देहूरोड येथे 25 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25 डिसेंबर रोजी बौद्ध अनुयायी एकत्र जमतात. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून अनेकांना या ठिकाणी येता आले नाही. मात्र या वर्षी यावर्षी देहूरोड येथे अनेक बुद्ध अनुयायी बुद्धवंदनेसाठी एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे. देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर सकाळी साडेदहा वाजता बुद्धवंदना होणार आहे. यावेळी संपूर्ण देशातून बौद्ध अनुयायी एकत्र येणार आहेत. तसेच भिक्खू संघ देखील उपस्थित राहणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. बुद्धविहार कृती समिती, बुद्धविहार ट्रस्ट, समन्वय समिती धम्मभूमी देहूरोड या कार्यक्रमाचे आयोजन करतात. अल्पोपहार, पुस्तके, मूर्तींचे फोटो, कॅलेंडर, विविध अन्य साहित्यांच्या दुकानांमुळे परिसराल गजबजून जात असतो.
बुद्ध काळाच्या प्रभावाने नंतर सुमारे बाराशे वर्षानंतर पुन्हा एकदा भारतभूमीत बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेले देहूरोड येथील हे बुद्ध विहार अद्वितीय ठरलेले आहे. डॉ. बाबासाहेबांना डोळे बंद करून एकाच ठिकाणी बसलेले तथागत बुद्ध अभिप्रेत नव्हते. त्यासंबंधी ते म्हणतात, ‘तथागत बुद्ध देशाच्या कानाकोपऱ्यात अखंडपणे डोळे उघडे ठेवून आयुष्यभर फिरत राहिले, जगाचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि त्यांचे हे भ्रमण पायी चालत असे. त्यांनी कधीही वाहन अथवा साधन प्रवासासाठी वापरले नाही. डॉ. बाबासाहेबांना डोळे उघडे असलेले तथागत बुद्ध अपेक्षित होते. रंगून येथे अशीच डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांना मिळाली. त्याच मूर्तीची देहूरोडच्या विहारात स्थापना करण्यात आलेली आहे. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ही ऐतिहासिक घटना फार महत्त्वाची असून या घटनेची नोंद इतिहासात होईल आणि या लहान बुद्ध मंदिरापासून धम्मक्रांतीला सुरुवात होईल’ असे उद्गार काढले होते.
देहूरोड येथील मंदिरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर याच धम्मभूमीवर विहारालगत अस्थीस्तूप तयार करण्यात आले असल्याने या भूमीस ऐतिहासिक धम्मभूमी म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. या धम्मभूमीवर वर्षभरात दोन वेळा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) आणि भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना दिन (२५ डिसेंबर) देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी येथे येतात.
0 टिप्पण्या