Top Post Ad

विश्वविख्यात महाराजा सम्राट अशोक !


 प्राचीन काळात जगभरात अनेक राजे होऊन गेले, त्यापैकी सर्वात अधिक लोककल्याणकारी, लोकप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून सम्राट अशोकाचा उल्लेख केला जातो. अशोकाचा जन्म इसपू ३०४ साली झाला, तर त्यांचा मृत्यू इसपु २३२  साली झाला. त्यांना ७२ वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांच्या वडिलांचे नाव बिंदुसार होते. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे इसपू २७२ साली ते मोठा संघर्ष करून राजगादीवर आले. त्यांनी सुमारे ४० वर्षे राज्यकारभार केला. सम्राट अशोक यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. पाटलीपुत्र म्हणजे आताचे पाटणा ही त्यांची राजधानी होती. चंद्रगुप्त मौर्य यांच्या अनेक महाराण्यापैकी त्यांची हेलन ही एक ग्रीक महाराणी होती. ती अलेक्झांडर सिकंदर यांचा सरदार सेल्युकस निकेटर यांची कन्या होती. अशोकाच्या जडणघडणीत आजी हेलनचा वाटा आहे, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. अशोकावर आजीचा व आईचा मोठा प्रभाव होता.

 चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार यांच्यावर जैन आणि बौद्ध विचारांचा मोठा प्रभाव होता. स्वाभाविकपणे ते संस्कार अशोकाला मिळाले. अशोकाला युद्धकला आणि राजनितीचे शिक्षण वाडवडीलांकडून मिळाले, अशोक हा बिंदुसार राजाचा कनिष्ठ पुत्र होता, तो शूर, पराक्रमी, महत्त्वाकांक्षी होता. त्यामुळे कुमार वयातच राजा बिंदुसाराने अशोकाला अवंती, उज्जैन आणि तक्षशिला येथे मोहिमेवर पाठवले होते. तेथील मोहीम यशस्वी करून तेथे त्यांनी उत्तम प्रशासन निर्माण केले. अशोक उज्जैन येथे असतानाच त्यांची बौद्ध मैत्रीण की जी पुढे त्यांची महाराणी झाली ती देवी हिच्यासोबत अशोक मध्यप्रदेशातील पांगुरारीया जवळील नक्तीतालाई येथे गेल्याचा शिलालेख आहे. त्यावेलेसही अशोक बौद्ध विचाराने प्रभावित होता. अशोकाला कारुवाकी, तिष्यरक्षा, पद्मावती, असंधीमित्रा आणि देवी या महाराण्या होत्या. त्यांना महेंद्र, संघमित्रा, कुणाल, तीवल, राहुल आणि चारुमती ही मुलं होती.

 बिंदुसाराच्या मृत्यूनंतर अशोकाला मोठा संघर्ष करून राजगादीवर यावे लागले. सम्राट अशोकाने राज्यारोहनानंतर आपल्या मौर्य साम्राज्याचा चौफेर विस्तार केला. कलिंगचे म्हणजे आताचे ओरिसा त्यांनी जिंकून घेतला. तेथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. पण तेथील घटनेनंतर ते बौद्ध धम्माकडे वळले असे नाही, यापूर्वीच ते बौद्ध विचाराने प्रभावित होते. याचा संदर्भ नक्तितालाई येथील शिलालेख देतो. सम्राट अशोकाचे राज्य समकालीन कोणत्याही राजापेक्षा विशाल होते. त्यांचे राज्य आताच्या इराणपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि चीनपासून केरळपर्यंत होते. सम्राट अशोकाने दक्षिणेकडील चेर, पांड्य, चोल यांना अधिपत्याखाली आणले होते. सम्राट अशोकाचे शिलालेख अफगाणिस्तानात देखील सापडलेले आहेत. शहबाजगडी आणि मानसेहरा येथील ब्राह्मी, खरोष्ट्री आणि अरमाईक या लिपीमध्ये सापडलेले शिलालेख सम्राट अशोकाचे राज्य अफगाणिस्थानावरती देखील होते, किंबहुना अफगाणिस्थान अशोकाच्या राज्याचा अविभाज्य भाग होता हे स्पष्ट होते.

