सत्यशोधक पद्धतीचा, सीझन लग्नाचा,
नो ब्राह्माण, नो अक्षता,
ना कसले धार्मिक विधी
मार्च महिना संपला. आता एप्रिल-मे लग्नाचा सीझन. दोन वर्षे कोरोना महामारीने लग्न समारंभावर विरंजन आणलं. मोठ-मोठ्या लग्नांना मर्यादित केलं. हजारोंच्या उपस्थितीला 25-50मध्ये सिमीत केलं. मात्र आता पुन्हा सर्व निर्बंध उठले असले तरी अजूनही अर्थिक घडी निटशी बसलेली नाही. कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यां गमवाव्या लागल्या आहेत. बेरोजगारी वाढल्याने छोट्या-मोठ्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून अथवा मिळेल त्या तुटपुंज्या नोकरीच्या जीवावर जोडीदार तर निवडायचा आहे. पण लग्नाचा खर्च. ही चिंतेची बाब ठरली आहे. यावर तोडगा म्हणून आता अनेक तरुण-तरुणी सत्यशोधक विवाह पद्धतीची कास धरली आहे. सत्यशोधक विवाह पद्धती म्हणजे नो ब्राह्मण, नो अक्षता, ना कसले धार्मिक विधी .
सत्यशोधक पद्धतीचा विवाह काय असतो? तो कसा आणि का करावा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. अनेक जणांनी तर नुसतं कधी तरी कोणाकडून ऐकलेलं असतं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक लग्नांची पद्धत आणि प्रवास आपल्याला माहिती पाहिजे. देशातला पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला. ब्राह्मणाशिवाय झालेल्या या विवाहात वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधूचं नाव राधा असं होतं. या लग्नाचा खर्च सावित्रीमाईंनी स्वत केला होता. ज्योतिरावांचा कर्मकांडाला विरोध असल्याने या विवाहामध्ये कर्मकांडाला फाटा दिला जातो.
अशा पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते. या विवाहप्रसंगी सावित्रीमाई आणि ज्योतिराव यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला अभिवादन केलं जातं. धान्याच्या अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या वधूवरांच्या डोक्यावर टाकल्या जातात. पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी महात्मा फुले यांनी रचलेल्या मंगलाष्टका म्हटल्या जातात. या मंगलाष्टका संस्कृतऐवजी मराठीत लिहिलेल्या आहेत. जेणेकरून सामान्य माणसाला या लग्नसोहळ्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर या मंगलाष्टका छापील स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर वधुवरांसाठी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शपथा वधू- वर घेतात. सातफ्रेया ऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्वांना मानलं जातं. यानंतर लग्नगाठीप्रमाणेच महासत्यगाठ बांधली जाते.
कोरोनामुळे अनेक जणांची लग्ने कमी खर्चात झाली पण आता परिस्थिती पूर्व पदावर आल्यावरही लोकांना या पद्धतीने भुरळ पाडली आहे. प्रत्येक जण याच पद्धतीने लग्न करण्यास प्रवृत्त होत आहे. उगीच लग्नांवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा वधु-वरांच्या भावी जीवनासाठी राखून ठेवणे महत्त्वाचे हा विचार जनमानसात रुजत आहे. सत्यशोधक पद्धतीने खर्च कमी होतो, ह्या लग्नांमध्ये बडेजाव नसतो त्यामुळे अनावश्यक गोष्टी टाळता येतात. या सगळ्यात महत्वाचे म्हणजे सत्यशोधक लग्नात सामाजिक क्रांती करण्राया महामानवांची प्रतिमा वापरली जाते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुलें यांच्या साक्षीने लग्न करणं कोणत्याही तथाकथित देवाच्या पुढे लग्न करण्यापेक्षा चांगलं आहे. भारतातील बहुतेक युवावर्गात सत्यशोधक लग्नांबद्दल जागरूकता वाढत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारी युवा पिढी आपल्या लग्नात सत्यशोधक पद्धतीची निवड करून समाजापुढे आदर्श ठेवतात. आता प्रत्येकानेच याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्यामुळे खर्च पण कमी होईल आणि सामाजिक बांधिलकीचं कर्तव्य देखील पूर्ण होईल आज तुम्ही बिनाविधी रजिस्टर लग्न करू शकता ह्यासाठी महात्मा फुले आणि खेडोपाडीच्या सत्यशोधकांनी केलेला संघर्ष आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या जुन्या दस्तऐवजांमध्ये Sir Charles Sargent and Mr. Justice Candy in Waman Jagannath Joshi v. Balaji Kusaji Patil (1888) I.L.R, 14 Bom. 167,169 नावाचा खटला अजूनही सापडतो. ह्या खटल्याचा वापर पुढे वेळोवेळी केला गेला आहे. ह्यात वामन जोश्यानी बाळाजी पाटलांवर आरोप केले की त्यांनी आपल्या पौरोहित्य करण्याची फी बुडवली आहे. ह्यातून मार्ग काढण्यासाठी न्यायालयात हा विवाह शास्त्राsक्त नाही हे सिद्ध करण्यात आले. हा विवाहच शास्त्राsक्त नसल्याने त्यासाठी दक्षिणा द्यायची गरजच काय असा सडेतोड प्रतिवाद ज्योतिराव फुले आणि पाटील यांच्या पक्षाने केला.
