Top Post Ad

हा पुतळा विद्यापीठामध्ये येणार्‍या प्रत्येकाला कायम प्रेरणा देणारा ठरेल - राज्यपाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते.  यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे,दृकश्राव्य माध्यमातून विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, , उपमहापौर सुनीता वाडेकर, कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, प्र.कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, माजी खासदार समीर भुजबळ,आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

अनावरण कार्यक्रमात राज्यपाल आपले विचार मांडताना म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी समाजात बदल घडविण्यासाठी शाळा सुरू केली. त्या दरम्यान अनेकांनी विरोध केला, हल्ला केला. तरी देखील त्यांनी त्यांचं कार्य सुरू ठेवले. त्यामुळे आज समाजात अनेक बदल घडलेला दिसत आहे. सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळ आणि प्लेगच्या साथीत खूप मोठं योगदान दिले आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या प्लेगच्या साथीने तेव्हा देशभरात थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी नागरिकांना सेवा देण्याचे काम केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पण आता आपण ज्या करोना आजाराचा सामना करीत आहोत, त्यामध्ये एखाद्या पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा आणि मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही. हे आपण पाहिल्याचे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांनी यावेळी केले. 

त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीमध्ये नागरिकांची सेवा करीत मृत्यू झाला आणि आज आपण काय पाहतोय असा उपरोधिक सवाल उपस्थित करत आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जाण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे विविध क्षेत्रात महिला पुढे जाताना दिसत आहेत. त्यातील मुख्य क्षेत्र म्हणजे क्रिडा क्षेत्रात मुलांपेक्षा सर्वाधिक जास्त पदके मुली मिळवत आहेत. पदके जिंकणाऱ्यांमध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय समाजातील मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचा आवर्जून उल्लेख करत या गोष्टींचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जात असून आज मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे. हा क्षण कधीच विसरणार नाही. हा पुतळा विद्यापीठामध्ये येणार्‍या प्रत्येकाला कायम प्रेरणा देणारा ठरेल असेही ते म्हणाले.

पुणे विद्यापीठाचा नाविस्तार झाला त्यानंतर या विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा असावा यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु होते.  आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित  या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येत आहे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या पुतळ्याचे अनावरण केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट जगभरात पोहचावे यासाठी छोटी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. विविध भाषांच्या माध्यमातून त्यांचा हा जीवनपट जगभरात जावा यासाठी आपले प्रयत्न असून फुले दाम्पत्याचे समग्र वाङ्ममय पुन्हा प्रकाशित करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यात येईल. ओबीसींच्या प्रश्न सोडविण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते यांच्या राज्याचे राज्यपाल यांच्या सहकार्यातून केलं जातं असून गोर गरिबांना हक्क मिळाला पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही भूजबळ म्हणाले

सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.

देश आणि समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार  स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणि भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने  हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणी ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, भ्रूणहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.

उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. लिंग समानतेच्या चळवळीचा सावित्रीबाई फुले आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून समाज एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला  मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.

कुलगुरू डॉ.करमळकर म्हणाले, समाजाच्या उद्धारासाठी ‍शिक्षण हे एकमात्र साधन आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श निर्माण केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यासाठी विद्यापीठ परिसरात पुतळा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा  आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने सर्व परवानग्या तातडीने मिळाल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनीदेखील यासाठी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची  माहिती त्यांनी ‍ दिली.

------------------

इतिहास घडताना: प्रा. हरी नरके

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशातल्या सर्वात मोठया व भव्य पुतळ्याचे 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'त अनावरण झाले. हा क्षण ऐतिहासिक नी मौलिक क्षण आहे. ज्या पुण्यात देशातली मुलींची पहिली शाळा (१८४८ मध्ये ) काढली म्हणून सावित्रीबाईंवर चिखल, शेण, दगडगोटे फेकले गेले, जोतीराव- सावित्रीबाईंना घर सोडावे लागले त्याच पुण्यात १०० वर्षांनी (१९४८) स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव दिले जाते (२०१४)  आणि १४/२/२०२२ ला विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर त्यांचा भव्य पुतळा उभा राहतो ही किमया नेमकी काय आहे? यावर एक पुस्तक लिहावे लागेल इतका पडद्यामागच्या घडामोडीचा रहस्यमय खजिना यात दडलेला आहे. हे सारे सहजासहजी घडले काय? आजही हे सारे घडवून आणताना किती रक्त आटवावे लागते! दरच वेळी एक किलोचे वजन उचलण्यासाठी २० टनांची क्रेन वापरावी लागते.  प्रस्थापित व्यवस्था आजही किती मजबूत आहे नी ती आजही किती पराकोटीचा द्वेष करते, सावित्रीजोतींचा, हे लिहावेच लागेल. फक्त आज ती वेळ नाही. व्यवस्थेच्या परिघाबाहेर असलेल्या खुरट्या झुडपांना याची कल्पनाही करता येणार नाही!

विशेष बाब म्हणजे जे सनातनी लोक कायम विरोधात होते, आहेत नी आजचा विपरीत काळ बघता उद्याही राहतील तेच शेवटच्या क्षणी पुढे सरसावतात नी त्यांच्यामुळेच हे कसे घडले याचेही ढोल वाजवीत सगळे श्रेय स्वतःकडे घेतात. वर्षानुवर्षे राबणारे मात्र दूर कुठे तरी अंधारात राहतात.हे मी महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारक, नायगावचे सावित्रीबाईंचे स्मारक, दिल्लीत संसदेत जोतीरावांचा पुतळा, पुणे विद्यापीठात जोतीराव व बाबासाहेबांचा पुतळा, पुणे विद्यापीठ नामांतर आणि आज मुख्यालयासमोर सावित्रीबाईंचा पुतळा उभा राहणे या प्रत्येक क्षणी अनुभवत आलोय. तोच संघर्ष. तोच प्रस्थापितांशी पंगा घेत वाईटपणा घेण्याचा, त्यांच्या नजरेत व्हिलन होण्याचा रोल करावा लागतो तेव्हा कुठे यश खेचून आणता येते. खूप दमछाक होते.आज जर इतका विरोध आहे तर सावित्रीबाई जोतीरावांच्या काळात काय असेल? 

धन्यवाद छगन भुजबळ, अजित पवार, उदय सामंत, संजीव सोनावणे, संजय चाकणे, सुधाकर जाधवर, संजय परदेशी आणि समता परिषद टीम! तुमच्या पाठबळामुळेच हा इतिहास घडला!-  : प्रा. हरी नरके

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com