  अशोकाने देशभर अनेक ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरून ठेवले आहेत, त्याचे वाचन प्रथमतः ब्रिटिश द्रव्यनिरिक्षक ( coin inspector ) जेम्स प्रिंसेप यांनी १८३७ साली केले. अशोकाचे कार्य आणि विचार समजण्यासाठी या शिलालेखांचा उपयोग होतो. त्यांचे खरोष्ट्री आणि  अरमाईक लिपीतील शिलालेख त्यांचे इराणी सीमेवर जे राज्य होते, त्याचा पुरावा आहे. अशोकाबाबत "देवानाम प्रिय प्रियदर्शनी" अशोक असे उल्लेख आहेत. गुलबर्गा जिल्ह्यातील सन्नती येथे उत्खननात अशोकाची मूर्ती सापडलेली आहे.  अशोकाने लोककल्याकारी राज्य केले. त्याने प्रजेला मुलाप्रमाणे वागविले. आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. ते बौद्ध धर्माचे अनुयायी होते, पण इतर धर्मियांना देखील त्यांनी सढळ हाताने मदत केली. ते उत्तम प्रशासक होते. त्यांची केंद्रीय सत्ता मजबूत होती. सर्व राज्यावर त्यांचे नियंत्रण होते. त्यांनी आपल्या राज्यात दळणवळणासाठी रस्ते निर्माण केले. रस्त्याच्या कडेला झाडे लावली. विश्रांतीसाठी विश्रामगृह बांधले. दवाखाने बांधले. विहीर बांधल्या. तलाव, धरणं बांधली. शेतकऱ्यांना मदत केली. गुप्तहेर खातं अत्यंत सक्षम केले. गुप्तहेर खात्यात महिलांची देखील नेमणूक केली.

 अशोक अहिंसावादी होता, परंतु राज्यरक्षणासाठी सैन्याची आणि प्रसंगी लढाईची आवश्यकता असते, हा राजधर्म त्यांनी शेवटपर्यंत पाळला. त्यांनी मांसाहार वर्ज्य केला नाही. त्यांनी पशुहत्याबंदी केली, परंतु कांहीं पशुंसाठी परवानगी दिली. त्यांनी पाटलीपुत्र येथे भव्य राजवाडा बांधला. त्यांचा राज्यव्यवहार इराण, श्रीलंका इत्यादी देशांशी चालत असे. श्रीलंकन राजा तिस्स हा अशोकाच्या कार्याने व प्रेमाने प्रभावित होवून अशोकाला भेटण्यासाठी पाटलीपुत्र येथे आला होता.  अशोकाने आपल्या राज्याची नियमितपणे पाहणी केली. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांनी गौतम बुद्धाच्या लुंबिनी या जन्मभूमीला भेट दिली. बुद्ध जन्मभूमी म्हणून तेथील जनतेला त्यांनी करमुक्त केले. नेपाळ, भूतान, तिबेट हे अशोकाच्या राज्यातच होते. जनसंपर्काची आणि प्रवासाची कोणतीही अत्याधुनिक साधने नसताना सम्राट अशोकाने उत्तम प्रकारे राज्यकारभार केला.

सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांनी पाटलीपुत्र या ठिकाणी तिसरी धम्म परिषद घेतली. या तिसऱ्या धम्म परिषदेचे बौद्ध धर्मामध्ये मोलाचे योगदान आहे. सम्राट अशोकाने आपल्या राज्यात अनेक ठिकाणी स्तूप आणि विहार बांधले. बाराबर या ठिकाणी स्तूप आणि विहार बांधण्यासाठी त्यांनी देणगी दिली. त्यांनी सांची याठिकाणी स्तूप बांधला. त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना श्रीलंकेत पाठवले. त्यांनी धर्मप्रसारासाठी महामात्रा हे पद निर्माण केले.

  सम्राट अशोकाचे साम्राज्य विशाल होते, पण ते अनियंत्रित नव्हते, तर ते उत्तम प्रशासक असणारे लोककल्याणकारी राज्य होते. अलेक्झांडर सिकंदराप्रमाणे जग जिंकण्याची अभिलाषा बाळगून विस्कळित राज्यकारभार अशोकाने केला नाही. त्यांनी जिंकलेल्या भागाची उत्तम व्यवस्था लावली. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले. अशा जगविख्यात सम्राट अशोक यांच्या जयतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!

*-डॉ.श्रीमंत कोकाटे*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com