Top Post Ad

भारतीय सौंदर्यशास्त्राचा खरा अविष्कार - जयभीम


   भारतीय समाजाचे दोन प्रवाह आहेत. ते दोन प्रवाह एकमेकांवर प्रभाव टाकत, एकमेकाचा विरोध करत, भारतीय समाजाला विकसित करत आले आहेत. ते दोन प्रवाह म्हणजे, बामणी व अबामणी. असे वेद आम्हाला सांगतात. भारतीय सौंदर्याच्या म्हणजे आपल्या सभोवतालच्या जीवनावरील कला, साहित्यकृतीच्या आस्वादकातही हा विरोध आहे. एक अलंकारशास्त्र जे बामणी आहे. दुसरे सौंदर्यशास्त्र जे अबामणी आहे. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी हे त्यांच्या ग्रंथात विस्तृतपणे मांडले आहे.  भारतीय चित्रपटातील नायक-नायिका गोरेपान, उंचेपुरे आणि नाकदार असले पाहिजेत, असा अलंकारकास्त्रीय, सनातनी संकेत आहे. परंतु याला छेद देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य 'जय भीम' या चित्रपटाने केलेले आहे. यातील नायक- नायिका काळ्या रंगाचे आहेत. हे भारतीय सौंदर्यशास्त्राला धरून आहे. कारण भारतीय सौंदर्याचा रंग गोरा नसून काळा आहे, असे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील त्यांच्या गाजलेल्या अबामणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र या ग्रंथात सांगतात. ज्याप्रमाणे आफ्रिकेतील सौंदर्याचा रंग काळाच असतो. युरोपमधील सौंदर्याचा रंग गोरा असतो. भारतीय सौंदर्याचा रंग देखील काळा आहे. आफ्रिकेतील लोकांनी गोऱ्या रंगाचा आग्रह धरणे आणि युरोपमधील लोकांनी काळ्या रंगाचा आग्रह धरणे हे निसर्गाला धरून नाही. तो दुराग्रह आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीवर भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्राचे आणि सनातनी व्यवस्थेचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे हिरो हा उंचापुरा नाकदार आणि गोऱ्या रंगाचा असावा, हा निकष आहे. तर खलनायक म्हणजे काळ्या रंगाचा ओबड-धोबड, आक्राळ विक्राळ असा संकेत आहे. जय-भीम या चित्रपटाने काळे लोक देखील हिंमतवान असतात, कर्तृत्ववान असतात, प्रामाणिक असतात, गुणवान असतात हे प्रभावीपणे मांडलेले आहे. त्यामुळे या चित्रपटात भारतीय सौंदर्यज्ञास्त्राचा आविष्कार दिसतो, यात सनातनी अविष्कार नाही. भारतीय परिप्रेक्षात मार्क्सवादाला मर्यादा आहेत. मार्क्सवाद वर्गीय लढ्याची भाषा करतो. वर्गीय समस्यांचा ऊहापोह करतो, परंतु सामाजिक- सांस्कृतिक संघर्षाला प्राधान्यक्रम देत नाही, असा मार्क्सवादावर आरोप केला जातो.

भारतातील जातिव्यवस्थेच्या प्रश्नावर मार्क्सवाद भूमिका घेतो का? असा प्रश्न उपस्थित केला जातो, परंतु या चित्रपटातील   अॅड. चंद्रु यांच्यावरती कार्ल मार्क्स, पेरियार रामास्वामी, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव दिसतो. तो आदिवासीवरती होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध संवैधानिक  कायद्याच्या चौकटीत राहून शेवटपर्यंत लढा देतो, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

जय भीम मधील राजा आणि त्याचा जात परिवार उंदीर खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये शूद्रातिशूद्र आदिवासी समुदायाला इतके अधिकार वंचित केले आहे की, त्यांना होवटी उंदीर खाऊन जगावे लागते. उंदीर खातात म्हणून ते अप्रामाणिक आहेत, असे नव्हे. आपल्याकडे आहारावरून समाजाची गुणवत्ता ठरवली जाते. शाकाहारी लोक म्हणजे सात्विक आणि मांसाहारी लोक म्हणजे तामस, असे सर्वसाधारणपणे संप्रदायांचे मत आहे, परंतु आहारावरून गुणवत्ता ठरत नाही, हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. या चित्रपटावरून देखील हेच दिसते. आदिवासी उंदीर खातात म्हणून ते विध्वंसक आहेत आणि शाकाहारी लोक खूप सुसंस्कृत असतात, असे नाही. यातील आदिवासी उंदीर खातात पण ते कष्टाळू आहेत. ते प्रचंड काबाडकष्ट करतात. ते विटा थापायला जातात. गावाचे रक्षण करतात. कोणाला सर्पदंश झाला तर त्याला औषधोपचार करून बरे करतात. साप पकडतात. ग्रामस्थांचे अनेक श्वापदांपासून रक्षण करतात. मांसाहार करणारे लोक देखील गुणवान, सुसंस्कृत असतात, हे जय भीम या चित्रपटातून स्पष्ट दिसते, म्हणजे हा चित्रपट भारतीय सौंदर्यशास्त्राचा अविष्कार आहे.

वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्रातिशूद्र आदिवासींचे सगळे हक्क-अधिकार हिरावून घेतले गेलेले आहेत. त्यांना हक्काचे घर नाही, त्यांना हक्काची जमीन नाही, त्यांना शिक्षण नाही, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. त्यांनी सरंजामदाराच्या मर्जीवरती जगायचे, अशी एकूण विदारक परिस्थिती या चित्रपटात मांडलेली आहे. अशा अनेक जाती आहेत की, त्यांच्यावर आजही चोरी करणाऱ्या जातीचा शिक्का मारला जातो. चोरी नाही केली, तरी त्यांना चोरटेपणा म्हणून समाजव्यवस्थेचे चटके सहन करावे लागतात. .

आदिवासींची बाजू मांडणारे अॅड. चंद्रु म्हणतात "चोरी कोणत्या जातीचे लोक करत नाहीत?" हा त्यांचा प्रश्न वास्तवाला भिडणारा आहे. अलीकडच्या काळात चोरीचे स्वरूप बदललेले आहे. कोणाचाही प्रत्यक्ष खिसा न कापता किंवा घर न फोडता सुद्धा कोट्यावधी-अब्जावधी रुपयांची चोरी केली जाते. हे चोर राजरोसपणे समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून वावरत असतात. अनेक नेते चोर पाळून त्यांच्याद्वारे चोरी करतात. परंतु ज्यांना समाजाने अधिकार वंचित ठेवलेले आहे. त्यांच्यावरती आरोप करायचा आणि पोलीसाद्वारे त्यांचा छळ करायचा हे जय भीम चित्रपटांमध्ये दाखवलेले आहे, अपवादात्मक अशी परिस्थिती आहे.

प्रस्तुत चित्रपटांमध्ये चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या आदिवासी समाजातील निरपराध तरुणांना पोलीस बेदम मारतात, त्यामध्ये एका तरुणांचा अंत होतो. त्याची विल्हेवाट पोलीस लावतात. हा चित्रपट तामिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. अशीच घटना महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी काही दिवसांपूर्वी घडलेली आहे. किरकोळ चोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडले, चौकशी वेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये एका आरोपीचा अंत झाला. त्याची

विल्हेवाट जंगलामध्ये नेऊन पोलिसांनी लावली. नंतर हे प्रकरण उघडकीस आले. आता हे प्रकरण सांगली न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. एखाद्या आरोपीचा जीव घेण्या इतपत चोरी हा गुन्हा नाही. चोरी करणाऱ्याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. परंतु पोलिसांनी त्याला ठार मारणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही.

आपल्या देशात आर्थिक विषमता भयानक आहे. उदरनिर्वाहाची साधने संपुष्टात आली तर चोरी रोखता येणार नाही इतकी विदारक परिस्थिती आपल्या देशात आहे. चोरीचे समर्थन होऊ डकत नाही, परंतु आपल्या देशात परिणामावर चर्चा केली जाते, परंतु कारणमीमांसा शोधली जात नाही. मारहाणीमध्ये आरोपीचा अंत झाल्यानंतर आरोपीने पलायन केले, असा बनाव तयार करणे व बॉडीची विल्हेवाट लावणे, हे प्रकार घडतात, हे प्रस्तुत चित्रपटात प्रकर्षाने दाखवलेले आहे. त्यामुळेच अॅड. चंद्रु हे हेबसकार्पस या अंतर्गत फिर्यादीतर्फे न्यायालयात रिट दाखल करतात. ज्यावेळेस पोलीस यंत्रणा, शासन न्याय देऊ शकत नाही, त्यावेळेस पाच प्रकारच्या रिट दाखल केल्या जातात, त्यापैकी हेबसकार्पस ही महत्वपूर्ण रिट आहे. न्यायालय यामध्ये ब्रिंग द बॉडीचा आदेश देतात. संबंधित पोलिस अधिकारी बॉडी आणू शकत नाहीत. त्यावेळेस एड.चंद्रु आपली सर्व विद्वत्ता, कौशल्य पणाला लावून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचतात. त्यामध्ये ते यशस्वी होतात. प्रामाणिकपणा, निर्भीडपणा, संवेदनशीलता, अभ्यासूवृत्ती, कष्ट करायची तयारी असेल तर निश्चितपणे यश मिळते, हेअॅड. चंद्रु यांच्या कामावरून स्पष्ट दिसते.