त्यांच्याशी सहानुभूती असण्राया साक्षकर्त्या लोकांनी न्यायालयात जबाब दिले की, हा विवाह `घरचे लग्न' ह्या पद्धतीने झाला असल्याने आणि त्यामध्ये तुम्ही दक्षिणा दिली नसल्याने जोशी किंवा ब्राह्मण समुदायाचा दक्षिणेवरील अधिकार सिद्धच होत नाही, अशी कबुली कोर्टासमोर दिली गेली. बाळाजी पाटील यांनी आपल्या कबुलीमध्ये बोलताना सांगितले की आमचे पूर्वज वर्षानुवर्षे या प्रकारचा विवाह करत असल्याचे गावातील जुन्या लोकांचे म्हणणे होते. माझ्या जातीतील लोकांनी सांगितले त्याप्रमाणे मी हा विवाह केला आहे त्यामुळे मला त्याच्या तांत्रिक/वैधानिक बाबींविषयी काहीही शंका नाही. घरचे पुरोहित वापरून आम्ही हा विधी केला आहे.
न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले व न्यायालयाच्या दोन्ही जज सर चार्ज सार्जंट आणि जस्टीस पॅंडी यांनी खालच्या न्यायालयाचा निकाल बदलून या खटल्याचा निकाल पाटील व फुले यांच्या पक्षामध्ये दिला व बहुजनांचा स्वतचे पौरोहित्य स्वत करण्याचा अधिकार मान्य केला. इथून पुढे लग्न करण्यासाठी किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी हिंदू धर्मातील लोक ब्राह्मण पुरोहित बोलवण्याच्या बंधनातून कायमचे मोकळे झाले. देशातील जवळपास सर्व विवाह आणि त्यासंबंधीचे निवाडे करताना या खटल्याचा कायदा म्हणून स्वीकार केला गेला व यानंतर जे खटले देशांमध्ये उभे राहिले या सर्व घटनांमध्ये पाटील विरुद्ध जोशी हा खटला नोंदवत नेहमीच बहुजनांच्या बाजूने निकाल दिला गेला. आणि त्यानंतर महात्मा फुले यांनी ब्राह्मण नसताना सत्यशोधक पद्धतीने विवाह कसे करावे त्याच्या संरचना आखून दिल्या व मंगलाष्टके तयार केली.
असे शेकडो खटले ब्राह्मण लोकांनी बहुजनांच्या विरुद्ध भरले. सन 1900 ते 1904 यादरम्यान झालेल्या अशा सर्व घटनांचा तपशील शास्त्राr नारो बाबाजी महादु पाटील पानसरे, राहणार ओतुर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी ब्राम्हणांचा हक्क काही नाही कशाबद्दल हायकोर्टाचे झालेले ठराव या एका पुस्तिकेमध्ये थेट प्रकाशित करून टाकला. या पुस्तकालाही पुण्यात कोणी प्रकाशक लाभला नाही म्हणून हे पुस्तक गायकवाडांच्या बडोदे संस्थांनाकडून प्रकाशित करण्यात आले.
आजच्या काळात जेव्हा न्यायालयात रजिस्टर लग्न लावले जाते तेव्हा त्यामागे पुण्याच्या ग्रामीण भागाच्या बारा मावळातील शेतक्रयांनी महात्मा फुल्यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या लढ्याचे योगदान आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर आजही हे विवाह भटशाहीच्या लवाजम्यासह करावे लागले असते.
देशात इंग्रजांचे प्रशासन असताना गावांमध्ये श्रीमंत सावकार आणि त्यांना मदत करणारे ग्रामजोशी व ब्राह्मणकाका यांची एक साखळी तयार झाली होती. लग्नकार्य, पूजाअर्चा, जन्मापासून ते मरणापर्यंतचे सर्व विधी, शुभ-अशुभ अशी सगळी धार्मिक कामे करण्यासाठी गावात ब्राह्मणकाका असत. जुन्नर भागात अजूनही यासाठी ग्रामजोशी ही संकल्पना आढळते. उत्तरेतील काही राज्यांमध्ये देखील ही संकल्पना अजून रुजून आहे. खरंतर शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या गरजा भागविण्यासाठी सुतार, लोहार, कुंभार, सोनार, चांभार, महार, मांग किंवा मातंग, न्हावी, परीट, गुरव, ग्रामजोशी व कोळी अशा बारा बलुतेदारांचा एक वर्ग गावाच्या अर्थव्यवस्थेत आपोआपच तयार होत गेला होता. मात्र या व्यवस्थेत जेव्हा वर्णव्यवस्था घातली गेली तेव्हा मात्र त्यांच्यात भेदभाव आणि जातींना पारावार उरला नाही. महाराष्ट्रात पैसेवाले आणि धर्मवाले यांची युती ओळखणारी पहिली व्यक्ती म्हणजे महात्मा जोतिराव फुले.
- सुबोध शाक्यरत्न
आज तुम्ही बिनाविधी रजिस्टर लग्न करू शकता ह्यासाठी
महात्मा फुले आणि खेडोपाडीच्या सत्यशोधकांनी केलेला संघर्ष
0 टिप्पण्या