कळव्याच्या टाकोली मोहल्ला परिसरातील या इमारतीला कुणाचा आशिर्वाद
सदर इमारतीचे बांधकाम कोणत्या भूमाफियाचे आहे...कोणत्या राजकीय नेत्याचे पाठबळ आहे...
कोणत्या अधिकाऱ्याने या बांधकामाचा हप्ता वसूल केला आहे...
ठाणे शहरात सध्या अनधिकृत बांधकामे खुलेआम सुरु आहेत. याला लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण पाठिंबा असून हेच लोक बांधकामाला खुले आम परवानगी देत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत असून वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येत आहेत. मात्र या कारवाई तकलादू स्वरुपाच्या असल्याचे निदर्शनास आले आहे. कळव्यातील टाकोली मोहल्ला येथे राजरोसपणे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामांवर अद्यापही कोणती कारवाई होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यातच या इमारतीचे बांधकाम चार मजल्याहून अधिक झाले असून सहा महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी ही इमारत उभी राहणार असल्याची माहिती येथे काम करणाऱ्यांनी दिली.
सदर इमारत ही डेप्युटी कस्टेडियम ऑफ इकाक्युप्रॉपर्टीज लैंड ऑफ कॉस्टयूम अर्थात महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर खुलेआम उभी रहात आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कोणतीही माहिती नाही का असा सवाल आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या या भूखंडावर ही इमारत उभी रहात असून या बांधकामाबाबत तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासोबत मोठा अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा टाकोळी मोहल्ला परिसरात रंगली आहे.
ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश देऊनही कळवा-खारीगाव परिसरातील काही मोजक्या बांधकामांवर कारवाईचा तकलादू हातोडा उगारण्यात आला. अनेक बांधकामे कारवाई झाल्यानंतर पुन्हा उभी राहिली. अद्यापही अनेक बांधकामे सुरु आहेत. मात्र फेरीवाल्यांवर आणि अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात ठाणे महानगर पालिका धन्यता मानत आहे. बड्या धेंड्यांची बांधकामे बिनदिक्कतपणे उभी रहात आहेत. ठाण्यातील विशेष करून कळवा-खारीगावात गल्लोगल्ली बांधकामे सुरु आहेत. अगदी सरकारी जागाही या भूमाफियांनी हस्तगत केल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत कोणतीही चौकशी नाही किंवा तक्रार नाही. तक्रारदारास अधिकारीवर्गच मॅनेज करीत असल्याची चर्चा आता होत आहे. भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासोबत अधिकारी वर्गाचे अर्थपूर्ण साटेलोटे झाले असून यापुढे बांधकामाची तक्रार देणाऱयाकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवणे, ऐकला नाही तर चिरीमिरी देऊन गप्प करणे हे आता अधिकारी वर्गाचे काम झाले आहे. त्यामुळे हे भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराला उद्धट भाषेत, जा तुला काय करायचे तर कर असे सुनावत आहेत.
आम्ही महापालिकेचा भरणा (हप्ता) अधिकाऱ्यांना दिला आहे. आता आमच्या इमारती कोणी तोडू शकणार नाही. असे स्पष्टपणे भूमाफिया सांगत आहेत.त्यामुळे ठाण्यात सध्या अनधिकृत बांधकामांचा हैदोस सुरु आहे. इमारत परिसराकरिता असणाऱ्या सोयीसुविधांचा प्रचंड अभाव, अपघात झाल्यास वाहन पोहोचण्यास देखील जागा नाही अशा परिस्थितीत या इमारती उभ्या रहात आहेत. मात्र पालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे तर लोकप्रतिनिधी खुलेआम या अनधिकृत बांधकामांना समर्थन देत असल्याने आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे.
0 टिप्पण्या