1 जानेवारी 1818 या दिवशी कोरेगाव भीमा येथे इंग्रज आणि पेशवे यांच्यात लढाई झाली. यामध्ये पेशव्यांचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांना 'महार रेजिमेंट'ने साहाय्य केले. कोरेगाव येथे इंग्रजांच्या समवेत झालेल्या लढाईमध्ये 'महार रेजिमेंट' इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यामुळे महार समाजाला 'महार रेजिमेंट'चा अभिमान वाटत असेल; मात्र हे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाला 'शौर्यदिन' कसे घोषित करू शकतो? ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या विजयाचा पायंडा आणि त्याचा अभिमान आपण का बाळगावा?' असा प्रश्न शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी 7 मार्च रोजी विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना रावते यांनी ही भूमिका मांडली.
सत्ताधारी पक्षातील नेते असूनही दिवाकर रावते यांनी हे मत विधान परिषदेत व्यक्त केले. खरे तर विधान परिषदेत सध्या दोनच विषय गाजत आहेत एक नवाब मलिक आणि दुसरा राज्यपालांचे शिवछत्रपतींबद्दलचे विधान. ज्यामुळे राज्यपालांना विधानपरिषदेत भाषण अर्धवट सोडून निघून जावे लागले. त्यावर मात्र रावतेंनी चर्चा न करता या विषयावर आपले मत प्रकट करणे म्हणजे यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी असल्याचे स्पष्ट होते. जो विषय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. त्या विषयावर रावते यांनी अद्यापही काही स्पष्टीकरण दिल्याचे ऐकीवात नाही. मात्र शौर्य दिन म्हणून घोषित करण्यात आलेल्या बाबींवर त्यांनी आपले ज्ञान पाजळले. याचा अर्थ त्यांना इथल्या आंबेडकरी समुहाबद्दल फारच आस्था आहे की काय असे वाटते. खरे तर या विषयाने त्यांनी पुन्हा एकदा समाजात दुहीची बीजे पेरण्याचे काम आपल्या बोलवित्या धन्याने सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे.
1 जानेवारी शौर्य दिन हा आंबेडकरी समूहाच्या आस्थेचा विषय आहे. आणि ही लढाई सरळ सरळ पेशवे आणि इंग्रजांची होती. त्यात कोणाच्या बाजुने कोण लढले हे खोलात जाऊन पाहिले तर त्यात इंग्रज लढलेच नाही सर्व भारतीयच होते असे म्हणावे लागेल. मग छत्रपती शिवाजी महाराजांना किती स्वकीयांविरुद्ध लढा उभारावा लागला, त्यांच्या विरोधात मोघलांना रसद पुरवणारे कोण होते. मिर्झाराजे जयसिंग विरोधात महाराज का लढले असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
भारत हा कालही जातीव्यवस्थेने ग्रासलेला होता आणि आजही ही जातीव्यवस्था या देशाला अधिक ग्रासत आहे. आणि हेच कारण आहे की, इथे फक्त समतेसाठी लढाया होतात. मात्र त्याचा फायदा नेहमीच इथल्या प्रस्थापित वर्गाने घेतला आहे. आणि इथल्या बहुसंख्य समाजावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. शिवरायांनी याच प्रस्थापित वर्गाविरोधात समतेसाठी लढा दिला. स्वराज्य निर्माण केले, म्हणूनच त्यांना राज्याभिषेक नाकारण्यात आला. ही गोष्ट आता सर्वसामान्यांना चांगलीच ठाऊक झाली आहे. मग या महाभागांना कधी कळणार.
शिवाजी महाराजांच्या काळानंतर जेव्हा राज्याची सुत्रे पेशवे यांच्या हाती गेली तेव्हा त्यानी धर्माच्या नावाखाली इथल्या काही जातीवर अत्यंत कडक असे निर्बंध लादले. भारतीय समाजाचा एक भाग असूनही या समाजाला मरणासन्न यातनांना सामोरे जावे लागत होते. या अपमानास्पद वागणूकीला आणि प्रस्थापित व्यवस्थेला आपले या देशातील मुळ स्थान कोणते हे दाखवून देण्यासाठी ब्रिटीशांना सहकार्य केल्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण ही लढाई अस्तित्व आणि अस्मित्तेची होती. कुण्या जाती-धर्माची नव्हती. या लढाईत कोण कोणाविरुद्ध लढत होतं हे महत्त्वाचं नाही तर आणि कशासाठी लढत होतं हे महत्त्वाचं आहे. पेशवाई हरली आणि बदनाम झाली या बदनामीची आणि हरण्याची सल आजही त्यांच्या मनात आहे. ही सल त्यांना बोचत आहे. या ऐतिहासिक घटनेचा बदला घेण्यासाठी अशा तऱहेने नवीन कळसूत्री बाहुले उभे केले जात आहेत. इतिहासाची तोडमोड करणे हे आता नवीन नाही. पण वास्तवाची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
