावे लागते, याची वार्ता समाजात किती लोकांपर्यंत पोहोचते?
नामांतर लढ्यात सर्वस्व गमावून बसल्यानंतर आत्महत्या करून मृत्यूला कवटाळलेले नाशिकचे झुंजार नेते बाळासाहेब गांगुर्डे आज किती लोकांच्या आठवणीत आहेत? तब्बल १६ वर्षे चाललेल्या त्या लढ्यात लाठीमारात अपंगत्व आलेले आणि नोकरी गमावलेले भांडुपचे नेते आर के तायडे यांचे पुढे काय झाले, हे कुणाला ठाऊक आहे?
- दिवाकर शेजवळ
- divakarshejwal1@gmail.com
0 टिप्पण्या