सदर चित्रपटातील पोलीस अधिकारी आदिवासी समाजातील तरुणावर प्रचंड अन्याय-अत्याचार करतात. त्यांचा प्रचंड छळ करतात. त्यांची हत्या करतात, याचा अर्थ सर्व पोलीस हे गुन्हेगार आहेत, असा तर्क करणे चुकीचे ठरेल. कारण अॅड. चंद्रु यांच्या न्यायालयीन लढ्यात पोलीस अधिकारी आयजी पेरूमल स्वामी हे तपास कामांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे मदत करतात. त्यांनी केलेल्या तपासामुळेच अॅड. चंद्रु हे न्यायालयासमोर योग्य ते पुरावे देऊ हाकतात. सरसकट सर्व पोलिस दोषी आहेत, असे  समजणे चूक ठरेल. आज आपल्या देशातील दहशतवाद, गुन्हेगारी, गुंडगिरी रोखण्यासाठी पोलीस खात्याचे मोलाचे योगदान आहे.

आपल्या पतीला न्याय मिळावा, यासाठी आदिवासी महिला निर्भिडपणे, हिमतीने शेवटपर्यंत लढते. तिच्यावर दबाव असतो. तिला गावातील काही नेते छळतात. तिला पैशाचे आमिष दाखवले जाते. तिला मारण्याचा प्रयत्न होतो. परंतु ती मागे हटत नाही. कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही. ती शेवटपर्यंत निर्भिडपणे लढत राहते. वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या वेळेस तिला लाखो रुपये घेऊन गप्प बसण्यासाठी विनवणी करतो तेव्हा ती म्हणते "इतके पैसे कुठून आले? असे जर माझ्या मुलाने विचारले, तर मी त्याला काय उत्तर देऊ?". मला पैसे नकोत, मला न्याय हवा" तिचा प्रामाणिकपणा, तिचा निर्भीडपणा, तिची हिम्मत, तिचा कणखरपणा हा अन्यायग्रस्त लोकांसाठी प्रेरणादायी आहे. गरीब लोक हतबल असतात. ते विकले जातात, ते लाचार असतात, ते भित्रे असतात, ते पलायनवादी असतात. हे अन्यायग्रस्त राजाच्या पत्नीने खोटे ठरवले आहे.

एखाद्या संवेदनशील प्रकरणात सरकारी यंत्रणा कसे काम करते, हे या चित्रपटात प्रकर्षाने दिसते. या चित्रपटात वकिलांचे स्वभावविशेष दाखवले आहेत. अॅड. चंद्रु सारखा प्रामाणिक, निर्भीड, कणखर, हिंमतवान, अभ्यासू, निस्वार्थी, संवेदनशील वकील कसा न्याय मिळवून देऊ शकतो, हे जय भीम चित्रपट आपल्याला सांगतो. अॅड. चंद्रु हे आंदोलनात सहभाग घेतात. अनेक साक्षी पुरावे गोळा करतात. आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाई किती महत्वपूर्ण आहे, हे हा चित्रपट सांगतो. या चित्रपटातील अन्यायग्रस्त आदिवासी न्याय मिळविण्यासाठी हातात डास्त्र घेत नाहीत, कोणत्याही प्रकारची हिंसा करत नाहीत. कोणाची हत्या करत नाहीत. संघटित गुन्हेगारी करत नाहीत, तर ते लोकझाही मार्गाने न्यायालयीन लढाई लढतात. त्यांचा विश्वास संवैधानिक न्यायव्यवस्था-लोकझाहीवर आहे. हे खरे लोकशाहीचे सौंदर्यशास्त्र आहे. नक्षलवाद हे भारतीय सौंदर्यशास्त्र नाही. नक्षलवाद हा भारतीय संविधानिक लोकझाहीविरोधी आहे. त्याची फिलॉसॉफी भारतीय तत्वज्ञानात नाही, तर माओवादात आहे. हा चित्रपट अन्यायग्रस्त जनतेला लोकझाही मार्गाने लढण्याची प्रेरणा देतो. अन्यायग्रस्त आदिवासींनी शिक्षण घेतले पाहिजे, शिक्षण हेच खरे शस्त्र आहे,ही प्रेरणा हा चित्रपट देतो. हेच याचे सौंदर्य आहे.

चित्रपट म्हटले की गाणी, अश्लीलता, अंगप्रदर्शन ठरलेले असते, त्याशिवाय चित्रपट पूर्णच होत नाही. प्रेक्षकांनाही तेच आवडते, असा निमति-दिग्दर्शकांचा गैरसमज आहे. या चित्रपटाने सगळे आयाम बदललेले आहेत.चित्रपट हे जसे मनोरंजन करण्याचे माध्यम आहे, तसेच ते प्रबोधनाचे व अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा देण्याची प्रेरणा निर्माण करणारे माध्यम आहे. या चित्रपटात अंगप्रदर्शन नाही, अश्लीलता नाही, भपकेबाजपणा नाही, यात सहजता आहे, प्रबोधन आहे, प्रेरणा आहे. सूर्या, प्रकाश राज यांनी केलेल्या भूमिका अविस्मरणीय आहेत. हेच या चित्रपटाचे सौंदर्य आहे. तीच भारतीय सौंदर्यशास्त्राचा खरा अविष्कार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com