खरं पाहता 1 जानेवारी 1818 ही दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीला गेला पाहिजे होता. परंतु तसे घडले नाही. ही बाब जाणीवपूर्वकच दुर्लक्षीत केली गेली. कारण याचा संबंध थेट एका विशिष्ट समाजाशी होता. महाराष्ट्रात जातीयवादी पेशव्यांचे राज्य होते. जे केवळ मनुवादी संस्कृतीने दिलेल्या वर्णवर्चस्ववादी संस्कृती जोपासण्यात स्वतला श्रेष्ठ समजत होते. अशा परिस्थितीत सुद्धा देशप्रेमाने भारावलेली एक जमात या देशाचे रक्षण इंग्रजापासून व्हावे केवळ या भावनेतून पेटून उठली व त्यावेळी पेशव्यांच्या राजवटीतील दुसरा बाजीराव पेशवा याकडे जाऊन देशाच्या अस्मितेसाठी इंग्रजांच्या विरुद्ध आपण शस्त्र उचलण्यास व वेळ पडल्यास जिवाची बाजी लावण्यास सुद्धा मागे पाहणार नाही अशी ग्वाही दिली. पण त्यांनी आपल्या अस्तित्वाबद्दलचा सवाल करताच मुजोर पेशवाई व्यवस्थेने उत्तर दिले की सुईच्या अग्रभागावर थरथरत उभ्या राहणाऱया धुळीच्या कणाइतके स्थान देखिल तुम्हाला दिले जाणार नाही. हा इतिहास आहे. तो काही पाठ्यपुस्तकातून शिकवला जात नाही. वर्णवर्चस्व व जातीयवादाचा टेंभा मिरविणाऱया पेशवाईचे असे तिरस्काराचे बोल ऐकून आपले स्वतचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी या बहादुर शिपायांनी आपला सरदार सिदनाक याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या बाजुने लढण्याचा निर्धार केला. केवळ 500 सैनिक व 300 घोडेस्वारांच्या मदतीने पेशव्यांचे पानिपत करून आपल्या पराक्रमी शौर्याचा इतिहास दाखवून दिला. समतेची ही लढाई जिंकली म्हणूनच तो विजयोत्सव ठरतो. शौर्यदिन ठरतो.
परकियांनी या ठिकाणी येऊन आपल्या चाणाक्ष दृष्टीने येथील समाजव्यवस्थेचे अवलोकन करावे. समाजातील कच्चे दुरावे हेरावे व नेमके ते हाती घेऊन त्यांच्या बळावर येथे आपली सत्ता प्रस्थापित करावी हा या देशाचा दुदैवी इतिहास आहे. परंतु त्यापेक्षा दुदैव हे आहे की येथील समाज धुरींणांना आपल्या समाजव्यवस्थेतील हे अवगूण दुर करण्याचे कधीच सुचले नाही. आजही सुचत नाही. पण पुन्हा पुन्हा अशा मुद्याद्वारे सामाजिक व्यवस्थेत दुही पेरण्याचेच काम मात्र व्यवस्थित केले जात आहे. समाजातील जे जे घटक परकियांना उपयोगी पडले ते घटक स्वराज्य किंवा स्वदेशीयांचे राज्य ही बलिष्ठ करु शकले असते. पण हिन मानसिकतेचे हे किडे आजही या व्यवस्थेत कायम आहेत. म्हणूनच आजही ही व्यवस्था या घटकांना नाकारण्याचेच काम करण्यात येत आहे. हे या देशाचे दुर्दैव आहे. कालही तीच यंत्रणा कार्यरत होती. आजही तीच आहे. ज्यांनी इथल्या एका मोठ्या वर्गाला हाताशी धरून आजही आपली सत्ता कायम ठेवली आहे. आणि हा वर्ग छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची तोडमोड करणाऱयांना पाठीशी घालत आहे. त्याचवेळेस आपली सत्ता कायम रहावी म्हणून इतरांना हिन लेखत आहे. स्वतच्या अस्तित्वासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातच ज्यांनी वर्णवर्चस्ववादी शृंखलेच्या बेड्या तोडून इथल्या पेशवाईला सळो कि पळो करुन सोडले तो इतिहास पुसला जावा आणि येणाऱया पिढीला पुन्हा एकदा गुलामीच्या खाईत ढकलून द्यावे हाच इथल्या व्यवस्थेचा डाव आहे. आणि तो अशा तऱहेने अधून मधून साध्य करण्याचा प्रयत्न कालही होत होता आजही होत आहे.
- भाष्य : प्रजासत्ताक जनता
सुबोध शाक्यरत्न
रावते हे कट्टरपंथी आर एस एस चे शिवसेनेचे मधील एजंट। देशद्रोही सनातन प्रभातशी सबंधित। म्हणूनच दाभोळकर, काँ पानसरे, कलबुरगी, यांच्या मारेकरयांना वाचविण्यासाठी रावते यांनी भाजप सेना युती सत्तेचा वापर केला असल्याचा तसेच भीमा कोरेगाव हल्याचा,एकबोटे,भिडे यांनाही शासकिय संरक्षण दिले असावे असा संशय आहे. शोध पत्रकारिने खरे काय ते समोर आणावे। जयभीम। - -प्रा जोगेन्द्र कवाडे
0 टिप्पण्या